Raju Shetti-siddharam mhetre
Raju Shetti-siddharam mhetre Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

तुमच्यापेक्षाही घाण शिव्या आम्हाला देता येतात : शेतकऱ्याला शिवी देणाऱ्या सिद्धाराम म्हेत्रेंना राजू शेट्टींचा इशारा

विश्वभूषण लिमये

सोलापूर : ऊस बिल मागण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांवर माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे भडकले होते. रागाच्या भरात त्यांनी एका शेतकऱ्याला शिवीही दिली होती. त्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी समाचार घेतला. ‘आपल्या घामाचा मोबदला मागायला गेलेल्या शेतकऱ्यांना शिव्या दिल्या जातात. शिव्याच द्यायच्या झाल्या तर त्यांच्यापेक्षाही जास्त घाण शिव्या आम्हाला देता येतात. मात्र ती आमची संस्कृती नाही. यावरून अक्कलकोटची संस्कृती कुठल्या थराला गेली आहे, याचा अंदाज येईल,’ अशा शब्दांत शेट्टी यांनी काँग्रेसचे माजी मंत्री म्हेत्रे यांना इशारा दिला. (Raju Shetty's warning to former minister Siddaram Mhetre who insulted sugarcane growers)

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली सोलापुरात थकीत ऊस बिलसंदर्भात काँग्रेस भवनसमोर मागील 12 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. या आंदोलकांची भेट घेण्यासाठी माजी खासदार राजू शेट्टी आले होते. त्यावेळी माध्यमांशी संवाद साधताना शेट्टी यांनी महाविकास आघाडी सरकार आणि केंद्रातील भाजप सरकार या दोन्हींवर निशाना साधला.

महाराष्ट्रात गुंडांप्रमाणे केंद्र आणि राज्य सरकार यांच्यामध्ये टोळीयुद्ध सुरू असून जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे दोन्ही सरकारचं दुर्लक्ष होत आहे. दिवसेंदिवस पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढत आहेत. यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बोलणे गरजेचे असताना ते भलत्याच कामात व्यस्त आहेत, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली.

बिघडलेल्या नटांची बिघडलेली पोरं गांजा ओढतात. त्यावर सध्या चर्चा सुरू आहे. पण इथे महापुरात बुडालेला शेतकरी, अतिवृष्टीमुळे उद्‌ध्वस्त झालेला शेतकरी, ऊस बिल न मिळाल्याने आंदोलन करणारा शेतकरी यांच्याकडे लक्ष द्यायला सरकारकडे वेळ नाही, ही दुर्दैवी गोष्ट आहे. इथे केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामध्ये राजकीय टोळीयुद्ध सुरू आहे. गुंडांच्या टोळ्याप्रमाणे एकमेकांना बघून घेण्याची भाषा केली जात आहे, अशी टीकाही शेट्टी यांनी या वेळी बोलताना केली.

दरम्यान ऐन दिवाळीच्या काळात रस्त्यावर येत बेवारशासारखं शेतकरी आंदोलन करत आहेत. मात्र पोलिस त्यांच्यावर कारवाई करतात, हीच शरमेची गोष्ट आहे. वास्तविक उसाची तोडणी झाल्यापासून 14 दिवसांत ऊसबिल शेतकऱ्यांना देणे बंधनकारक आहे. अन्यथा संबंधित साखर कारखान्यावर कारवाई करणे गरजेचे आहे. सरकार शेतकऱ्यांना संरक्षण द्यायला कमी पडत आहे. ही शरमेची गोष्ट आहे, अशी खंतही शेट्टी यांनी व्यक्त केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT