RPI(A) and Vanchit Bahujan Aaghadi News : वंचित बहुजन आघाडी बरखास्त करून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर यांनी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारावे. यामुळे आपल्या पक्षाची महाराष्ट्रात ताकद वाढेल. तसेच तुमच्यासाठी मी स्वतः अध्यक्षपद सोडायला तयार आहे, अशी ऑफर केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री व रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी दिली.
रिपब्लिकन पक्षाच्या ६७ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमानिमित्त मंत्री रामदास आठवले(Ramdas Athawale) आज(गुरुवार) साताऱ्यात आले होते. यावेळी शासकिय विश्रामगृहात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे, कार्याध्यक्ष बाबूराव कदम, सरचिटणीस गौतम सोनवणे, पर्यावरण विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण ढमाळ, सातारा जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड उपस्थित होते.
आठवले म्हणाले,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी शेड्युल कास्ट फेडरेशन ऑफ इंडिया व मजूर पार्टी या दोन पक्षांच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यांना महाराष्ट्रात यश आले नाही. त्यांच्या महानिर्वाणानंतर त्यांच्या अनुयायांनी स्थापलेला पक्ष हा खरा रिपब्लिकन पक्ष आहे. आता आमच्या पक्षातील अन्य गटातटांनी मतभेद विसरून मूळ रिपब्लिकन पक्षांत सामील व्हावे.
यामुळे महाराष्ट्रात आपले राजकीय ऐक्य वाढले. वंचित बहुजन आघाडी ही डॉ. प्रकाश आंबेडकर(Prakash Ambedkar) यांनी बरखास्त करून डॉ. बाबासाहेबांचे वारस म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या मूळ पक्षात सामील व्हावे. त्यांनी स्वतः राष्ट्रीय अध्यक्षपद स्वीकारावे. त्यांच्यासाठी मी अध्यक्षपद सोडायला तयार आहे. मी दिलेल्या ऑफरवर प्रकाश आंबेडकर कधीही भाष्य करत नाहीत. त्यांनी एक पाऊल पुढे टाकावे, त्यांच्या पुढचे एक पाऊल टाकायला मी तयार आहे, अशी ऑफरही त्यांनी दिली.
महायुतीने विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र या तीन प्रादेशिक विभागात आठ जागा द्याव्यात. दोन महामंडळे आणि विधान परिषदेच्या बारा आमदारांमध्ये एक जागा रिपाईला सोडावी, अशी आमची मागणी असल्याचे सांगून रामदास आठवले म्हणाले, विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या १७० जागा निवडुन येतील, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. काँग्रेसचे नेते राहुल गांधी(Rahul Gandhi) यांनी अमेरिकेत जाऊन आरक्षण संपवण्याची भाषा केली आहे. त्याचा फटका त्यांना विधानसभा निवडणुकात बसेल. महाराष्ट्रात काँग्रेसला यश मिळणार नाही, असेही आठवले यांनी सांगितले.
सातारा जिल्ह्यामध्ये फलटण विधानसभा मतदारसंघाचे आरक्षित जागा रिपाईला मिळावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली केंद्र शासनाने समान नागरी कायदा आणि वक्फ बोर्ड कायदा आणण्याची तयारी चालवली आहे. हे दोन्ही कायदे मुस्लिम समाजाच्या विरोधात नाही वक्फ बोर्ड कायदा हा प्रस्थापितांची एकाधिकारशाही मोडून मुस्लिम समाजाला फायदा करून देणारा कायदा आहे. समान नागरी कायद्यामुळे हिंदू व मुस्लिम समाजामध्ये संबंध समन्वयाचे राहणार आहेत. या कायद्याविषयी गैरसमज पसरवला जाऊ नये, असेही मंत्री आठवले म्हणाले.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.