Ranjeetsingh Nimbalkar | ramraje nimbalkar sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ranjeetsingh Nimbalkar : रामराजे निंबाळकर 'तुतारी' वाजवणार म्हणताच रणजितसिंह निंबाळकर म्हणाले...

Ranjeetsingh Nimbalkar Vs Ramraje Nimbalkar : "रामराजे निंबाळकर शरद पवार यांच्या पक्षात राहिले. नंतर ते स्वार्थासाठी शरद पवारांच्या पक्षातून अजितदादांकडे गेले," असं टीकास्र रणजितसिंह निंबाळकर यांनी सोडलं आहे.

Akshay Sabale

विधान परिषदेचे माजी सभापती आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ( अजितदादा पवार ) नेते, रामराजे नाईक-निंबाळकर विरुद्ध माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यातील विस्तव जाता जात नाही. रणजितसिंह निंबाळकर यांच्या दहशतीला पाठिंबा देऊ नका, अशी भाजपकडे तक्रार आहे. फरक पडला नाहीतर 'तुतारी' वाजवणार, असा इशारा रामराजे नाईक-निंबाळकर यांनी दिला आहे.

रामराजे निंबाळकर यांनी इशारा दिल्यानंतर माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर ( Ranjeetsingh Nimbalkar ) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. "रामराजे निंबाळकर यांचं कुटुंबानं लोकसभेला 'तुतारी'चं काम केलं. रामराजे निंबाळकर राष्ट्रवादीत जाण्यासाठी फक्त कारण शोधत आहेत," अशी टीका रणजितसिंह निंबाळकर यांनी केली आहे. त्यामुळे विधानसभेपूर्वी फलटमधील राजकारण तापण्याची शक्यता आहे.

रणजितसिंह निंबाळकर म्हणाले, "रामराजे निंबाळकर ( Ramraje Nimbalkar ) यांनी आधीच 'तुतारी' हाती घेतली आहे. लोकसभेला रामराजे निंबाळकर यांच्या कुटुंबानं शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचं काम केलं. रामराजे निंबाळकर हे राष्ट्रवादी जाण्यासाठी फक्त कारणे शोधत आहेत. अजितदादांकडून मतदारसंघात शेकडो कोटी रूपयांची कामे करून घेण्यासाठी रामराजे निंबाळकर पक्षात थांबले होते. ते शरद पवार यांच्या पक्षात जाणार, याची कल्पना अजितदादांना पूर्वीपासून आहे."

"रामराजे निंबाळकर यांची पुण्यात बैठक झाली असून 'तुतारी'कडे जाण्याबाबत शिक्कामोर्तब झाला आहे. कार्यकर्त्यांना 'तुतारी'त प्रवेश करणार असल्याच्या सूचना दिल्या आहेत. विधानसभेला 'तुतारी' आणि 'घड्याळ' समोरा-समोर आले, तर पराभव 100 टक्के होणार आहे. त्यामुळे 'तुतारी' घेऊन राजकारणात सक्रिय राहण्यासाठी ही हालचाल सुरू आहे," असा दावा रणजितसिंह निंबाळकर यांनी केला आहे.

"रामराजे निंबाळकर शरद पवार यांच्या पक्षात राहिले. नंतर ते स्वार्थासाठी शरद पवारांच्या पक्षातून अजितदादांकडे गेले. आता अजितदादांना धक्का देऊन ते शरद पवारांकडे जातील. किमान निवडणुका होईपर्यंत रामराजे निंबाळकर यांनी राष्ट्रवादीत राहावं," असा टोला रणजितसिंह निंबाळकर यांनी लगावला आहे.

रामराजे निंबाळकर काय म्हणाले होते?

"आपलं भांडण भाजपसोबत नाही. माजी खासदारासोबत ( रणजितसिंह निंबाळकर ) आहे. ते आणि त्यांचे साथीदार गल्लोगल्ली दहशत माजवत आहेत. त्याला पाठिंबा देऊ नका. अन्यथा 'तुतारी' वाजवायला किती वेळ लागणार आहे," असा इशारा रामराजे निंबाळकर यांनी दिला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT