Solapur, 28 April : सोलापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे. त्या कामगिरीबद्दल जनतेविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि लोकप्रतिनिधींचा सत्कार करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोलापुरात आले होते. मात्र, भाजपच्या नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींच्या सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमास पक्षाचे विधान परिषदेतील आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांची अनुपस्थिती दिसून आली. त्यांच्या अनुपस्थितीची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
दरम्यान, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे लग्नाच्या नियोजित कार्यक्रमामुळे बाहेर आहेत, त्यामुळे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोलापुरातील कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत, असे त्यांच्या स्वीय सहायकांकडून सांगण्यात आले.
भाजपच्या नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींच्या सत्कार समारंभास सोलापूर जिल्ह्यातील झाडून सर्व नेतेमंडळी हजर होते. खुद्द मुख्यमंत्री कार्यक्रमास येणार असल्याने आजी माजी आमदार, मंत्री, माजी खासदार आणि तीनही संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. मात्र, त्यात रणजितसिंह मोहिते पााटील यांची अनुपस्थिती होती, त्याची चर्चा रंगू लागली आहे.
सोलापूर महापालिका, जिल्हा परिषद, अकरा पंचायत समित्या आणि नगरपालिका निवडणुका भाजपने स्वबळावर लढवल्या आहेत. त्यात जिल्हा परिषद, पंचायत समित्या, महापालिका निवडणुकीत भाजप निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. या निवडणुकीत भाजपने माळशिरस तालुक्यात मोहिते पाटील यांना बाजूला ठेवले होते.
अकलूज नगरपालिका, त्यानंतर जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका भाजपने पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी आमदार राम सातपुते यांच्या नेतृत्वाखाली प्रथमच स्वबळावर लढवल्या. गोरे यांच्या भक्कम पाळबळामुळे सातपुते यांनी भाजपला बऱ्यापैकी यशही मिळवून दिले. या निवडणुकांमध्ये भाजपने मोहिते पाटील यांना दूर ठेवले होते. त्यामुळे भाजपचे विधान परिषद सदस्य असलेले रणजितसिंह हे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कार्यक्रमाला येतील की नाही, याची चर्चा होती.
रणजितसिंह मोहिते पाटील यांची विधान परिषद आमदारकीची मुदत येत्या १२ मे रोजी संपणार आहे. नव्याने पुन्हा संधी मिळावी, यासाठी त्यांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा मुंबई दौराही झाला. मात्र, मोहिते पाटील यांच्या पदारात आश्वासनाचा शब्द पडला नसल्याचे सांगण्यात येत आहे.
त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा झालेला सोलापूर दौरा आणि त्याला रणजितसिंह मोहिते पाटील यांनी मारलेली दांडी हे बरेच काही सांगून जात आहे, त्यामुळे आगामी काळात मोहिते पाटील यांची वाटचाल कशी असणार, याचीही उत्सुकता असणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.