Pandharpur, 26 October : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पालकमंत्री जयकुमार गोरेंनी भाजप नेत्यांची बैठक घेतल्यानंतर मोहिते पाटलांनी ‘शिवरत्न’वर सर्वपक्षीय नेतेमंडळींशी चर्चा केली. त्यानंतर आज (ता. २६ ऑक्टोबर) पंढरपुरात सर्वांत मोठी घडामोडी घडली असून जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष, माजी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील आणि भाजप नेते प्रशांत परिचारक यांच्यात पंढरपुरातील एका हॉटेलमध्ये सुमारे अर्धा तास बंद दाराआड चर्चा झाली. या बंद दाराआड झालेल्या चर्चेने जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत मतदान करणाऱ्या पंढरपूर तालुक्यातील ठरावधारकांची सोमवारी (ता. 26 ऑक्टोबर) माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत परिचारक जो निर्णय घेतील, तो आम्हाला सर्वांना मान्य असेल असा एकमुखी ठराव करण्यात आला. मात्र, कार्यकर्त्यांनी याच बैठकीत दोन महत्त्वाच्या मागण्या लावून धरल्या. एक म्हणजे, परिचारक यांनी स्वतः या निवडणुकीत उमेदवार म्हणून उभे राहावे आणि दुसरी म्हणजे, जिल्ह्यात सर्वाधिक मतदार पंढरपूर तालुक्यात असल्याने पंढरपूरला तीन जागा मिळाव्यात.
कार्यकर्त्यांची ही बैठक संपताच माजी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी त्याच ठिकाणी एन्ट्री झाली. त्यांच्या अचानक झालेल्या एन्ट्रीमुळे राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या. त्यानंतर मोहिते पाटील आणि परिचारक यांच्यात कोणालाही आत न घेता बंद दाराआड सुमारे अर्धा तास चर्चा झाली. या चर्चेचा तपशील मात्र गुलदस्त्यात आहे.
दोन दिवसांपूर्वीच अकलूजच्या शिवरत्न बंगल्यावर झालेल्या बैठकीत रणजितसिंह मोहिते पाटील यांनी ‘जिल्ह्यातील सर्व नेत्यांना सोबत घेऊन, त्यांच्या दारात जाऊन चर्चा केली जाईल,’ असे जाहीर केले होते. त्याचाच भाग म्हणून त्यांनी रविवारी माढ्याचे आमदार अभिजीत पाटील आणि आज प्रशांत परिचारक यांची भेट घेतली.
दुसरीकडे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनीही जिल्हा बँकेवर भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. गोरे यांनी बँकेची निवडणूक प्रतिष्ठेची केली असताना, भाजप नेते परिचारक आणि पारंपरिक विरोधक असलेल्या मोहिते पाटील यांची झालेली ही गुप्त भेट अनेक राजकीय संकेत देऊन जाते.
पालकमंत्री गोरेंना शह देण्यासाठी मोहिते पाटील-परिचारक हे नवे समीकरण जुळते आहे का? पंढरपूरच्या तीन जागांवरून काय डील झाली? या बंद दाराआड चर्चेनंतर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट येणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.