Adinath Sugar Factory-Rohit Pawar News, Adinath Sugar Factory News
Adinath Sugar Factory-Rohit Pawar News, Adinath Sugar Factory News Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

रोहित पवारांना धक्का : आदिनाथ कारखाना बारामती ॲग्रोला चालवायला देण्याचा ठराव रद्द

आण्णा काळे

करमाळा (जि. सोलापूर) : सोलापूर जिल्ह्याच्या करमाळा तालुक्यातील श्री आदिनाथ  सहकारी साखर कारखाना (Adinath Sugar Factory) राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या बारामती ॲग्रोला भाडेतत्त्वावर देण्याच्या निर्णयाला वार्षिक सर्वसाधारण सभेत विरोध करण्यात आला. भाडेतत्त्वावर कारखाना न देण्याच्या बाजूने या सभेत ठराव मंजूर करण्यात घेण्यात आला आहे. आदिनाथ बचाव समितीने मांडलेल्या ठरावाला ऑनलाईन सभेस उपस्थित असलेल्या एकूण सभासदांपैकी 282  सभासदांनी कारखाना भाडेतत्त्वावर देण्यास विरोध करण्याच्या बाजूने मतदान केले. कारखाना भाडेतत्त्वावर देण्याच्या बाजूने 34 सभासदांनी मतदान केले. कारखान्याचे अध्यक्ष धनंजय डोंगरे यांनी ही माहिती दिली. त्यामुळे बारामती ॲग्रोला कारखाना चालवायला देण्याचा ठराव रद्द झाला असून आमदार पवार यांना तो धक्का मानला जात आहे. (Resolution to allow Adinath Sugar Factory to run Baramati Agro canceled)

कारखान्यावर सध्या बागल गटाची सत्ता आहे. पण, गेली दोन वर्षांपासून कारखाना बंद आहे. कारखान्यावरील कर्जाचा वाढता बोजा लक्षात घेता  दोन वर्षांपूर्वी कारखाना भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय घेण्यात आला होता . मात्र, दोन वर्षांत कारखाना बारामती ॲग्रोकडून सुरू न झाल्याने  हा कारखाना भाडेतत्त्वावर देऊ नये, अशी मागणी जोर धरू लागली होती. यावर वार्षिक सर्वसाधारण सभेत निर्णय होऊन कारखाना भाडेतत्त्वावर न देण्याचा निर्णय झाला आहे. (Rohit Pawar News)

आदिनाथ कारखाना राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रोला चालवायला देण्याचा १९ जुलै २०१९ चा  ठरावदेखील या सर्वसाधारण सभेतील ठरावामुळे अखेर रद्द करण्यात आला आहे. मागील सभेचे इतिवृत्त कायम करण्याच्या विषय क्रमांक ९ च्या वेळी कारखाना भाडेतत्त्वावर देण्याच्या बाजूने केवळ १९ तर, भाडेतत्त्वावर न देण्याच्या बाजने २७७ जणांचे मतदान केले होते. सभासदांनी घेतलेल्या या ठरावावर बारामती ॲग्रो काय भूमिका घेणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे 

 आदिनाथ बचाव समितीने रविवारी (ता. 20 मार्च) झालेल्या ऑनलाइन सर्वसाधारण सभेत कारखाना ‘बारामती ॲग्रो’ला भाडेतत्वार चालवायला देऊ नये, हा विषय सुचवला होता. त्यावर सभेत चर्चा झाली होती. त्यानंतर हा विषय मतदानाला टाकला होता. यावर कोणत्या बाजूने किती मतदान झाले, याची सर्वांनाच उत्सुकता लागली होती. ऑनलाईन सभा झाल्याने या विषयावर झालेल्या मतदानाची मोजणी करून निर्णय जाहीर करण्यास वेळ लागत होता. तो निर्णय मंगळवारी (ता. २३ मार्च) रोजी सायंकाळी जाहीर करण्यात आला आहे.

वास्तविक पाहता या विषयावर सोमवारी (ता. २२ मार्च) माहिती येणे अपेक्षित होते. मात्र, कारखाना प्रशासनाकडे संबंधित यंत्रणेकडून माहिती न आल्याने मंगळवारी तपशीलवार माहिती जाहीर करण्यात आली आहे.

शंका असल्यास सविस्तर माहिती देण्यात येईल : डोंगरे

वार्षिक सर्वसाधारण सभेची माहिती पारदर्शकपणे मांडण्यात आली आहे.  विषयनिहाय व प्रत्येक विषयाला मंजुरी व नामंजुरी याची आकडेवारी  जाहीर करण्यात आली आहे.  याबाबत कुणाला काही शंका असल्यास संबंधित सभासदांना ऑनलाईन वार्षिक सर्वसाधारण सभेची माहिती सविस्तर कारखाना प्रशासनाकडून उपलब्ध करण्यात आली आहे . सभासदांनी प्रत्येक विषयाला केलेले मतदान याची वर्गवारीदेखील उपलब्ध आहे , असे आदिनाथ सहकारी कारखान्याचे अध्यक्ष धनंजय डोंगरे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT