Rohit Pawar Vs Raj Thackeray Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Rohit Pawar: मनसेनं शिंदे अन् अजितदादांचे उमेदवार पाडले; यामागं फडणवीसांचं डोकं... ; रोहित पवारांचा गंभीर आरोप

MLA Rohit Pawar On Maharashtra Assembly Election 2024 : लाडकी बहीण योजनेचा महायुतीला वाटावा तेवढा फायदा झाला नसावा. यामागे दुसरे काहीतरी कारण असावे, त्याचा अभ्यास करायला हवा. हाताला काम आणि पोटाला अन्न या व्यतिरिक्त हिंदुत्वाच्या मुद्द्यावर प्रचाराच्या दिशा वळवली गेली.

हेमंत पवार - Hemant Pawar

Karad News : विधानसभेतील संख्याबळ 160 च्यापुढे कसे गेले, याचे भाजपच्या लोकांनाही आश्चर्य वाटत असेल. मध्य प्रदेशमध्ये कुणाल पाटील यांना त्यांच्या राहत्या गावात एकही मत मिळाले नाही, हे आश्चर्यकारक आहे. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला जातात आणि गुजरातची ईव्हीएम महाराष्ट्रात येतात. त्यामुळे त्यात काहीतरी घोळ असून महाराष्ट्रातील बऱ्याच उमेदवारांचे मताधिक्य जवळपास सारखेच कसे काय ? ईव्हीएमबाबतची भूमिका नक्कीच संशयास्पद आहे असल्याचा गंभीर आरोप कर्जत-जामखेड मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केला आहे.

आमदार रोहित पवार यांनी कराड येथे दिवंगत नेते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी सोमवारी (ता.25) अभिवादन करण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना महायुतीच्या (Mahayuti) महाविजयावरच एकप्रकारे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मनसेनं बऱ्याच ठिकाणी एकनाथ शिंदे आणि अजितदादांचे उमेदवार पाडले. यामागे फडणवीस यांचं डोकं होतं. त्याचबरोबर सध्याचे समीकरण पाहता अजितदादांना दोन वर्षे मुख्यमंत्रिपद मिळेल, असे वाटत नाही. गेल्यावेळी त्यांना मिळालेली मंत्रिपदे यावेळी मिळाली तरी पुष्कळ झाले, असाही टोला त्यांनी लगावला.

तसेच ईव्हीएमविषयी संशय व्यक्त केला आहे. तसेच निवडणूक आयोगाने आमच्या अनेक प्रश्नांची समर्पक उत्तरे द्यावी, अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी यांनी केली. ईव्हीएम संदर्भातील न्यायालयीन लढाईबाबत महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील असेही त्यांनी सांगितले. विषय न्यायालयात गेल्यावर त्यांनी योग्य वेळेत निकाल देणे गरजेचे आहे. नाहीतर राष्ट्रवादी कोणाची ? याबाबतच्या निकालाला तीन वर्षे कधी निघून गेली, हे कळलेही नाही. उशिरा दिलेले निकालही अन्यायच असतो, असंही आमदार रोहित पवार म्हणाले.

नवीन सरकार 26 नोव्हेंबरपर्यंत राज्यात स्थापन करणे गरजेचे आहे. परंतु, लोकशाही आणि संविधान पाळणारे हे पक्ष नाहीत. ते मनमानी करतील. निवडणूक आयोग त्यांच्या खिशात आहे. न्यायालयाची भूमिकाही काही निर्णयांबाबतीत संशयास्पद असल्याने न्यायालयात जाऊनही काही उपयोग नाही. त्यामुळे लोकशाही आणि संविधान पायदळी तुडवून ते मुदतही ओलांडतील.

राष्ट्रवादी पक्षाच्या न्यायालयीन सुनावणीबाबत ते म्हणाले, उच्च व सर्वोच्च न्यायालयाकडून आता कोणत्याही अपेक्षा राहिलेल्या नाहीत. लोकांवर विश्वास होता. परंतु, महाराष्ट्रात लागलेला निकाल हा लोकांनाही अपेक्षित नसणारा आहे. नेत्यांनी जरी तो स्वीकारला असला, तरी पदाधिकारी, कार्यकर्त्यांना तो स्वीकारणे अवघड आहे.

सातारा जिल्ह्यात महाविकास आघाडीचे उमेदवार बाळासाहेब पाटील, पृथ्वीराज चव्हाण, सत्यजितसिंह पाटणकर यांना जवळपास सारखी मते पडले आहेत. पोस्टल मतांचा कौल वेगळा असून ईव्हीएमचा कौल फारच वेगळा आहे. आमच्या बालेकिल्ल्यात मायनस झाल्यावर कुठेतरी पाणी मुरत असल्याचे जाणवायला लागले आहे, असेही आमदार रोहित पवार यांनी सांगितले.

रोहित पवार म्हणाले, लाडकी बहीण योजनेचा महायुतीला वाटावा तेवढा फायदा झाला नसावा. यामागे दुसरे काहीतरी कारण असावे, त्याचा अभ्यास करायला हवा. हाताला काम आणि पोटाला अन्न या व्यतिरिक्त हिंदुत्वाच्या मुद्द्यावर प्रचाराच्या दिशा वळवली गेली. संतांच्या भूमीत भाजपने मोठ्या प्रमाणावर केलेल्या भेदभावालाही काही प्रमाणात यश आले. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या भूमीत दोन्ही उमेदवार पाडण्याचे कारण ईव्हीएम, तसेच हिंदुत्वाच्या मुद्द्याची केलेली वातावरण निर्मिती, हेही असावे.

'अजितदादांना दोन वर्षे मुख्यमंत्रिपद मिळेल...'

एकनाथ शिंदे पहिले एक वर्ष मुख्यमंत्री राहतील. नंतरचे चार वर्ष भाजपकडे मुख्यमंत्रीपद राहील, असा अंदाज व्यक्त करुन आमदार पवार म्हणाले, 2029 साली एकहाती सत्ता मिळवण्याची भाजपची रणनीती आहे. त्याला यावेळी काही प्रमाणात यश आले आहे. ते आत्ता 144 ला कमी पडले. त्याचबरोबर सध्याचे समीकरण पाहता अजितदादांना दोन वर्षे मुख्यमंत्रिपद मिळेल, असे वाटत नाही. गेल्यावेळी त्यांना मिळालेली मंत्रिपदे यावेळी मिळाली तरी पुष्कळ झाले, असाही टोला त्यांनी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT