Sadabhau Khot Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sadabhau Khot : सदाभाऊ खोतांनी फुंकले इस्लामपूर नगरपालिकेचे रणशिंग; भाजपच्या माजी नगराध्यक्षांवर नाराजी!

Islampur municipal elections : भाजपच्या एका गटासोबत निवडणूक लढविणार असल्याचं खोत यांन जाहीर केलं आहे

सरकारनामा ब्यूरो

अनिल कदम

'माझ्या मंत्रिपदाच्या काळात इस्लामपूर शहरासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला, मात्र पद गेल्यानंतर आम्हाला खड्यासारखे बाजुला करण्यात आल्याची खंत माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी व्यक्त करीत माजी नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली. आगामी इस्लामपूर नगरपालिकेची निवडणूक रयत क्रांती शेतकरी संघटना भाजपच्या एका गटासोबत लढविणार असल्याचे सांगत इस्लामपुरात निवडणुकीचे रणशिंग फुंकले.

इस्लामपूर येथील विविध विकासकामांच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी आमदार भगवानराव साळुंखे, नगरपालिकेचे गटनेते विक्रम पाटील, माजी विरोधी पक्षनेते विजय कुंभार, माजी नगरसेवक एल. एन. शहा, अमित ओसवाल, स्वाभिमानीचे आप्पासाहेब पाटील, युवराज पाटील, दिग्वीजय पाटील, सतीश महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

माजी मंत्री खोत(Sadabhau Khot) म्हणाले, दिवंगत अशोकदादा पाटील यांनी सर्वसमावेशक राजकारण केले. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत विक्रम पाटील यांची वाटचाल सुरू आहे. दिवगंत नानासाहेब महाडिक यांनी पालिकेत सत्तांतर करण्यासाठी विरोधकांची मोट बांधली होती. सत्ता आल्यानंतर आमचेच आम्हाला विसरून गेले.

इस्लामपूर शहराच्या विकासासाठी मंत्रिपदाच्या काळात कोटयवधी रूपयांचा निधी दिला. मंत्री असताना निधी दिला आम्हाला बोलवलेही नाही. सत्ता येते आणि जाते. परंतु ज्यांनी मदत केली, त्यांना विसरायचे नसते, अशी टीकाही माजी नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्यावर केली.

आगामी इस्लामपूर नगरपालिकेची निवडणूक लढविण्याचा निर्णय रयत क्रांती शेतकरी संघटनेने घेतला आहे. भाजपचा एक गट आणि सर्वसामान्य नागरिकांना सोबत घेवून पालिकेची निवडणूक लढवणार आहे. निवडणूक ताकदीनिशी लढवून सत्ता स्थापन केली जाईल, असा दावाही माजी मंत्री खोत यांनी केला.

शहराला जे आश्वासन दिले ते पूर्ण केले -

विक्रम पाटील म्हणाले, पाणंद रस्त्यावरून अनेक पुढारी येजा करतात. या रस्त्यासाठी त्यांना निधी आणता आला नाही. आम्ही पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या माध्यमातून दीड कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला. शहरातील रस्ते 20 वर्षे केले नाहीत. सत्ता नसतानाही मी निधी आणला आहे. आम्ही जे आश्वासन दिले ते पूर्ण केले आहे. शहराच्या विकासात योगदान देणार्‍यांच्या पाठीमागे जनता उभी राहते.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT