Sangli BJP: राज्यभरात सध्या विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. सांगली-सातारा विधानपरिषद मतदारसंघात मतदारांशी संपर्क साधण्याची व मनधरणी करण्याची लगबग महायुतीच्या नेत्यांमध्ये सुरू आहे. अशातच सांगली भाजपमध्ये मानपानावरून नाराजी नाट्य उफाळून आले आहे.
विधानपरिषदेसाठी मतदारसंघात महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम, महाविकास आघाडीचे अभयसिंह जगताप उमेदवार व अपक्ष उमेदवार किशोर धुमाळ यांच्यात तिरंगी लढत होत आहे. हे तीनही उमेदवार सातारा जिल्ह्यातील असल्याने सांगली जिल्ह्यातील मतदारांशी त्यांचा फारसा परिचय नाही.
अशातच आता महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम यांनी निवडणूक अर्ज भरतेवेळी झालेल्या बैठकीत सांगलीतील नगरसेवकांकडे दुर्लक्ष केल्याच्या समजुतीतून सांगलीतील भाजपचे नगरसेवक चांगलेच नाराज झाले. उमेदवार नगरसेवकांना नमस्कार करत नसतील तर आम्हीही मतदान का करू? अशा मानसिकतेत भाजपचे नगरसेवक आहेत. त्यामुळे नाराजांची मनधरणी करण्याचे मोठे आव्हान दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांपुढे आहे.
या मतदारसंघात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष अशी लढत होत असल्याने एकमेव अपक्ष उमेदवारामुळे चुरस अधिक वाढली आहे. या मतदारसंघात सांगली जिल्ह्यात ४२३, तर सातारा जिल्ह्यात ४७२ मतदार आहेत. तीनही उमेदवारांकडून नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्यांसह सर्व मतदारांशी संपर्क साधला जात आहे.
तीनही उमेदवार सांगली जिल्ह्यातील नसल्याने स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या मार्फतच या मतदारांचा संपर्क सुरू आहे. अशातच उमेदवारी अर्ज दाखल करत असताना झालेल्या महायुतीच्या बैठकीत उमेदवार धैर्यशील कदम यांनी बैठकीला उशिरा हजेरी लावत नगरसेवकांकडे दुर्लक्ष करत त्यांना योग्य तो मान-सन्मान दिलाच नाही असा समज भाजप नगरसेवकांमध्ये आहे.
या बैठकीवरून आता सांगली जिल्ह्याच्या राजकारणात चांगलेच मान-अपमान नाट्य रंगले आहे. 'नमस्कार नाही, तर मतदान नाही' अशी भूमिकाच काही नाराज नगरसेवकांनी घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. दरम्यान या नाराज नगरसेवकांची मनधरणी करण्यासाठी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे आज सांगलीमध्ये आहेत. ते या नगरसेवकांशी चर्चा करणार आहेत. या तिरंगी लढतीत प्रत्येक मत महत्त्वाचे असताना भाजपमधील ही नाराजी शमवण्यात महायुतीच्या नेत्यांना यश येते की नाही हे पाहणे महत्वपुर्ण ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.