Congress-NCP Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

राजीनामा दिलेल्या काँग्रेसच्या सांगली जिल्हा महिला अध्यक्षा राष्ट्रवादीच्या वाटेवर

सांगली जिल्ह्यातील तीन कुटुंबामध्येच काँग्रेस विभागली आहे.

सरकारनामा ब्यूरो

सांगली : काँग्रेस पक्षाच्या मिरजेतील ज्येष्ठ नगरसेविका वहिदा नायकवडी यांनी महिला आघाडीच्या शहर जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांचे पती माजी नगरसेवक अय्याज नायकवडी यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचाही आज (ता. १२ आक्टोबर) राजीनामा दिला. दरम्यान, नायकवडी दांपत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचे संकेत दिले आहेत. (Sangli Congress Women District President Waheeda Nayakwadi resigns)

सांगली महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी अय्याज नायकवडी यांनी नगरसेविका वहिदा नायकवडी यांना संधी देण्याची मागणी काँग्रेसच्या नेत्यांकडे केली होती. मात्र, ती डावलली गेल्यानंतर अय्याज नायकवडी यांनी आज पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, काँग्रेस पक्षाच्या विचारधारेवर, धोरणावर आमचा पूर्ण विश्वास आहे. मात्र, सांगली जिल्ह्यातील तीन कुटुंबामध्येच काँग्रेस विभागली आहे. मुस्लिम समाजाचा मतांचा एकगठ्ठा म्हणून वापर सुरू आहे. महापालिका, महामंडळ, समित्या, पक्षांची पदे यामध्ये समाजास जाणीवपूर्वक डावलले जात आहे.

सग्यासोयऱ्यांना पदे द्यायचे, हे स्थानिक नेत्यांचे धोरण पक्षाच्या प्रगतीला मारक ठरत आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना अल्पसंख्याक समाजाची किंमत आहे. मात्र, स्थानिक नेत्यांना ती नाही. काँग्रेसमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून निष्ठेने काम करूनही न्याय मिळत नसल्याने आम्ही पक्षाच्या पदांचा राजीनामा दिला आहे. सक्रीय काम बंद केले आहे. कार्यकर्ते व प्रभागातील नागरिकांशी चर्चा करुन पुढील दिशा ठरवू, असेही अय्याज यांनी दिला.

दरम्यान, वहिदा नायकवडी यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा दिलेला नाही. त्यांना जनतेने निवडून दिले आहे, त्यामुळे त्याबाबत मतदार व कार्यकर्तेच निर्णय घेतील, असेही नायकवडी यांनी या वेळी सांगितले. अय्याज नायकवडी म्हणाले, आम्ही मूळचे राजाराम बापूंचे कार्यकर्ते आहोत. भविष्यात काँग्रेसच्या जवळच्या धर्मनिरपेक्ष विचार असलेल्या पक्षात जाण्याबाबत निर्णय घेऊ शकतो. मात्र, राष्ट्रवादीत प्रवेश करण्याबाबत त्यांनी स्पष्टपणे बोलणे टाळले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT