Sangli News Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sangli News: चंद्रहार पाटील 'वंचित' कडून? काँग्रेसच्या विशाल पाटलांचे काय होणार?

Sangli Lok Sabha Constituency 2024: चंद्रहार यांनी काहीही झाले तरी लोकसभा लढवणार असल्याचे सांगितले होते.

Rahul Gadkar

Sangli News: आगामी लोकसभेच्या तोंडावर सर्वच राजकीय पक्षांनी शड्डू ठोकला असताना आता डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांनीदेखील शड्डू ठोकला आहे. सांगली लोकसभा मतदारसंघाच्या आखाड्यात चंद्रहार पाटील उतरणार असल्याची घोषणा स्वतः पाटील यांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर त्यांच्या उमेदवारीसाठी अनेक पक्षात चर्चा सुरू आहे. दरम्यान, पुणे ते होणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या मेळाव्यात चंद्रहार पाटील यांना निमंत्रित केल्याची माहिती समोर आली आहे.

महाविकास आघाडीसोबत झालेल्या चर्चेमध्ये वंचित बहुजन आघाडीने जवळपास नऊ जागांवर दावा केला आहे. या नऊ जागांपैकी वंचित बहुजन आघाडीने सांगली लोकसभा मतदारसंघावर ही दावा केला आहे. त्यासाठी उमेदवारीची चाचपणीदेखील सुरू करण्यात आली असून, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारीसाठी गळ घालण्याची शक्यता आहे.

वंचित बहुजन आघाडीची सोमनारी (ता. 8) पुणे येथे बैठक होणार आहे. त्यासाठी चंद्रहार पाटील यांना या बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आले आहे. स्वतः चंद्रहार यांनी चर्चेला बोलावल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. राज्यात लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना काँग्रेस, शिवसेना (ठाकरे), राष्ट्रवादी आणि वंचित बहुजन आघाडीची आघाडी व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. वंचित आघाडी सांगलीसाठी दावा करीत असला तरी पाच वर्षांपासून काँग्रेसचे विशाल पाटील हे लोकसभेची तयारी करीत आहेत. आतापर्यंत संजयकाका पाटील यांना टक्कर देण्यासाठी त्यांनी जोरदार तयारी केली आहे. संजयकाका पाटील यांच्या विरोधकांनाही एकत्र करत त्यांनी लोकसभेचे मैदान अनेक व्यासपीठांवरून गाजवण्याचं जाहीर केले आहे. .

२०१९ च्या निवडणुकीत चांगली मते घेत काँग्रेस-राष्ट्रवादीला ‘बॅकफूट’ला ढकलले होते. त्यावेळी वंचित आघाडीकडून गोपीचंद पडळकर हे निवडणुकीच्या रिंगणात होते. गोपीचंद पडळकर यांना ३ लाखांवर मते पडली होती, हा मुद्दा प्रामुख्याने मांडण्यात आला आहे. ‘वंचित’कडून उमेदवाराचा शोधही सुरू आहे. त्यासाठी चंद्रहार पाटील यांचे नाव पुढे आले आहे.

चंद्रहार यांनी काहीही झाले तरी लोकसभा लढवणार असल्याचे आणि सगळ्या पक्षांचे दरवाजे खुले असल्याचे सांगितले होते. मात्र सध्याची परिस्थिती वेगळी आहे. गोपीचंद पडळकर भाजपमध्ये गेल्याने त्या ठिकाणी उमद्या उमेदवाराचा शोध वंचितकडून सुरू आहे. जर ही जागा वंचितकडे गेले तर काँग्रेसच्या विशाल पाटलांचं काय होणार? याकडेही कार्यकर्त्यांचे लक्ष आहे.

Edited by: Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT