Sangali News: सांगली लोकसभा मतदारसंघातील (Sangli Lok Sabha Election 2024) शिवसेना ठाकरे गट (Shivsena) आणि काँग्रेसमध्ये जागेवरून सुरू असलेल्या वादावर अखेर ठाकरे गटाने बाजी मारली आहे. ही जागा ठाकरे गटाकडेच ठेवून काँग्रेसला टक्कर दिली आहे. जवळपास या वादावर पडला असून काँग्रेसचे नेते नेमकी भूमिका काय घेणार? याकडे लक्ष लागून राहिले आहे. मात्र अशातच सांगली जिल्ह्याचे (Sangli Politics) नेतृत्व समजले जाणारे माजी जलसंपदा मंत्री आणि आमदार जयंत पाटील (Jayant Patil) यांची भूमिका मात्र संशयास्पद आहे.
सांगली लोकसभा मतदार संघात उमेदवार कोण असावा? यापासून ते मतदारसंघ कोणाकडे जाईल अशा चर्चा सुरू असताना या चर्चेत जाहीरपणे सहभागी न होता अलिप्त राहण्याची भूमिका घेतली. मात्र पडद्यामागून केलेल्या हालचाली सांगली जिल्ह्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरत आहेत. जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांना त्याचा वास आला असला तरी उघडपणे त्यांचे नाव न घेता अप्रत्यक्षपणे त्यांच्यावर टीकेचा वर्षाव सुरू आहे.
सांगली लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरू होते. अशातच शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगलीच्या दौऱ्यात डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची उमेदवारीची घोषणा केली. त्यावरून महाविकास आघाडीमध्ये गल्लीपासून सुरू झालेले रणकंदन दिल्लीपर्यंत जाऊन थडकले होते. त्यातच काँग्रेसने तहात सांगलीची जागा ठाकरे गटाला दिली. त्यानंतर काँग्रेसचे नेते काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे असले तरी गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या वादात सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि आमदार जयंत पाटील यांची भूमिका तोंडावर बोट ठेवण्याइतपत होती.
महाविकास आघाडी म्हणून सांगलीच्या जागे संदर्भात जयंत पाटील यांनी केवळ महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या गुप्त बैठका घेतल्याचे बोलले जाते. मात्र उघड उघड शिवसेना ठाकरे गटाची किंवा काँग्रेसच्या नेत्यांची मनधरणी करण्यास कुठेही पुढाकार घेतलेला दिसून आला नाही. एकंदरीतच सांगली जिल्ह्याच्या राजकारणातील जुनावाद या उमेदवारीच्या निर्णय भूमिकेवरून दिसून आला.
जिल्ह्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी प्रत्यक्षपणे जयंत पाटील यांनाच टिकेचा धनी ठरवल्याचे सांगितले जाते. झारीतील शुक्राचार्य कोण याचा लवकरच इंटेलिजन्स कडून शोध घेतला जाईल असं कोल्हापुरात विश्वजीत कदम यांनी सांगितलं होतं. अखेर काँग्रेसकडून ही जागा गेल्यानंतर जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांचा राग हा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावरच असल्याचे सांगितले जाते.
मागील लोकसभा निवडणुकीत अप्रत्यक्षपणे भाजपच्या संजय काका पाटील यांना मदत केल्याचा ठपकाही त्यांच्यावर ठेवला जात आहे. अशातच त्यांनी शिवसेना आणि काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या जागेवरील वादात कोणतीही उडी घेतली नाही. शिवाय आज देखील आपण कोणाच्या बाजूने असेल हे देखील स्पष्ट केलेले नाही. येत्या दोन दिवसात त्यांची भूमिका महाविकास आघाडी सोबत राहील, अशी शक्यता दिसून येत आहे. पण जयंत पाटलांच्या या भूमिकेमुळे मात्र महाविकास आघाडीत संशय निर्माण झाला आहे हे नक्की.
Edited by: Mangesh Mahale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.