Vishwajeet Kadam, Uddhav Thackeray Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sangli Lok Sabha Constituency : उद्धव ठाकरेंनी सांगलीचा उमेदवार परस्पर कसा ठरवला? डॉ. विश्वजित कदम कडाडले

Sangli Lok Sabha Election 2024 : चंद्रहार पाटलांनी मनाचा मोठेपणा दाखवावा; विश्वजित कदमांचं मोठं वक्तव्य

सरकारनामा ब्युरो

Sangli Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) आणि मित्रपक्षांमधील जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप ठरलेला नाही. जागांबाबत आघाडीत नुसत्याच चर्चेच्या फेऱ्या सुरू असताना शिवसेनेने मात्र पश्चिम महाराष्ट्रातील सांगली मतदारसंघावर दावा ठोकून मित्रपक्ष काँग्रेसशी चर्चा करण्याआधीच उमेदवार जाहीर केला. आघाडीतील वाटाघाटीच्या सूत्राकडे बोट दाखवून काँग्रेसने शिवसेनेच्या विशेषत: जागावाटपाची घाई करणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या मनमानीवर आक्षेप घेतला आहे. 'सांगली आमचीच' असे सांगून काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री विश्वजित कदमांनी (Vishwajeet Kadam) या मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार राहील, असे खडसावून सांगितले. या पलीकडे जाऊन कदमांनी आघाडी धर्माचा दाखला देत शिवसेनेला राजकीय शहाणपणाचे बोल सुनावले आहेत. हा मतदारसंघ कोणत्याही स्थितीत शिवसेनेच्या वाटेला जाणार नाही, यावर डॉ. विश्वजित कदम ठाम असून, या निमित्ताने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये प्राण फुंकण्याचा डॉ. कदम यांचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट आहे.

लोकसभा निवडणुकीत मोदी-शाहांना हरविण्यासाठी महाविकास आघाडीने (MVA) एकजुटीचा नारा बुलंद केला आहे. त्याकरिता आपापल्या ताकदीनुसार आणि जुन्या म्हणजे, युती, आघाडीच्या काळात ज्यांनी-त्यांनी लढविलेल्या जागांवर त्या-त्या पक्षांचा हक्क राहण्याची शक्यता होती. त्यादृष्टीने आघाडीतील शिवसेना (Shivsena) (ठाकरे), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) यांच्यातील जागावाटपाची बोलणी सुरू आहेत. त्यावरून अद्याप एकमत झाले नसतानाच, शिवसेनेने सांगली लोकसभा मतदारसंघातून (Sangli Lok Sabha Constituency) डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांना उमेदवारी देऊन प्रचार करण्याचा आदेशवजा सूचना केली आहे. त्यावरून काँग्रेसचे स्थानिक नेते, आमदार डॉ. विश्‍वजित कदम (Vishwajeet Kadam) संतापले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जागावाटपाचे सूत्र फायनल नसतानाही शिवसेनेने सांगलीचा (Sangli) उमेदवार का ठरविला? असा रोकडा सवाल करीत डॉ. कदम यांनी ठाकरेंनाच आव्हान दिले. या जागेवर काँग्रेसचा (Congress) हक्क कसा आहे, सांगलीत काँग्रेस कशी उजवी आहे, शिवसेनेने घाई करून काँग्रेसची अडचण का केली, हे मुद्दे पटवून देतानाच डॉ. कदम यांनी आपला आक्रमक पवित्रा ठेवला आहे. एकीकडे भाजपला रोखण्यासाठी व्यूहनीती आखली असतानाच, शिवसेनेचे कुरघोडीचे राजकारण घातकी ठरू शकते, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे. सांगलीच्या जागेचा वाद, काँग्रेसची भूमिका जाणून घेण्यासाठी ‘सरकारनामा’ने डॉ. विश्‍वजित कदम (Vishwajeet Kadam) यांच्याशी संवाद साधला. तेव्हा शिवसेना-काँग्रेसमधील राजकीय संघर्ष पुढे आला.

'सरकारनामा'शी बोलताना कदम म्हणाले, "2019 आणि 2024 दोन्ही वेळेस मी सांगलीची (Sangli) जागा लढवावी, अशी आमच्या पक्षश्रेष्ठींची इच्छा होती. परंतु पलूस-कडेगावच्या जनतेने माझ्या वडिलांना आणि मला 30 ते 40 वर्षांपासून साथ दिली आहे. त्यामुळे त्यांना सोडणं मला योग्य वाटलं नाही, मला त्यांची आणखी सेवा करायची आहे. 2024 च्या लोकसभेसाठी मदत करण्याचा शब्द मी विशाल पाटील (Vishal Patil) यांना एक वर्षापूर्वी दिला होता आणि मी शब्द पाळणारा माणूस आहे. शब्द पाळणं आमच्या रक्तात आहे. त्यामुळे मी विशाल पाटील यांच्या पाठीशी खंभीरपणे उभा आहे."

सांगलीसाठी कदम ठाम, चंद्रहार पाटलांना विधान परिषदेचे आश्वासन

विश्वजित कदम हे सांगलीच्या जागेवर ठाम असून, त्यांनी चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांना इतर ठिकाणी संधी देण्याचे आश्वासन दिले. ते म्हणाले, "उद्धव ठाकरेंबद्दल (Uddhav Thackeray) मला आदर आहे. जातीयवादी शक्तींविरोधात लढण्यासाठी आम्ही आघाडी केली आहे. तसेच चंद्रहार माझे मित्र आणि चांगले पैलवान आहेत. भविष्यात राज्यातील कोणत्याही सभागृहात, विधान परिषदेवर त्यांना संधी देण्यासाठी मी आघाडीतील ३ पक्षांच्या नेत्यांना विनंती करेन, यासाठी मी पुढाकार घेईन, पण त्यांनी आता मनाचा मोठेपणा दाखवावा."

कदम यांच्या वक्त्यावरून ते सांगली लोकसभेवर ठाम असून, कोणत्याही परिस्थितीत सांगलीची जागा काँग्रेससाठी सोडावी यावर ते ठाम असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे आता ठाकरे गट आपली भूमिका बदलून कदमांची विनंती मान्य करणार की, कदमांचा रोष ओढावून घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

(Edited By Jagdish Patil)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT