Sangli Shiv Sena candidate Sagar Vankhande and BJP candidate Sunita Vhanmane amid rising poll violence. Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

BJP Vs Shivsena : एकनाथ शिंदेंच्या उमेदवाराला घरात घुसून मारहाण : भाजप उमेदवाराचा मुलगा अन् मित्रांवर अॅट्रॉसिटी दाखल

BJP Vs Shivsena : सांगली महापालिका निवडणुकीत शिवसेना उमेदवार सागर वनखंडे यांच्यावर हल्ला झाल्याप्रकरणी भाजप उमेदवार सुनिता व्हनमाने यांचा मुलगा संदीप व्हनमाने व इतरांवर मिरज पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

शंकर भोसले

Eknath Shinde candidate attacked : सांगली महापालिकेचे शिवसेनेचे उमेदवार सागर मोहन वनखंडे यांना घरात घुसून मारहाण केल्याप्रकरणी भाजपचे उमेदवाराचा मुलगा आणि त्याच्या अन्य मित्रांवर मिरज शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

संदीप सोपान व्हनमाने असे मुख्य आरोपीचे नाव असून ते प्रभाग क्रमांक तीनच्या उमेदवार सुनिता व्हनमाने यांचे चिरंजीव आहेत. तर ओंकार संजय कांबळे, विशाल साळुंके, स्टीवन देवकुळे, समित खानविलकर, विशाल सौंदडे आणि अभी होळकर अशी अन्य आरोपींची नावे आहेत.

याबाबत सागर वनखंडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते साई नंद कॉलनी येथील माऊली बंगला या त्यांच्या निवासस्थानी महानगरपालिका निवडणूक अनुषंगाने बूथ कमिटीची मीटिंग घेत होते. त्याचवेळी संदीप व्हनमाने हा बेकायदेशीर जमाव जमवून गर्दी करून घराच्या गेटवरून जबरदस्तीने आत आला.

तिथे उपस्थित मित्र सौरभचंद यास धक्काबुक्की करून मारहाण केली. याबाबत सागर यांनी काय झाले तू आमचे घरात का आला आहेस? असे म्हणून विचारणा केली. यावर तू बाहेर ये तुला दाखवतो तुझी लायकी आहे का निवडणूक लढवायची तुला दाखवतो कशी निवडणूक लढवतोस, अशी धमकी दिली.

यावेळी सागर यांच्या घरी उपस्थित जुबेर चौधरी, मकरंद ठोंबरे, प्रथमेश पांढरे यांनी आरोपींना अडवण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या अंगावर जाऊन धक्काबुक्की करून त्यांना सुद्धा तुम्ही मध्ये पडला तर तुम्हाला सुद्धा सोडणार नाही अशी धमकी दिली आहे.

या प्रकरणी मिरज शहर पोलीस स्टेशन येथे भारतीय न्यायसंहिता 2023 चे कलम 189(1), 189(2), 190, 191(2), 115, 352, 351(3) सह अनुचित जाती व अनुचित जनजाती प्रतिबंध अधिनियम सुधारित 2015 चे कलम 3(2),(v-a) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत संदीप व्हनमाने यांनी समाज माध्यमांवर त्यांची बाजू मांडली आहे. ते म्हणाले, बुधवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास आपल्या प्रभागातील एका विशिष्ट ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना बोलावून घेऊन विरोधकांकडून आमिष दाखविले जात असल्याची माहिती मिळाली. या माहितीची पुष्टी - खातरजमा करण्यासाठी आपण त्या ठिकाणी गेलो. त्यावेळी त्या ठिकाणची गर्दी व वातावरण पाहून माझा संशय बळावला.

याबाबत तिथे उपस्थित काही ज्येष्ठ नागरिक व युवकांना आपण विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे येऊन आपणच स्वतःहून येऊन पहा, असं आव्हान करुन त्या व्यक्तीच्या निवासस्थानी गेट उघडून आत जाण्यास प्रवृत्त केलं.

अशावेळी आपणही आईच्या प्रेमापोटी भान हरपून भावनेच्या भरात तिथं गेलो व संपूर्ण प्रकार घडला. वास्तविक, महापालिका निवडणुकीमधील पराभव विरोधकांना स्पष्टपणे दिसू लागला आहे. त्यामुळेच विरोधकांनी जाणीवपूर्वक ठरवून आपल्याला टार्गेट केलं, असाही आरोप व्हनमाने यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT