Senior leaders Ajitrao Ghorpade, Vilasrao Jagtap, and Rajendraanna Deshmukh Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sangli ZP : भाजपच्या जवळ गेलेले 'संजयकाका' राष्ट्रवादीकडून साईडलाईन : सांगलीत घोरपडे, नाईक, देशमुखांकडून वेगळ्या भूमिकेच्या हालचाली

सांगली जिल्हा परिषदेत सत्तेसाठी संजय पाटील यांना वगळून अजितराव घोरपडे, विलासराव जगताप व अन्य नेत्यांनी स्वतंत्र बैठक घेतली आहे. स्थानिक नेत्यांच्या या वेगळ्या भूमिकेमुळे महायुतीतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे.

Hrishikesh Nalagune

Sangli ZP : सांगली जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नसला, तरी सत्तेचे त्रांगडे वाढत निघाले आहे. भाजपने महायुती म्हणून सत्ता स्थापनेचा विश्वास व्यक्त केला असला, तरी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांचे त्यावर एकमत झालेले नाही. ६ सदस्यांचे ६ नेते असून, त्यांच्या एकमतासाठी खल सुरू आहे. महाविकास आघाडीसोबत जावे, असा काहींचा सूर आहे. त्याचवेळी महायुतीसोबतही चर्चा सुरु आहेत. त्याबाबतचा निर्णय उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार याच घेणार आहेत.

राष्ट्रवादीत खल कायम :

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत माजी खासदार संजय पाटील यांनी महायुतीबाबत चर्चा सुरू केल्याने राष्ट्रवादीचे अन्य नेते म्हणजे अजितराव घोरपडे, विलासराव जगताप, राजेंद्रअण्णा देशणुख, शिवाजीराव नाईक यांनी नुकतीच स्वतंत्र बैठक घेतली. तिथे संजय पाटील यांना बोलावले नाही. त्यांना सोडून वेगळी भूमिका घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या. स्थानिक राजकीय सूर लक्षात घेता राज्य पातळीवर नेत्यांनी त्याचा विचार करावा, असा अहवाल पाठवण्याचा निर्णय या नेत्यांनी घेतला.

त्याबाबत अंतिम चर्चा करण्यासाठी संजय पाटील यांना रात्री उशीरा बैठकीला बोलावण्यात आले. त्यांच्याशी चर्चेनंतर फाटाफूट होण्यापेक्षा आणि राष्ट्रवादीत उभी फूट पडण्यापेक्षा एकमत करावे, असा सूर उमटला. एखाद्या नेत्याने वेगळ्या दिशेने धावायचा प्रयत्न करू नये, असा निर्णय घेण्यात आला. सुनेत्रा पवार यांच्याकडून जे आदेश येतील त्यानुसार अंतिम निर्णय घेतला जाईल, असे या बैठकीत ठरले. पण महाविकास आघाडी म्हणूनच सत्ता स्थापन करावी अशी भूमिका या बैठकीत दिसून आली.

यादरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, आमदार जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते शिवाजीराव नाईक यांच्याशी जिल्हा परिषदेतील सत्ता स्थापनेबाबत चर्चा केल्याची माहिती आहे. काँग्रेससह दोन्ही राष्ट्रवादीने निवडणूक पूर्व महाविकास आघाडी केली होती. त्यामुळे सत्ता स्थापन करताना वेगळा विचार कुणी करू नये, असे आवाहन त्यांनी नाईक यांना केले. नाईक यांच्या स्नुषा जिल्हा परिषद सदस्या झाल्या आहेत. त्यामुळे शिवाजीराव नाईक यांचा निर्णय महत्त्‍वाचा मानला जातोय. त्यांनी जयंतरावांना काय शब्द दिलाय, याकडे लक्ष लागले आहे.

फडणवीस लक्ष घालणार?

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी 'देवाभाऊ हे मॅग्नेट आहेत, त्यांच्याकडे विषय गेला की तो संपतो', असे सुतोवाच करत जिल्हा परिषदेचा तिढा त्यांच्यापर्यंत जाईल, असे संकेत दिले आहेत. जिल्ह्यातील स्थिती पाहता, मुख्यमंत्र्यांना यात मध्यस्थी करावी लागेल का, याकडेही लक्ष असणार आहे. विशेषतः शिंदेंच्या शिवसेनेची समजूत आधी काढावी लागणार आहे. कारण, आमदार सुहास बाबर यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून ज्या पद्धतीने राजकारण सुरू आहे, त्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे, त्यामुळे काय निर्णय होतो याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT