Political leaders during intense negotiations ahead of Sangli Zilla Parishad President and Vice-President election amid BJP, NCP and Shiv Sena power tussle. Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sangli ZP : सांगलीत भाजपला चमत्कारचं तारणार? अध्यक्ष निवडीची तारीख ठरूनही राष्ट्रवादी, शिवसेना चंद्रकांतदादांच्या हातात सापडेना!

Sangli ZP President Election : सांगली जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीची तारीख ठरली असली तरी भाजपला आवश्यक संख्याबळ मिळत नसल्याने राष्ट्रवादी व शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Rahul Gadkar

Sangli Politics : सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. 18 मार्च रोजी अध्यक्ष निवड प्रकिया होणार आहे. ही तारीख जवळ आली असली तरी अद्याप भाजपच्या हाताला राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना सापडलेली नाही. महायुतीच्या घटक पक्षांमध्येच भाजप विरोधात नाराजी असल्याने विरोधातील काही पक्षांसोबत गुप्त बैठकांचा धडाका वाढला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेमध्ये भाजपला नशीब आणि चमत्कारच वाचवू शकणार अशी परिस्थिती आहे.

सत्ता स्थापनेसाठी युती, आघाडीतील नेतेमंडळींनी जोरदार राजकीय हालचाली सुरू केल्या आहेत. जयंत पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या नेत्यांनी गुप्त बैठकांचा धडाका सुरू केला आहे. सत्तास्थापनेत 'किंगमेकर 'च्या भूमिकेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने, शिवसेनेने अजून भूमिका स्पष्ट न केल्याने सत्ता स्थापनेचा 'सस्पेन्स' कायम आहे.

जो पहिला अध्यक्ष देईल त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पाठिंबा देईल असे राष्ट्रवादी काँग्रेसचे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटलांनी स्पष्ट केले आहे. शिवाय जागावाटपात भाजपकडून मिळालेली वागणुकीची मनात सल आहे. त्यामुळे पालकमंत्री आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केवळ शांत राहण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत कोणत्या हालचाली होणार याकडे सांगलीकरांचे लक्ष आहे.

असे आहे पक्षीय बलाबल

जिल्हा परिषदेच्या निकालात सर्वाधिक 18 जागा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडे आहेत. भाजपाला 16, काँग्रेसला 11, शिवसेनेला 7, राष्ट्रवादी काँग्रेसला 6, तर जनसुराज्य, शिवसेना (उबाठा) आणि रयत क्रांती पक्षाला प्रत्येकी 1 जागा आहे. महाविकास आघाडीला केवळ एका मताची गरज सत्ता स्थापनेसाठी आहे. तर सत्ता स्थापन करण्यासाठी काठावरचे 31 संख्याबळ महायुतीकडे आहे.

अशी असेल अध्यक्ष-उपाध्यक्ष निवड

अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी 18 मार्च रोजी सकाळी 11 ते1 2 यावेळेत अर्ज दाखलची प्रक्रिया सुरू होईल. दुपारी 12 ते 12.30 यावेळेत अर्जाची छाननी होईल. अर्ज मागे घेण्यास दुपारी 12.30 ते 1 वाजेपर्यंत वेळ देण्यात आला आहे. दुपारी 2 वाजता अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीसाठी सभा बोलवण्यात येईल.

जयंत पाटलांकडे इच्छुकांची फौज

पहिली अडीच वर्षे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित आहे. त्यामुळे इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. नेत्यांकडूनही चाचपणी सुरू आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून संध्या आनंदराव पाटील, संगीता संभाजीराव पाटील , देविका भोजराज राजेघोरपडे , प्रतिमा सुजित मोरे, मीना सचिन पाटील इच्छुक आहेत. तर भाजपकडून स्वप्नाली मनोज मासाळ, माधवी ब्रह्मदेव पडळकर, कविता किरण पाटील, शिंदे शिवसेनेकडून शीतल अमोल बाबर, राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेश्वरी रणधीर नाईक, सुजाता निवास पाटील, सवित्री तम्मणगौडा रवि-पाटील यांची नावे चर्चेत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT