BJP leader Gopichand Padalkar raises allegations against Shiv Sena member Prithviraj Patil over a disputed Kunbi certificate in Sangli Zilla Parishad politics. Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sangli ZP : गोपीचंद पडळकरांचा सांगली जिल्हा परिषदेच्या सत्तेवर पहिला घाव : आघाडीला साथ दिलेले पृथ्वीराज पाटील अडचणीत

Sangli ZP सांगली जिल्हा परिषदेत राजकीय संघर्ष तीव्र झाला असून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी शिवसेनेच्या पृथ्वीराज पाटील यांच्या कुणबी दाखल्यावर प्रश्न उपस्थित केला आहे.

सरकारनामा ब्युरो

- नागेश गायकवाड

Sangli ZP : सांगली जिल्हा परिषदेतील आघाडीच्या सत्तेला सुरुंग लावण्यास सुरुवात झाली आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी ही सत्ता उलथवण्यासाठीचा पहिला घाव घातला आहे. अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीवेळी अनुपस्थित राहिलेले शिवसेनेचे सदस्य पृथ्वीराज पाटील यांचा कुणबी दाखला बनावट असल्याचा आरोप पडळकर यांनी केला आहे. त्यामुळे पाटील यांचे जिल्हा परिषदेचे सदस्यत्वच धोक्यात आले आहे. तर कुणबी दाखल्याची पडताळणी झाल्याचा दावा पृथ्वीराज पाटील यांचे वडील आणि शिवसेनेचे स्थानिक नेते तानाजी पाटील यांनी केला आहे.

गोपीचंद पडळकर यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेऊन याबाबतचे आरोप केले. ते म्हणाले, आटपाडी तालुक्यातील दिघंची गटातून निवडून आलेले शिवसेनेचे सदस्य पृथ्वीराज पाटील हे मराठा आहेत. पण त्यांनी कुणबी दाखला जोडला आहे. या दाखल्यासाठी खोटी कागदपत्रे जोडण्यात आली आहेत. जात पडताळणी समितीनेही कोणती कागदपत्र तपासली? असा सवाल करत पडळकर यांनी समितीवरच आक्षेप घेतले. तसेच जात पडताळणी समितीने पृथ्वीराज पाटील यांचा दाखला रद्द करतो. पण 30 लाख रुपये द्या, अशी मागणी आमच्या उमेदवाराकडे केली होती, असा आरोपही त्यांनी केला.

आटपाडी पोलिसांनी पृथ्वीराज पाटील यांच्यावर 420 प्रमाणे सुमोटो गुन्हा दाखल करावा. जर हा गुन्हा दाखल झाला नाहीतर दोन दिवसांत हजारो कार्यकर्ते पोलीस स्टेशनसमोर आंदोलनाला बसतील, असा इशाराही आमदार पडळकर यांनी दिला. याशिवाय सांगलीच्या जात पडताळणी समिती सदस्यांवर गुन्हे दाखल करून त्यांचीही चौकशी करावी. पृथ्वीराज पाटील यांचा कुणबी दाखला रद्द करावा आणि त्यांचे जिल्हा परिषद सदस्यत्वही रद्द करावे, अशा मागण्याही त्यांनी केल्या.

'सकाळ'सोबत बोलताना तानाजी पाटील यांनी मात्र आमदार पडळकर यांचे आरोप फेटाळून लावले. अध्यक्ष निवडीसाठी आमच्यावर दबाव होता. पण आम्ही भाजपचे ऐकले नाही. अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीवेळी भाजपसोबत आणि पडळकरांसोबत न गेल्याने खोटे आरोप केले जात आहेत. पृथ्वीराज पाटील यांच्या कुणबी दाखल्याची पडताळणी झाली आहे, असा दावा पाटील यांनी केला आहे.

सांगलीच्या सत्तेत पुन्हा ट्विस्ट :

सांगली जिल्हा परिषदेत अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आघाडीच्या संगीता पाटील यांना 34, तर भाजपच्या स्वप्नाली मासाळ यांना केवळ 25 मते मिळाली होती. यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या 6 पैकी 4 आणि शिवसेनेच्या 5 पैकी 2 सदस्यांनी महाविकास आघाडीची साथ दिली होती. अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीवेळी शिवसेनेचे गटनेते जयदीप भोसले, पृथ्वीराज पाटील दोघे अनुपस्थित राहिले होते. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे शशिकांत जमदाडे आणि विनायक मासाळ यांनी पक्षाचा ‘व्हीप’ नाकारून भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवारांना मतदान केले.

या निवडणुकीनंतर लगेचच पुढच्या वर्षभरातच ही सत्ता उलथवण्याचे प्रयत्न सुरु असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरु झाली होती. पण विनायक मासाळ यांनी आघाडीसोबत असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे 25 पैकी आणखी एक सदस्य कमी झाला होता. मात्र पडळकर यांनी आघाडीसोबत गेलेला शिवसेनेचा एक सदस्यच कमी करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. आता यावर पोलीस काय पाऊल उचलणार, जात पडताळणी समिती कसे प्रत्युत्तर देणार? की पृथ्वीराज पाटील यांचा दाखला पुन्हा वैधच ठरणार हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT