Jaykumar Gore,Babasaheb Deshmukh, Shahajibapu Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sangola Election : जयकुमार गोरे, बाबासाहेबांचे डावपेच की घायाळ शहाजीबापूंची धडपड? : सांगोल्यात लागल्या पैजा

Sangola Politics : सांगोला नगरपरिषद निवडणुकीनंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे. भाजप, शिवसेना आणि स्थानिक गटांमध्ये जोरदार रणनीती, गुप्त बैठका आणि विजयाबाबत चर्चा सुरू आहेत.

सरकारनामा ब्यूरो

Sangola Election News : सांगोला, (ता. 3) : नगरपरिषदेचे मतदान पार पडले असले तरी शहरातील राजकीय तापमान अजूनही उच्चांकावरच आहे. मतदान संपताच मतांची आकडेमोड, गुप्त झालेल्या बैठका, प्रभागनिहाय वेगळी आखलेली रणनिती आणि अनौपचारिक ‘लक्ष्मी दर्शन’च्या चर्चांनी शहरात नवा राजकीय रंग चढवला आहे. दुकाने, हॉटेल्ससह मतदानोत्तर विविध ‘राजकीय चौपाट्यां’वर चर्चांना उधाण आले आहे. नेतेमंडळी विजयाचे दावे करीत असले तरी जय - पराजयाबाबत नागरिकांमध्ये पैजाही लावल्या जात आहेत.

सांगोल्यात भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला शेकाप व दीपक आबा साळुंखे-पाटील गटाने दिलेल्या पाठिंब्यानंतर शिवसेनेने या महायुतीविरोधात आक्रमक भूमिका घेत चांगलेच राजकीय वातावरण पेटवले होते. महायुती विरुद्ध शिवसेना असा सरळ सामना उभा ठाकल्याने मतदानाचा दिवस म्हणजे निवडणुकीचा खरा थरार ठरला. शहरानेही मोठ्या उत्साहात प्रतिसाद देत तब्बल ७७.७० टक्के मतदान नोंदवले. मतदानानंतर लगेचच ‘कोण जिंकणार?’ या एकाच प्रश्नावर शहरातील प्रत्येक चौक, हॉटेल आणि गटगांमध्ये चर्चेचा सिलसिला जोरदार सुरू झाला आहे.

कोणत्या प्रभागात कोणाची गाठ कोणाशी बसली? कोण कुणाला आतून पाठिंबा देत राहिला? कोणत्या गटाने किती मते घेतली? कुठे रुसवेफुगवे शांत केले, तर कुठे त्याचा थेट परिणाम झाला? कोणत्या उमेदवारीमुळे कोणाला फटका बसणार? पक्षीय राजकारणात कोणता उमेदवार चुकीचा लागला? अशा सर्व संयुक्त-समीकरणांची सध्या नागरिक पातळीवरही चर्चा रंगत आहे. विशेषत: नगरपरिषदेसाठीची दुरंगी लढत आणि काही अपक्ष उमेदवारांनी निर्माण केलेली अनपेक्षित परिस्थिती याबाबत ‘मतांची जातनिहाय व गटानुसार फोडणी’ देत अंदाज मांडले जात आहेत.

मतांचे कोडे सोडवण्यासाठी दोन्ही बाजूंची धडपड सुरू असली तरी अंतिम निर्णय मतपेट्या उघडल्यावरच समजणार आहे. पुढील काही दिवस शहरातली प्रत्येक पाऊलवाट, प्रत्येक गल्लीतला संभाषणाचा सूर, आणि प्रत्येक राजकीय हालचाल फक्त एका दिशेनेच फिरताना दिसणार की नगराध्यक्ष कोण?

प्रमुख नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

नगरपालिकेची निवडणूक असली तरी तालुक्यातील मोठ्या नेत्यांची प्रतिष्ठा या निकालावर थेट अवलंबून आहे. शेकापचे डॉ. बाबासाहेब देशमुख व माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांनी भाजपला दिलेला पाठिंबा आणि त्याविरोधात शिवसेनेचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी टाकलेला आक्रमक राजकीय डाव यामुळे सांगोल्यात नवे समीकरण आकाराला आले. त्यातच पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे तालुक्याकडे वाढलेले लक्ष या सर्व घटकांमुळे प्रमुख नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागल्याचे दिसून येत आहे.

नगराध्यक्ष पदासह नगरसेवकांच्याही सर्व जागा आमची युती निश्चितपणे जिंकणार आहे. आम्ही सर्वांनी केलेले एकत्रित काम, मतदारांनी दिलेला जोरदार प्रतिसाद यामुळे विजय हा आमचाच असणार आहे. विरोधकांनी विकासाचे मुद्दे सोडून भावनिक करण्याचा प्रयत्न केला, पण सूज्ञ मतदार या निवडणुकीत त्यांना त्यांची जागा निश्चितपणे दाखवतील, असे आमदार बाबासाहेब देशमुख यांनी सांगितले.

शहाजीबापू पाटील याबाबत बोलताना निवडणुकीत झालेल्या युतीबाबत मी आता बोलणार नाही. ही निवडणूक कार्यकर्त्यांची होती. आमच्या शिवसेना पॅनलला मतदारांनी भरघोस प्रतिसाद दिला आहे. आमच्या विरोधात सर्व पक्षीय नेतेमंडळी एकवटले असले तरी जनतेने हाती घेतलेल्या या निवडणुकीत आमचा विजय होणारच आहे. नगराध्यक्षासह नगरसेवकांचे बहुमत निश्चितच आमच्या बाजूने असणार आहे.

या निवडणुकीमध्ये आमच्या युतीला नागरिकांनी भरघोस प्रतिसाद देत मतदान केले आहे. फक्त नगराध्यक्षच नाही तर आमच्या सर्व नगरसेवकांच्या जागाही निवडून येणार आहेत. कोणी कितीही दावे करू द्या. मतमोजणी दिवशी आमचे सर्व उमेदवार निवडून आलेले दिसतील असा विश्वास माजी आमदार दीपक साळुंखे यांनी व्यक्त केला.

नगराध्यक्षपदासाठी भाजप (BJP) व शिवसेना या दोन प्रमुख पक्षांचे उमेदवार समोर असताना आम्ही त्या विरोधात लढत आहोत. त्यामुळे एकूण राजकीय परिस्थिती पाहता दोघांच्या भांडणात आम्हाला लाभ होईल असे आम्हाला वाटत आहे. जागृत मतदाराने मतदानरूपी दिलेले दान आम्हाला मतमोजणी दिवशीच दिसून येईल. असे प्रा. पी. सी. झपके, यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT