सांगोला : ‘‘भाऊ, आधी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतील हॉटेलची उधारी द्या, मग पुढच्या कार्यक्रमाला जावा,’’ असे म्हणत सांगोला (Sangola) तालुक्यातील एक हॉटेल चालक व शेतकरी संघटनेच्या माजी पदाधिकारी अशोक शिनगारे यांनी माजी राज्यमंत्री, आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांच्याशी पंचायत समितीच्या आवारात गाडीतून उतरताच हुज्जत घातली. त्यामुळे त्या ठिकाणी एकच गोंधळ उडाला. दरम्यान या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयातून व्हायरल झाला असून त्यानंतर खोत यांच्यावर चहुबाजूंनी टीका केली जात आहे. (Sadabhau Khot Latest News)
मात्र या घटनेवर बोलताना सदाभाऊ खोत यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. सदाभाऊ खोत म्हणाले, 'मी त्यांना ओळखत नाही. हे संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेसचे षडयंत्र आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जाणीवपूर्वक गोंधळ घालण्याचा आणि आपल्या अंगावर येण्याचा प्रयत्न केला. याबाबत सांगोला पोलिस स्थानकात तक्रार दिली असून, एका व्यक्तीला ताब्यातही घेण्यात आले आहे. अशा प्रकारे सदाभाऊचा आवाज राष्ट्रवादी काँग्रेसला कदापीही दाबता येणार नाही. या प्रस्थापितांविरोधात आम्ही शेवटपर्यंत लढा देतच राहु, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सदाभाऊ खोत यांच्याबाबतीत नेमके काय घडले?
पंचायत राज समितीचे पथक आज सांगोला तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यामध्ये आमदार अनिल पाटील, आमदार डॉ. देवराव होळी, आमदार किशोर दराडे व आमदार सदाभाऊ खोत होते. तालुक्यातील महूद ग्रामपंचायतीची पाहणी केल्यानंतर सांगोला तालुक्यातील पंचायत समितीच्या कार्यालयाकडे हे पथक आले.
सर्वप्रथम आमदार सदाभाऊ खोत यांची गाडी पंचायत समितीच्या आवारात आली. गाडीमधून आमदार सदाभाऊ खोत उतरताच मांजरी (ता. सांगोला) येथील हॉटेल चालक व शेतकरी संघटनेचे त्यावेळचे पदाधिकारी असलेले व सध्याचे ग्रामपंचायत सदस्य अशोक शिनगारे यांनी ‘भाऊ, तुमचे तालुक्यात स्वागत. परंतु लोकसभेच्या २०१४ च्या निवडणुकीतील माझी उधारी तेवढी अगोदर द्या. मग तुम्ही पुढील कार्यक्रमासाठी जावा. आधी आमचा निर्णय लावा. तुम्ही फोनही घेत नाही आणि घेतला तरी व्यवस्थितही बोलत नाही.’ असे शिनगारे यांनी सदाभाऊ खोत यांना सुनावले.
हॉटेलचालक शिनगारे यांनी सदाभाऊ खोत यांना अडविल्याने पंचायत समिती परिसरात एकच गोंधळ उडाला. त्यात सदाभाऊ खोतांनाही काय बोलावे सुचेना. मात्र, सदाभाऊ खोत यांनी या हाॅटेल मालकाची कशीतरी समजूत काढून स्वतःची सुटका करून घेतली. २०१४ साली लोकसभा निवडणुकीमध्ये आमदार सदाभाऊ खोत हे माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी उभे राहिले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.