नुकताच सांगली जिल्ह्यातील माजी खासदार संजय काका पाटील हे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणता निर्णय घेणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते. एकंदरीतच झालेल्या मेळाव्यात त्यांनी 'एकला चलो'चा नारा दिला होता. त्यामुळे त्यांनी आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवून राजकीय चर्चांना बळ दिले होते. त्यातच आज राज्य सरकारच्या विरोधात कर्जमाफी संदर्भात आंदोलन करून महायुतीशी फारकत घेण्याचे संकेत दिले आहेत.
शेतकरी कर्जमाफी या प्रमुख मुद्द्यासह शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्यासाठी तासगाव येथे आयोजित चक्काजाम आंदोलनाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. आपल्या शेळ्या मेंढ्या व पाळीव जनावरांसह हजारोंच्या संख्येने आलेले शेतकरी शेकडो ट्रॅक्टर, यामुळे शहर व ग्रामीण भागातून येणारे रस्ते पूर्णपणे ब्लॉक झाले होते. प्रचंड मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र दिसून येत होते.
निसर्गाचा लहरीपणा आणि सरकारी धोरण यामुळेच शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करणारी सरकारची जबाबदारी आहे. बळीराजाच्या सामान्य जनतेच्या बाजूने बोलणारा आवाज क्षीण झालाय. या जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्यांच्या सर्वसामान्यांच्या प्रश्नाला वाचा फोडल्याशिवाय हा संजय पाटील गप्प बसणार नाही. असा इशारा माजी खासदार संजय काका पाटील यांनी आज चक्काजाम आंदोलन करत दिला आहे.
या चक्काजाम आंदोलनावेळी बोलताना मा.खासदार संजय काका पाटील म्हणाले, इथं आलेले सर्वजण आपण शेतकऱ्यांची मुल आहोत. या जगात प्रत्येक जण स्वतःसाठी जगतोय त्यासाठी कष्ट करतोय पण शेतकरी मातीत घाम गाळून स्वतःबरोबरच जगाला ही जगवतोय पण आज या जगाच्या पोशिंदाचं जगणं अवघड झाले. गेल्या चार-पाच वर्षात निसर्गाच्या लहरीपणा आपण अनुभवतोय कधी नव्हे एवढा पाऊस पडतोय, ऑक्टोबर महिन्यात संपत आला तरी रानातलं पाणी संपेना आणि आमच्या शेतकऱ्याच्या डोळ्यातले अश्रू ही थांबेनात ही वस्तुस्थिती आहे. यावर्षी नुकसान झाले पुढच्या वर्षी चांगलं काहीतरी होईल म्हणून शेतकरी बँकेतून कर्ज काढतोय ते पैसे परत नाहीत पतसंस्था खाजगी सावकार यांच्या दारात जातोय. शेतीतून मिळणारे उत्पन्न आणि खर्च याचा मेळ लागत नाही त्यामुळे कर्जाचे दुष्टचक्र संपत नाही.
या सगळ्यातून शेतकऱ्याला बाहेर काढायचं असेल तर मायबाप सरकारने कर्जमाफी करणे हाच त्यावरचा एक मात्र उपाय आहे. आणि त्यासाठी शेतकऱ्याच्या खांद्याला खांदा लावून नवे तर त्याच्यापुढे एक पाऊल राहून लढायची भूमिका मी आज जाहीर करत आहे तुम्ही सगळेजण इथे आलाय ते तुमचा माझ्यावर विश्वास आहे म्हणून हा विश्वास ढळू देणार नसल्याची ग्वाही यावेळी संजय काका पाटील यांनी दिली.
मोर्चासमोर बोलताना युवा नेते प्रभाकर बाबा पाटील म्हणाले, मी स्वतः शेतकरी आहे. माझी द्राक्षाची बाग परवडना म्हणून मी आंब्याची बाग लावली. पण द्राक्ष बरी होती का काय अस आता वाटायला लागले आहे. द्राक्षाची बाग असताना आणि आताही शेतात केलेल्या खर्चाचा हिशोब ठेवत नाही कारण हिशोब बघायला लागलं की डोकं काम करत नाही.
शेती परवडत नाही हे समोर डोळ्याला दिसते. माझ्या समोर काही पर्याय आहेत पण इथे बसलेल्याच नव्हे तर 90% लोकांना परवडत नसली तरी शेती करावीच लागते. पूर्वी उत्तम शेती दुय्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी म्हणलं जायचं पण आता उलट झालंय चार पाच एकर जमीन असलेल्या शेतकऱ्यांच्या पोराला सुद्धा पोरगी मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. कारण पोरीच्या वडिलाला ही शेतीची अवस्था माहिती आहे.
सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता तासगाव येथील बस स्थानक चौकात चक्काजाम आंदोलनाला सुरुवात झाली. शेतकरी आपले वाहन ट्रॅक्टर, जनावरांसह प्रचंड मोठ्या संख्येने आले होते. ट्रॅक्टर व बैलगाडी तसेच शेळ्या मेंढ्या यांचीच संख्या इतकी प्रचंड होती की तासगाव शहराच्या सर्वप्रमुख रस्त्यांवर बघेल तिकडे शेतकरी व त्यांची वाहने दिसत होते. शहराच्या बाहेर आणि किलोमीटर पर्यंत वाहनाच्या रांगा लागल्याचे चित्र दुपारपर्यंत दिसत होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.