CM Uddhav Thackeray, Sanjay Pawar Latest Marathi News
CM Uddhav Thackeray, Sanjay Pawar Latest Marathi News Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

संजय पवारांची प्रतिक्षा कायम : २० वर्ष विधानसभेची अन् आता राज्यसभेची...

सरकारनामा ब्युरो

मुंबई : अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या राज्यसभा निवडणुकीत (RaJyasabha Election) भाजपचे (BJP) पियुष गोयल (Piyush Goyal), अनिल बोंडे (Anil Bonde) आणि धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) हे तिन्ही उमेदवार विजयी ठरले आहेत. महाविकास आघाडीची तब्बल ११ मत फोडतं भाजपने तिसरी आणि महाडिक यांनी धोक्याची जागा जिंकली आहे. त्यामुळे तब्बल ८ वर्षांनंतर महाडिक कुटुंबियांनी गुलाल उधळला आहे.

तर महाविकास आघाडीमधून संजय राऊत, प्रफुल्ल पटेल आणि इम्रान प्रतापगढी विजयी झाले आहेत. मात्र या निवडणुकीत शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार पराभूत झाले आहेत. त्यांना पहिल्या पसंतीची केवळ ३३ मत मिळाली. त्यामुळे शिवसेनेचे एक कट्टर शिवसैनिक संजय पवार पराभूत झाल्याची भावना पक्षातून आणि कोल्हापूरमधून व्यक्त होत आहे. याशिवाय संजय पवार यांची संसदीय कारकिर्द सुरु होण्याची प्रतिक्षा देखील कायम राहिल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

सध्या कोल्हापूरचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख असलेले संजय पवार हे कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जातात. ३३ वर्षापूर्वी म्हणजे १९८९ ला त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर सगल ३ वेळा ते वेगवेगळ्या प्रभागांमधून कोल्हापूर महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले. एकदा विरोधी पक्षनेते म्हणूनही त्यांनी काम केले. महापालिकेत असताना आणि त्यानंतरही शहराच्या सर्व प्रश्नावर आंदोलन करण्यात त्यांचा नेहमीच पुढाकार असे. पवार यांच्या आंदोनल करण्याच्या, पोटतिडकीने प्रश्न मांडण्याच्या पद्धतीने भाजप, काँग्रेसने अनेकदा त्यांना पक्षात घेण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जाते, पण पवार यांनी शिवसेनेतच राहणं पसंत केले.

संजय पवार यांच्या कामाची दखल मातोश्रीवर देखील घेण्यात येत होती. त्यातून मागच्या २० वर्षांपासून त्यांचे नाव कोल्हापूर शहर विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक उमेदवार म्हणून घेतले जात होते. पण सुरेश साळोखे आणि राजेश क्षीरसागर यांना उमेदवारी मिळाली आणि ते दोन दोन वेळा निवडूनही आले त्यामुळे पवारांना संधी मिळाली नाही. या दरम्यान करवीर तालुका प्रमुख, ४ वर्षे शहरप्रमुखपदी काम केले. त्यानंतर ते १४ वर्षांपासून जिल्हाप्रमुख म्हणून कार्यरत आहेत.

युतीचे सरकार असताना राज्यमंत्रिपदाच्या दर्जाचे आण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाचे उपाध्यक्षपद देवून पक्षांने त्यांच्या कामाचे बक्षिस देण्याचा प्रयत्न केला. मात्र महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर त्यांचे हे पद गेले. त्यानंतर मागील महिन्यात संजय पवार यांचे नाव थेट राज्यसभेचा उमेदवार म्हणून चर्चेत आले. शिवसेनेने अनेकदा सामान्य कार्यकर्त्याला संधी देत धक्कातंत्राचे राजकारण केल्याची उदारहरण आहेत. यामध्ये आता पवारांची वेळ आली होती. मात्र राज्यसभेला पराभव झाल्यामुळे पवार यांना संसदीय कार्याची सुरुवात करण्यास आणखी काही काळ वाट पहावी लागणार हे निश्चित आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT