satara dcc bank chairman nitin patil Sarkaranama
पश्चिम महाराष्ट्र

कालपर्यंत शिवेंद्रसिंहराजेंची चर्चा, आज अध्यक्षपदी नितीन पाटील बिनविरोध...

सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी नितीन पाटील (Nitin Patil) बिनविरोध...

उमेश बांबरे : सरकारनामा न्यूजब्युरो

सातारा : जिल्हा बँकेच्या अध्यक्ष पदाच्या निवडीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते, कालपर्यंत या पदासाठी आमदार शिवेंद्रसिंह राजेंपासून अनेकांच्या नावाची चर्चा होती. पण अखेर बारामतीमधून अध्यक्षपदासाठी नितीन पाटील (Nitin Patil) यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला. तर उपाध्यक्ष पदासाठी अनिल देसाई (Anil Desai) यांचे नाव अंतिम करण्यात आले. विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांनी या दोघांची नावे जाहीर केली. निवडीच्या घोषणेनंतर वाई तालुक्यातील त्यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या सहकार पॅनेलने निर्विवाद वर्चस्व मिळवले. त्यानंतर अध्यक्ष, उपाध्यक्ष कोण होणार याची उत्सुकता ताणली होती. राजकीय दृष्ट्या प्रतिष्ठेची ओळखली जाणारी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी माजी खासदार कै. लक्ष्मणराव पाटील उर्फ तात्या यांचे पुत्र नितीन लक्ष्मणराव पाटील यांची जिल्हा बँकेच्या अध्यक्ष पदी निवड झाली. तर उपाध्यक्षपदी अनिल देसाई यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

आज सकाळी अकरा वाजता जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यालयामध्ये सर्व संचालकांची बैठक घेण्यात आली. यामध्ये भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, माजी अध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले, यासह सर्व संचालक मंडळ उपस्थित होते. सकाळपासूनच आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जिल्हा बँकेच्या आवारामध्ये उपस्थित होते. मात्र, यावेळी संचालकांच्या बैठकीमध्ये नितीन पाटील यांचे नाव जाहीर करून त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी अनिल देसाई यांचे नाव सर्वानुमते बिनविरोध म्हणून घोषित करण्यात आले.

गेले काही दिवस शिवेंद्रसिंहराजे व सत्यजित पाटणकर आणि राजेंद्र राजपुरे यांची नावे चर्चेत होती. तर राष्ट्रवादीच्या संचालकास अध्यक्ष पद द्यावे अशी मागणी जोर धरत होती. त्यामुळे खासदार शरद पवार यांनी पक्षाच्या संचालकास अध्यक्ष करून साताऱ्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची मागणी पूर्ण केली. तर अनिल देसाई यांची दुसऱ्यांदा उपाध्यक्ष पदी निवड झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT