Satara Nagardhyksh : सातारा पालिका निवडणुका पक्षीय पातळीवरच लढण्याचा निर्णय दोन्ही राजांनी घेतला असला, तरी नगराध्यक्षपदासाठी मात्र दोन्ही गटांनी दावा केला आहे. गेल्यावेळी नगराध्यक्षपद सातारा विकास आघाडीकडे असल्याने खासदार उदयनराजे भोसले गटाचा त्यावर सुरुवातीपासूनच दावा राहिला आहे. त्यात आता सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या गटाने पक्षश्रेष्ठींसमोर या पदासाठी दावा केल्याची चर्चा आहे.
लोकसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांनी घेतलेले परिश्रम, पक्षस्तरावरील संघटनात्मक कार्य या मुद्द्यांचा विचार करण्यासह शहर विकासाचा वेग वाढविण्यासाठी मंत्र्यांशी समन्वय असलेल्या व्यक्तीकडे हे पद असावे, अशी भूमिका मांडण्यात आली आहे. त्यामुळे नगराध्यक्ष कोणाचा? यावर चर्चेची गाडी आली आहे. मनोमिलन असल्याने दोन्ही नेत्यांच्या चर्चेतून मार्ग निघून येत्या सोमवारी (ता. १७) भाजपकडून या पदाचा उमेदवार जाहीर होईल, अशी शक्यता राजकीय जाणकारांकडून व्यक्त होत आहे.
पालिकेची निवडणूक प्रथमच भाजपच्या चिन्हावर लढण्याची तयारी दोन्ही राजेंकडून झाली आहे. त्याअनुषंगाने दोन्ही गटांची एक समिती तयार करून एकूण २५ प्रभागांत ५० जणांना उमेदवार देण्यासाठी तसेच नगराध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. उमेदवारांच्या मुलाखतीचा गोषवारा भाजपच्या कोअर कमिटीसह मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांनी दोन दिवसांपूर्वी प्रदेश कार्यालय तसेच मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचविला. त्यावेळी दोन्ही आघाड्यांमध्ये कोणाला किती नगरसेवक, नगराध्यक्षपद कोणाकडे तसेच मूळ भाजपच्या कार्यकर्त्यांना कशी संधी द्यायची? यावर चर्चा झाली.
त्याचवेळी नगराध्यक्ष पदाबाबतही सविस्तर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. गत निवडणुकीत नगराध्यक्षपद उदयनराजेंच्या गटाकडे होते. निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून साताऱ्याचा नगराध्यक्ष मला व्हायचं आहे, असे उदयनराजे सातत्याने म्हणत आहेत. त्यातून नगराध्यक्ष आमच्याच गटाचा हवा, हा दावा राजकीयदृष्ट्या रास्त असल्याचे त्यांच्या गटाचे म्हणणे आहे. तशी चर्चाही साताऱ्यात होती; परंतु शिवेंद्रसिंहराजे गटाकडूनही आता नगराध्यक्षपदावर दावा सांगितला जात आहे.
नगराध्यक्षपद शिवेंद्रसिंहराजेंच्या गटाकडे असावे, असा आग्रह होताना दिसून येत आहे. शिवेंद्रसिंहराजे हे मंत्री आहेत. त्यांच्या माध्यमातून मोठी विकासकामे होऊ शकतात. त्यास गती आणण्यासाठी त्यांच्या गटाकडे नगराध्यक्षपद असणे आवश्यक आहे, असा सूर त्यांच्या गटाकडून लावला जात आहे. लोकसभा निवडणुकीत उदयनराजेंना जास्तीतजास्त मताधिक्याने निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी घेतलेले परिश्रम तसेच पक्षस्तरावर केलेले संघटनात्मक कार्य याचा हवाला त्यासाठी दिला जात आहे. दोन्ही गटाकडून नगराध्यक्षपदावर ठाम दावा केला आहे. यामुळे हे पद कोणाकडे जाणार? याची उत्सुकता लागून राहिली असून, सोमवारी (ता. १७) स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
‘नगराध्यक्ष प्रगल्भ हवा’ :
नगराध्यक्षपदासाठी दोन्ही आघाड्यांकडून उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. राजकीय सल्लागारांकडून नेत्यांना या पदासाठी मराठा चेहरा असावा, सामाजिक प्रश्नांची जाणीव आणि राजकीय प्रगल्भता त्याच्याकडे असावी, नागरिकांमधील संपर्क, इतर पक्ष व विरोधकांशी समन्वय ठेवण्याचे कसब असावे, असेही सल्ले दिले जात आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.