NCP weakened in Satara as Ajit Pawar and Sharad Pawar factions struggle to form complete municipal panels, while BJP expands dominance in the traditional NCP stronghold. Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara NCP: बलाढ्य भाजपने दोन्ही राष्ट्रवादीला गुडघ्यांवर आणलं : शशिकांत शिंदे, मकरंदआबांना सातारा जड जातंय...

Satara NCP : सातार्‍यात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना पॅनेल उभे करता न आल्याने मोठा राजकीय धक्का बसला आहे.

सरकारनामा ब्यूरो

Satara NCP ZP elections : एकेकाळी सातारा जिल्ह्यातील सर्व पालिकांत वर्चस्व राखणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विभाजनानंतर होणाऱ्या पालिकांच्या निवडणुकीत इतर पक्षांच्या मदतीने निवडणूक लढण्याची वेळ आली आहे. ९ पालिका आणि एका नगरपंचायतीपैकी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला वाई, महाबळेश्वर आणि रहिमतपूर या तीन पालिकांत पूर्ण पॅनेल टाकता आले आहे. तर मलकापूर, कऱ्हाड, म्हसवड, फलटण पालिकेत काही जागांसाठी उमेदवार दिले आहेत.

महायुतीत सहभागी होऊन पक्ष वाढीच्‍या चर्चा करणारी राष्‍ट्रवादी (NCP) यानिमित्ताने भाजपसमोर अगदी गुडघ्‍यावर आल्‍याची स्‍थिती आहे, तर दुसरीकडे शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादीला मात्र एकाही पालिकेत स्वबळावर पॅनेल टाकता आलेले नाही; स्वतःच्या जिल्ह्यात उमेदवार शोधताना प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची अक्षरशः दमछाक झाली. पण नगराध्यक्षपदासाठी सातारा, वाई, मेढ्यात आव्हान उभे केले आहे.

जिल्ह्यात १९९९ पासून सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला यावेळेस पालिकेच्या निवडणुकीत इतर पक्षांना सोबत घेऊन निवडणूक लढावी लागत आहे. विभाजनानंतर होणाऱ्या पहिल्याच पालिकांच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी आपापल्या चिन्हावर लढणार असली, तरी त्यांना काही पालिकांचा अपवाद वगळता उर्वरित ठिकाणी पॅनेलही पूर्ण करता आलेले नाही. महायुतीत सहभागी झालेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीला भाजपसोबत युती करण्याची वेळ आली आहे.

तर शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादीला महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोर जावे लागत आहे. २०१६ मध्ये झालेल्या पालिकांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची महाबळेश्वर, वाई, फलटण, रहिमतपूर पालिकेत सत्ता होती. यामध्ये महाबळेश्वर पालिकेत नऊ, रहिमतपूरला १४, पाचगणीत दोन, वाईत १२, फलटणला १८ आणि म्हसवडला सहा, तसेच साताऱ्याचे दोन्ही राजेही राष्ट्रवादीत होते. त्यामुळे दोन्ही आघाड्यांचे नगरसेवकही या पक्षांचेच मानले जात होते.

आता २०२५ मध्ये मात्र, राजकीय परिस्थिती बदलली आहे. लोकसभा आणि विधानसभेत राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजपने मुसंडी मारली आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादीचा एक खासदार आणि दोन आमदार राहिले आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीची खासदार नितीन पाटील, मंत्री मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाटचाल सुरू आहे, तर शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादीची शशिकांत शिंदे व माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वात वाटचाल सुरू आहे.

सध्या दोन्ही पक्ष पालिकांच्या निवडणुकीत आपले अस्तित्व टिकविण्यासाठी धडपडत असल्याचे चित्र आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने यावेळेस नऊ पालिकांपैकी सात पालिकेत उमेदवार दिले आहेत. यामध्ये वाई २३, महाबळेश्वर २०, रहिमतपूर १९ येथे पूर्ण पॅनेल देता आले आहे, तर मलकापूरला १४, कऱ्हाडला दोन, म्हसवडला १५, फलटणला नऊ जागांवर पक्ष लढत आहे. वाई, महाबळेश्वर, म्हसवड, आणि रहिमतपूर या चार ठिकाणी नगराध्यक्षपदासाठी उमेदवार दिला आहे. पक्षाच्‍या सात पालिकांमध्‍ये १०२ व नगराध्यक्षपदाचे चार असे १०६ उमेदवार रिंगणात असून, ते पक्षाच्या चिन्हावर लढणार आहेत.

साताऱ्यात नगराध्यक्षपदासह पुरेपूर प्रयत्‍न

साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने महाविकास आघाडीच्या माध्यमातून सातारा पालिकेत पॅनेल उभे करण्याचा प्रयत्न केला आहे. साताऱ्यात २१ नगरसेवक आणि नगराध्यक्षपदासाठी उमेदवार दिले आहेत. वाई पालिकेत ५, महाबळेश्वरला ३, पाचगणीत २, फलटणला ६, म्हसवडला ३, मेढ्यात ७ उमेदवार दिले आहेत, तसेच सातारा, वाई आणि मेढा पालिकेत नगराध्यक्षपदाचा उमेदवार दिला आहे. कऱ्हाड पालिकेत माजी आमदार बाळासाहेब पाटील यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे राजेंद्र यादव यांच्यासमवेत आघाडीत सहभाग नोंदवला आहे. या पक्षाचे पालिकांमध्‍ये ४७ व नगराध्यक्षपदाचे तीन असे ५० उमेदवार पक्षाच्या चिन्हावर रिंगणात आहेत.

एकत्रित राष्ट्रवादीची २०१६ मधील ताकद

राष्ट्रवादी काँग्रेसची महाबळेश्वर, वाई, फलटण, रहिमतपूर पालिकेत सत्ता होती. यामध्ये महाबळेश्वर पालिकेत नऊ, रहिमतपूर १४, पाचगणीत दोन, वाईत १४, फलटण १८, म्हसवड सहा, तसेच साताऱ्याचे दोन्ही राजेही राष्ट्रवादीत असल्यामुळे दोन्ही आघाड्यांचे ४१ नगरसेवक हे या पक्षाचेच पुरस्कृत मानले जात होते. कऱ्हाड पालिकेत लोकशाही आघाडीच्या माध्यमातून आमदार बाळासाहेब पाटील यांनी निवडणूक लढली होती. त्यावेळी त्यांचे सहा नगरसेवक निवडून आले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT