कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून कॉंग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना सक्रीय झाली आहे. याशिवाय, जिल्ह्यातील विविध आघाड्यांनी महाविकास आघाडीला व पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतल्याने यंदाच्या विधान परिषदेच्या निवडणूकीत 416 पैकी 270 हून मते मिळविणार असल्याचा दावा विधान परिषदेचे उमेदवार व पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला आहे.
सतेज पाटील यांनी आज आपला अर्ज भरला. या वेळी या दोघांनीही असा मोठा आकडा सांगितल्याने विरोधी असलेल्या उमेदवाराला त्यावर विचार करावा लागणार आहे. विरोधी उमेदवार म्हणून महाडिक घराण्यातील अमल यांचे नाव आघाडीवर आहे. सतेज पाटील यांनी सांगितलेल्या आकड्याला महाडिक कसे उत्तर देणार, याची आता उत्सुकता आहे. पाटील यांच्याविरोधात महाडिकांनी तयारी सुरू केली आहे. त्यांची उमेदवारी अद्याप जाहीर झालेली नाही. ते उमेदवारी अर्ज भरताना आपल्याला किती मतदारांचा असल्याचे जाहीर करतात, याकडे आता लक्ष असेल.
विधानसभा निवडणूक झाल्यानंतर दोन वर्षांनी विधान परिषदेची निवडणूक आहे. विधानसभेच्या निवडणूकीपासूनच श्री पाटील यांनी विधान परिषदेच्या निवडणूकीची पेरणी सुरु केली आहे. त्यानंतर, महाविकास आघाडीची सत्ता आली. या सत्तेत श्री पाटील यांना कोल्हापूरचे पालकमंत्री म्हणून जिल्ह्याचा कारभार पाहता आला आहे. यामध्ये जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिकेंना मदत व त्यांचे प्रश्न सोडवण्याची संधी मिळाली आहे. गेल्या निवडणूकीत स्थनिक आघाड्या होत्या. यापैकी बहुतांशी आघाड्या कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेशी संलग्न झाल्या आहेत. याचाही फायदा आघाडीच्या उमदेवाराला मिळणार आहे.
विधान परिषदेच्या गेल्या निवडणुकीत शिवसेनेची भूमिका कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या विरोधात होती. यावर्षी मात्र महाविकास आघाडीमुळे शिवसेनेचीही ताकद श्री पाटील यांना मिळणार आहे. आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, माजी खासदार राजू शेट्टी यांची शिरोळमधील भूमिका महत्वाची होती. दरम्यान, श्री शेट्टी यांनी पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे. तर यड्रावकर हे आघाडी म्हणून पाटील यांच्यासोबतच आहेत. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते कामाला लागले आहेत. तर, शिवसेनेचे जिल्हा पातळीवरील सर्व पदाधिकारी श्री पाटील यांच्यासोबत राहतील व जोमाने काम करतील, अशी ग्वाही उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.
या साऱ्या परिस्थितीमुळे पालकमंत्री पाटील व ग्रामविकासमंत्री मुश्रीफ यांना यंदाच्या निवडणूकीत 416 पैकी 270 मते महाविकास आघाडीचे उमेदवार गृहराज्यमंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांना मिळतील, असा विश्वास आहे.
विधान परिषदेच्या (2015) गेल्या निवडणुकीत एकूण 382 मतांपैकी सतेज पाटील यांना 220 तर माजी आमदार महादेवराव महाडिक यांना 157 मते मिळाली होती. तर 5 मते अवैध ठरली होती. यामध्ये, सतेज पाटील हे 63 मतांनी विजयी झाले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.