Kolhapur News : राज्यातील अनधिकृत खाण उत्खननाचा मुद्दा विधिमंडळ अधिवेशनात चांगलाच गाजला. काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी अनधिकृत उत्खनन होत असल्याकडे राज्य सरकारचे लक्ष वेधले. तसेच कोल्हापूरमधील एका व्यावसायिकाने खाण उत्खनन करून शासनाची रॉयल्टी बुडवली आणि मधल्या काळात हेलिकॉप्टर विकत घेतले आहे, असाही आरोप केला. पाटील यांच्या या प्रश्नानंतर संबंधित खाण व्यावसायिक शिवाजी पोवार यांनी पत्रकार परिषद घेत आमदार पाटील यांच्या प्रश्नाला उत्तर दिले आहे.
खाणकाम केल्यानंतर रॉयल्टी भरली का नाही? याची माहिती घेतली पाहिजे. हा प्रश्न उपस्थित करताना कोल्हापुरातील शिये येथील गट नंबर 144 चे उदाहरण दिले. खाणीतून 4 लाख ब्रास इतके क्रशिंग काढले हे तहसीलदारांच्या आकडेवारीवरून समोर येते. मात्र केवळ 96 हजार क्रशिंग वरच ते मिटवण्यात आले. त्यामुळे जवळजवळ 100 कोटीची रॉयल्टी बुडाली अशा बातम्या वर्तमानपत्रात आल्या आहेत. शिवाय ज्यांनी रॉयल्टी बुडवली त्यांनी मधल्या काळात हेलिकॉप्टर घेतले अशा देखील चर्चा आहेत, असे विधान परिषदेत सतेज पाटील म्हणाले.
खाण घेणारा माणूस हेलिकॉप्टर घेत असेल तर शासनाला यातून किती पैसे मिळायला हवे होते. हे एक रॅकेट असल्यासारखी परिस्थिती आहे. त्यामुळे या खाणी बंद करताना जुनी रॉयल्टी वसूल झाली की नाही? याचा विचार करण्याची गरज आहे. 4 लाख ब्रास क्रशरिंग करून, नोटिसा निघून सुद्धा रॉयल्टी वसूल होत नसेल आणि दुसऱ्या बाजूला हेलिकॉप्टर घेत असेल, त्यामुळे हा विभाग नेमका काय करतोय हे देखील पाहणे महत्त्वाचे आहे. असे देखील सतेज पाटील म्हणाले.
सतेज पाटलांच्या या प्रश्नानंतर संबंधित व्यावसायिक शिवाजी पोवार यांनी स्वतः समोर येत पत्रकार परिषद घेतली आणि सतेज पाटील यांच्या प्रश्नाला प्रत्युत्तर दिले. पोवार म्हणाले, प्रशासनाकडून आम्हाला कोणतीही नोटीस आलेली नाही. आम्ही सर्व व्यवसाय कायदेशीर केलेले आहेत. केवळ खाण व्यवसायिक नव्हे तर मुंबई गोवा, रत्नागिरी, नागपूर रोडवरील अनेक कामे माझी चालू आहेत. आम्ही कष्ट करून हेलिकॉप्टर घेतले. कोणाला लुबाडून घेतले नाही. आम्ही कष्ट करून हेलिकॉप्टर घेऊ नये का? असा सवाल शिवाजी पोवार त्यांनी केला.
हेलिकॉप्टर घेतले म्हणजे कोणाला वाईट वाटू नये. ते घेण्यासाठी आम्ही बँकेकडून 10 कोटींचे कर्ज घेतल्याचा टोलाही पोवार यांनी सतेज पाटील यांना लगावला आहे. दरम्यान, सतेज पाटील यांच्या प्रश्नानंतर कोल्हापूर आणि परिसरात महसूल विभागांकडून अशा खाणींवर कारवाईची धडक मोहीम हातात घेण्यात आल्याची माहिती आहे. यामध्ये काही खाणी सील करण्यात आल्याचेही सांगितले जाते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.