Sanjay Pawar, Kolhapur Shivsena
Sanjay Pawar, Kolhapur Shivsena Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

शिवसेनेची स्थिती पाहून संजय पवार ढसाढसा रडले : म्हणाले, असे पोपट परत घेऊ नका

सरकारनामा ब्युरो

कोल्हापूर - राज्यातील शिवसेनेत दोन गट पडले आहेत. त्यामुळे राज्यातील उद्धव ठाकरे मुख्यमंत्री मंत्री असलेली महाविकास आघाडीची सत्ता गेली. शिंदे गटाने भाजप बरोबर सत्ता मिळविली. शिवसेनेचे अनेक आमदार व खासदारही शिंदे गटात गेले. यात कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेच्या दोन खासदारांचाही समावेश होता. त्यामुळे शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हा प्रमुख संजय पवारांना अश्रू अनावर झाले. संतापलेल्या संजय पवारांनी शिंदे गटावर टीका केली. Kolhapur Shivsena News Update

संजय पवार म्हणाले, शिवसेनेला सोडलेल्या बंडखोर खासदारांबद्दल बोलण्याची माझी काही इच्छा नाही. कारण त्यांचा आत्तापर्यंतचा प्रवास पाहिला तर कधी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, परत राष्ट्रवादी, परत शिवसेना असा राहिला आहे. त्यामुळे त्यांच्या बद्दल बोलण्याची माझी इच्छा नाही. मात्र मी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विनंती करतो की, असे पोपट परत घेऊ नका. त्यांना कायमची दारे बंद करा. ज्यांच्यावर तुम्ही विश्वास टाकला ते असे करत असतील तर त्यांच्यासाठी 'मातोश्री'ची दारे बंद करा, अशी विनंती आम्ही उद्धव ठाकरे यांच्याकडे करणार आहोत, असे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, खरा धक्का बसला तो संजय मंडलिक यांचा. आमच्या बरोबर बैठकीला होते. बेनटेक्स व सोन्याचा विषय काढला. समर्थन मोर्चा काढला त्यावेळी मंडलिक आमच्या बरोबर होते. पत्रकार परिषदेला आमच्या बरोबर होते. सगळ्या चर्चेला आमच्या बरोबर होते. ते सांगून गेले असते तर वाईट वाटले नसले. ते गेल्याने शिवसैनिकाला धक्का बसला, असे त्यांनी स्पष्ट केले.

आम्ही त्यांच्यासाठी खूप राबलो होतो. आम्हा कोल्हापूरकरांना त्यांच्याकडून फार अपेक्षा होत्या. एक मराठा चेहरा, कोल्हापूरचे नेतृत्त्व करणारा चेहरा होते. ते बहुबली सारखे पुढे पळाले असते तरी त्यांच्या मागे राहून त्यांना मोठे करण्याचे स्वप्न होते. त्यांनी आमचा विश्वासघात केला, असा आरोप त्यांनी केला.

शिवसैनिकांची समजूत काढेल असे संजय मंडलिकांनी सांगितले होते. यावर संजय पवार म्हणाले, जर त्यांनी उद्धव ठाकरे यांना सांगून त्यांची समजूत काढली तरच आम्ही भेटू इच्छितो. अन्यथा अशा लोकांना आम्ही भेटू इच्छित नाही. आम्ही जीवाचे रान केले आहे.

दोन्ही खासदारांनी राजीनामा द्यावा. निवडणूक लढवावी. मग त्यांना कळेल कोल्हापूर काय आहे. मग कळेल शिवसैनिक काय आहे, असे सांगताना त्यांचा कंठ दाटून आला. डोळ्यांतून अश्रू धारा वाहू लागल्या.

तुम्हाला शिवसैनिक, लोकांचे काही वाटत नाही. तुम्हाला तुमचा गट महत्त्वाचा आहे. खासदारकी आज ना उद्या मिळून जाईल. मंडलिकांनी आम्हाला फसविले आहे. माफ नाही. कोल्हापूरकर व शिवसैनिकांचा विश्वासघात केला आहे. बाकी ठिकाणी बोलायला वेळ होता. मात्र शिवसैनिकांशी बोलायला त्यांना वेळ नव्हता. आम्ही सर्व कोल्हापुरात आहोत. कोणी कुठे गेले नाही. कोल्हापूरकर त्यांच्या प्रचंड विरोधात जाणार आहेत. शिवसेनेचा उमेदवार निवडून कसा येणार यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. अशी माणसे पराभूत कशी होणार यासाठी आम्ही प्रयत्न करणार. ज्यांनी उद्धव ठाकरे व कोल्हापूरकरांना फसविले त्यांना माफी नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

कोल्हापुरात शिवसेनेचे दोन खासदार असावे ही बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्ही राबलो. आता येऊद्यात कमळचे चिन्ह घेऊन त्यांनी स्वार्थासाठी उचलेल्या या पावलामुळे आम्हाला फार वेदना झाल्या, असे त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT