Mangalveda Water Issue : गेल्या अनेक वर्षांपासून शेतीच्या पाण्याची प्रतीक्षा असलेल्या मंगळवेढा तालुक्यातील सात गावांना म्हैसाळ योजनेच्या उमदी वितरिकेमधून पाणी सोडण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी ढोल वाजवून, भंडाऱ्याची उधळण करत जल्लोष केला, तर उपस्थित शेतकऱ्यांनी आमदार समाधान आवताडे यांना पेढे भरवून आनंद व्यक्त केला. (Seven villages in Mangalveda have been released water from Mhaisal scheme)
मंगळवेढा (Mangalveda) तालुक्याच्या दक्षिण भागातील सहा हजार हेक्टर क्षेत्राला म्हैसाळ योजनेच्या वितरिका क्रमांक एक व दोनमधून पाणी मिळते. मात्र, सोड्डी, शिवनगी, आसबेवाडी, येळगी, सलगर खुर्द, सलगर बुद्रुक, लवंगी या परिसरामध्ये उमदी वितरिकामधून पाणी सोडण्यात आले आहे. या पाण्याचे पूजन आमदार समाधान आवताडे (Samadhan Avtade) यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी उपस्थितांनी ढोल वाजवून,भंडाऱ्याची उधळण करत स्वागत केले. गेल्या अनेक वर्षांचा शेतीचा पाणीप्रश्न मार्गी लागल्याबद्दल आमदार आवताडे यांना पेढे भरून आनंद व्यक्त केला.
या परिसरातील गावांनी २००९ च्या लोकसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकला होता. त्या दिवसापासून या भागातील पाण्याचा प्रश्न राष्ट्रीय पातळीवर चर्चेत आला होता. तत्कालीन आमदार (स्व.) भारत भालके व (स्व.) गणपतराव देशमुख यांनी म्हैसाळ योजनेतून सांगोला व मंगळवेढ्याला पाणी देण्याबाबत विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता.
दामाजी कारखान्यावर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित झालेल्या कार्यक्रमात मंगळवेढा तालुक्याचा पाणी प्रश्न मार्गी लावण्याबाबतची मागणी प्रास्ताविकात कारखान्याचे तत्कालीन अध्यक्ष समाधान आवताडे यांनी केली होती. प्रधानमंत्री सिंचन योजनेतून या भागाला पाणी देण्यासाठी निधी उपलब्ध झाल्यामुळे योजनेचा प्रश्न मार्गी लागला.
आमदार समाधान आवताडे यांनी सांगोला येथे झालेल्या बैठकीत या योजनेची कामे तातडीने पूर्ण करून या भागाला पाणी देण्याची आग्रही केली हेाती. त्यामुळे वितरिका क्रमांक एक व दोन मधून तालुक्याच्या दक्षिण भागात पाणी सुरू असताना आता उमदी वितरिकेमधून ज्या भागाला पाणी मिळत नाही, त्या भागाला पाणी उपलब्ध झाल्यामुळे जवळपास अडीच हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र आता ओलिताखाली येणार आहे.
म्हैसाळचा पाणीप्रश्न मार्गी लागल्यानंतर आमदार आवताडेंच्या रडारवर आता मंगळवेढा उपसा सिंचन योजना आहे. या वेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रदीप खांडेकर, अंबादास कुलकर्णी, दत्तात्रेय जमदाडे, दिलीप चव्हाण, भाजप जिल्हा संघटन सरचिटणीस शशिकांत चव्हाण, धनंजय पाटील आदींसह या भागातील विविध गावांचे आजी-माजी सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.