Deepak Salunkhe-Shahajibapu Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Shahajibapu : शहाजीबापूंनी विधानसभा पराभवाचा जुन्या मित्रावर पुन्हा काढला राग : विश्वासघात, सिझर, ब्रुट्‌स, सूर्याजी पिसाळ, दिवटा म्हणत केली निर्भत्सना

Former MLA Deepak Salunkhe News : शहाजीबापू पाटील यांनी माजी आमदार दीपक साळुंखे यांच्यावर कडवट शब्दांत टीका केली. साळुंखे यांच्या सहा वर्षांच्या आमदारकीतील कामाचा दाखला मागत पाटील यांनी राजकीय निशाणा साधला.

Vijaykumar Dudhale

Solapur, 05 September : आमदार काय करतात, हे मला चांगलं माहिती आहे. विधानसभा निवडणुकीला आता दोन वर्षे होत आली आहेत. तो दिवटा (माजी आमदार दीपक साळुंखे यांना उद्देशून) तर सहा वर्षे आमदारकी भोगला, त्याचं एखादं पत्र तरी मला दाखवता का? ते ब्रुटस, सूर्याजी पिसाळ यांच्यातीलच आहे, त्याच्या कशाला नादी लागता? अशा कडवट शब्दांत शहाजीबापू पाटील यांनी आपल्या एकेकाळचे मित्र असलेल्या माजी आमदार दीपक साळुंखे यांच्यावर टीका केली.

सांगोल्यात युवा सेना मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या मेळाव्यात बोलताना माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी माजी आमदार साळुंखे यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, आमदार आणि माजी आमदाराला सांगोला तालुक्याशी काहीही देणंघेणं नाही.

सांगोल्यासारख्या दुष्काळी तालुक्याला पाणी देण्याचे काम गगनगिरी महाराज यांनी शिवसेनाप्रमुख (स्व.) बाळासाहेब ठाकरे यांनी पत्र लिहून केली होती. स्वातंत्र्यासाठी लढाया करणाऱ्या माण खोऱ्याला पाणी देण्याचे काम करा, अशी मागणी त्यांनी पत्रातून बाळासाहेब ठाकरेंकडे केली होती. त्यातून कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना झाली आणि तुम्हा-आम्हाला पाणी मिळायला लागलं, असे शहाजीबापू पाटील यांनी सांगितले.

ते म्हणाले, सांगोला तालुक्याला पाणी मिळण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला आणि पाणी आल्याने मिळालेले यश हे हजार पटीनं आमदारकीपेक्षा मोठं आहे. त्यामुळे आमदारकी हारली याला जास्त महत्व देत जाऊ नका. आमदार काय करतात, हे मला चांगलं माहिती आहे.

विश्वासघात होत असतो, सिझरसारख्या सम्राटाचंसुद्धा राज्य गेलं होतं. त्याचा जिवलग मित्र ब्रुट्‌सने त्याच्यावर तलवारीने पाठीत वार केले आणि सिझरला मरावं लागलं हेातं. शिवाजी महाराजांच्या विरोधात स्वकीय असलेले सूर्याजी पिसाळ यांनीच घातपात केला होता. हे त्यातलंच आहे, कशाला त्याचा नादाला लागता. त्याच्या तेवढं नादाला लागू नका, अशी टीका शहाजीबापू पाटील यांनी नाव न घेता दीपक साळुंखेंवर केली.

पाटील म्हणाले, आमदार डॉ. बाबासाहेब देशमुखाला असू द्या. ते काय मु. पो. पेनूर, ता. मोहोळ, जि. सोलापूर, आज ना उद्या ते उठून जाणार आहे. ही काय जवळ्यातून बाहेर पडत नाही. कारण त्याचं काम झालेलं आहे. हे काय आता नादाला लागत नाही.

कुठल्या पक्षात जावं म्हणून रात्रभर...आज जयाभाऊ गोरेंकडे असतं, उद्या माझ्यासोबतच असतं. पुन्हा एकनाथ शिंदेंना भेटतंय. पुन्हा शरद पवारांकडं जातंय. सुनेत्राताईंकडे जाऊन मी पक्ष सोडलाच नाही म्हणून सांगतंय. सगळ्यात शेवटी उद्धव ठाकरेंना जाऊन सांगतंय की, मी अजून शिवसेना उबाठात आहे, तुम्ही काही काळजी करू नका, असेही पाटील यांनी नमूद केले.

मेळाव्याला रोहयो मंत्री भरत गोगावले, राज्यमंत्री योगेश कदम, खासदार ज्योती वाघमारे, अभिनेत्री दिपाली सय्यद, क्रीडा सेनाप्रमुख चंद्रहार पाटील, माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, माजी आमदार संजय कदम, सांगोला पंचायत समितीचे सभापती दत्तात्रेय मगर, नगरसेवक अमोल शिंदे उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT