Ajit Pawar, Makrand Patil, Sharad Pawar sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Wai NCP News : शरद पवार हेच आमचे दैवत; वाई मतदारसंघाचा विकास फक्त अजितदादांमुळे : मकरंद पाटील

Umesh Bambare-Patil

-भद्रेश भाटे

Wai NCP News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडलेला नाही. आजही मी पक्षातच आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार हे आमचे दैवत आहेत, तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे सक्षम नेतृत्व आहे. २००९ पासून वाई, खंडाळा, महाबळेश्वर मतदारसंघाचा जो विकास झालाय, तो फक्त अजितदादांमुळे झाला आहे. हे आपल्याला मान्य करावे लागेल, असे स्पष्ट मत आमदार मकरंद पाटील यांनी व्यक्त केले.

वाई येथील प्राथमिक शिक्षक विठ्ठल माने यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमासाठी ते आले होते. यावेळी प्रथमच त्यांनी कार्यकर्त्यांसमोर आपली भूमिका स्पष्ट केली. मकरंद पाटील Makrand Patil म्हणाले, मी राष्ट्रवादी काँग्रेस NCP सोडली नाही व सोडणारही नाही. शरद पवार Sharad Pawar हे आमचे दैवत आहेत. त्यांना कधीही विसरू शकत नाही.

२००९ पासून आपल्या मतदारसंघात जो विकास झाला, तुम्हाला वाटत असेल तर तो फक्त अजितदादांमुळे झाला. हे आपल्याला मान्य करावे लागेल. अन्य कोणामुळे नाही. त्यामुळे शरद पवार साहेब जितके महत्त्वाचे आहेत. तितकेच अजितदादा ही महत्त्वाचे आहेत. आर्थिक अडचणीत असलेला किसन वीर कारखान्याची जबाबदारी घेण्यास मी तयार नव्हतो.

त्यावेळी कार्यकर्त्यांनीच निवडणूक लढवून कारखाना ताब्यात घेण्याची मागणी वारंवार केली होती. मागील वर्षी कारखाना ताब्यात आल्यानंतर सभासदांनी दिलेल्या भांडवलावर कारखाना सुरू केला. त्यानंतर वर्षभरात आपल्याला कोणत्याही बँकेने मदत केलेली नाही, हे लक्षात घेतले पाहिजे.आता कारखाना सुरळीत चालवण्यासाठी अजितदादांचे मार्गदर्शन व मदतीची गरज असणार आहे.

मागील एक वर्षाच्या काळात आपले सरकार नव्हते.त्या काळात मतदार संघातील विकास कामांसाठी एक रुपयाही मिळाला नाही. मतदार संघातील विकास कामांसाठी काही तडजोडी कराव्या लागतात. शरद पवार हेच आपले सर्वस्व आहेतच; आणि ते राहतीलच. त्यामुळे कार्यकर्त्यांनी, जनतेने मनात कोणताही किंतू परंतु ठेवू नये.

अजितदादांनी पुढाकार घेऊन यावेळी आपल्याला निधी उपलब्ध करून दिला आहे. आता लवकरच त्या कामांना सुरुवात होईल. वाई शहरातील धोम धरणातून पाणीपुरवठा योजना, शहरात नवीन पूल, नाना नानी पार्क व कृष्णा नदीतील अनेक कामांना निधी उपलब्ध झाला आहे. ही कामे अनेक दिवस रखडलेली होती. ती आता मार्गी लागतील. खंडाळा तालुक्यात ट्रामा सेंटर, महाबळेश्वर तालुक्यात अनेक छोट्या मोठ्या कामांना निधी उपलब्ध झाला आहे.

अजितदादांमुळे माने पुन्हा सेवेत

२००९ मध्ये माढा मतदारसंघातून शरद पवार यांनी लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांचे मुळगाव नांदवळ (ता. कोरेगाव) येथे सभा होती. या सभेमध्ये सूत्रसंचालन केल्यामुळे शासकीय सेवेत असलेल्या विठ्ठल माने यांना आचारसंहितेचा भंग केल्यामुळे निलंबित केले होते. मात्र, अजितदादांनी केलेल्या प्रयत्नांमुळेच विठ्ठल माने यांना पुन्हा सेवेमध्ये संधी मिळाली, याची आठवण मकरंद पाटील यांनी करून दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT