Shivajirao Naik | Sharad Pawar | Jayant Patil
Shivajirao Naik | Sharad Pawar | Jayant Patil  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

राष्ट्रवादीत प्रवेश करताच नाईकांसमवेत बैठक लावण्याचे पवारांचे जयंतरावांना आदेश

सरकारनामा ब्युरो

शिराळा : सांगली जिल्ह्यातील शिराळा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि राज्याचे माजी मंत्री शिवाजीराव नाईक (Shivajirao Naik Join NCP) यांची आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घरवापसी झाली आहे. शिराळा येथे भव्य शेतकरी मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil), सहकारमंत्री बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil), खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नाईक यांच्या पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी नाईक यांनी पक्षात प्रवेश करताच शरद पवार यांनी जयंत पाटील यांना एक खास विनंती वजा आदेश दिला आहे.

शरद पवार म्हणाले, शिवाजीराव नाईक हे एक यशस्वी जिल्हा परिषद अध्यक्ष होते. त्यांच्या या यशस्वी कारकिर्दीमुळेच त्यांना देशपातळीवर पाठवायचा निर्णय घेतला होता. सहकार, पंचायत राज, शैक्षणिक, कृषी व औद्योगिक क्षेत्रात त्यांना जितकं करता येईल तेवढं करण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. आज ते पुन्हा एकदा स्वगृही परत येत आहेत. मी पक्षाचा अध्यक्ष म्हणून त्यांचं मनापासून स्वागत करतो. मी जयंतराव पाटील यांना विनंती करतो की, आपण एकदा शिवाजीरावांसोबत बैठक घेऊन त्यांच्या अनुभवाचा फायदा राज्य कारभारासाठी कसा होईल, यावर चर्चा करू. त्यांच्या आतापर्यंतच्या राजकीय कारकिर्दीचा आणि अनुभवाचा आपल्याला राज्यपातळीवर नक्कीच फायदा होईल असा विश्वासही पवार यांनी व्यक्त केला.

शिराळा या मतदारसंघाबद्दल सांगायचं झाले तर योग्य असेल त्यासाठी पडेल ती भूमिका घेणारा असा या मतदारसंघाचा इतिहास आहे. हा शिराळा तालुका आणि या सांगली-सातारा जिल्ह्यामधून कर्तृत्ववान नेतृत्वाची मालिका होऊन गेली. महाराष्ट्राच्या स्वातंत्र्य इतिहासामध्ये या भागातील स्वांतत्र्य सैनिकांचे योगदान खूप मोठे आहे. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, राजाराम बापू पाटील यांच्यासारखी अनेक नावांनी इथून देशपातळीवर लौकिक मिळवला आहे. याच भागातून कर्तृत्ववान नेत्यांनी राज्याच्या, जिल्ह्याच्या दुष्काळी भागाच्या हितासाठी काही निर्णय घेतला आणि त्या निर्णयाचे स्वागत करण्यासाठी आपण आज इथे जमलो आहोत असेही शरद पवार म्हणाले.

शरद पवार यांची केंद्रावर सडकून टीका :

यावेळी बोलताना शरद पवार यांनी केंद्र सरकारवर त्यातही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली. ते म्हणाले, महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, मौलाना आझाद यांच्यासह इतरांनी स्वातंत्र्यासाठी योगदान दिले, देश उभारणीसाठी कष्ट केले त्यांचा सन्मान, आदर ठेवण्याऐवजी त्यांच्यावर टिका टिपण्णी करणं यावर धन्यता मानणारं नेतृत्व आज दुर्दैवाने देशात बघायला मिळत आहे. त्याचा परिणाम लोकांमध्येही एक प्रकारची अस्वस्थता आहे. महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, मौलाना आझाद ही त्या काळातील नेतृत्वाची पिढी होती. त्यांनी स्वातंत्र्य उभे करण्यासाठी कष्ट केले आणि नंतर देश उभा करण्यासाठी प्रचंड योगदान दिले, पण आज देशाचं राजकारण एका वेगळ्या दिशेला जातंय आणि राज्य वेगळ्या विचारांच्या लोकांच्या हातात आहे. असेही शरद पवार म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT