Abhijeet Patil-Uttam Jankar-Raju Khare-Narayan Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sharad Pawar NCP : शरद पवारांच्या चारही आमदारांनी वर्षभरातच बदलली भूमिका; चौघांची तोंडे चार दिशेला...

Nagar Parishad Election 2025 : सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या चारही आमदारांनी वर्षभरातच पक्षापासून दुरावा ठेवत नगरपालिका निवडणुकीत भूमिका बदल केल्याचे दिसून येते.

Vijaykumar Dudhale

सोलापूर जिल्ह्यात ४ राष्ट्रवादी (शरद पवार गट) आमदार निवडून आले असले तरी वर्षभरातच सर्वांनी पक्षापासून दूर जाणारी भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले.
राजू खरे यांनी सर्वात आधी पवार गटापासून दुरावा दाखवला आणि त्यानंतर नगरपालिका निवडणुकीत सर्वच आमदारांनी तुतारी चिन्हावर पॅनेल न उभे करता स्वतंत्र किंवा वेगळी भूमिका घेतली.
उत्तम जानकर, नारायण पाटील, अभिजीत पाटील आणि राजू खरे – या चौघांनीही स्थानिक निवडणुकीत पक्षविरुद्ध जाणाऱ्या हालचाली केल्याने शरद पवार गटातील अस्थिरता समोर आली.

Solapur, 24 November : विधानसभा निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रातून महाविकास आघाडीची धूळदाण होत असताना सोलापूर जिल्ह्यातील अकरापैकी सहा जागा ह्या महाविकास आघाडी आणि मित्रपक्षांनी जिंकल्या होत्या. त्यातील चार जागा ह्या एकट्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने जिंकल्या आहेत. पण वर्षभरानंतर या पक्षाच्या निवडून आलेल्या आमदारांनी आपली भूमिका बदलल्याचे दिसून येते. त्याची सुरुवात मोहोळचे आमदार राजू खरे यांनी केली आणि अवघ्या वर्षात सर्वच आमदारांनी नगरपालिका निवडणुकीत पक्षाकडेच पाठ फिरवल्याचे दिसून आले.

विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने (NCP SP) संपूर्ण राज्यातून अवघ्या दहा जागा जिंकल्या आहेत. त्यातील चार जागा ह्या सोलापूर जिल्ह्यातील आहेत. राज्यभरात महायुतीने झंझावत उभालेला असताना सोलापूर जिल्ह्यात शरद पवार नावाची जादू चालली होती. त्यात माळशिरसमधून उत्तम जानकर, करमाळ्यातून नारायण पाटील, माढ्यातून अभिजीत पाटील आणि मोहोळमधून राजू खरे हे तुतारी चिन्हावर निवडून आले आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर काही महिन्यांतच पुण्यात झालेल्या पक्षाच्या अधिवेशनाला आमदार राजू खरे यांनी दांडी मारली. त्यानंतर त्यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या स्टेजवर हजेरी लावली. शिंदे सेनेच्या मंत्र्यांच्या स्वागताला स्वतः आमदार खरे उपस्थित राहत होते. माध्यमांतून तशी जाहिरातबाजी करण्यात येत होती. पण पक्षाकडून त्यांना ना समज देण्यात आली ना त्यांनी त्यावर भाष्य केले.

आमदार राजू खरे यांचे पक्षापासून फाटकून वागण्याचे लोण पक्षाच्या सर्व आमदारांमध्ये पोचल्याचे दिसून येत आहे. कारण नगरपालिका निवडणुकीत एका आमदाराने पक्षाच्या तुतारी चिन्हावर पॅनेल उभे केलेले नाही. अकलूजमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पॅनेल रिंगणात आहे. मात्र, त्यासाठी आमदार जानकर यांच्यापेक्षा खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची भूमिका महत्वाची आहे.

आमदार उत्तम जानकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सांगोला येथे झालेल्या सभेला हजेरी लावली. त्या सभेत जानकर यांनी एकनाथ शिंदेंच्या समोर भाषण ठोकून यायुढील काळात आपण शहाजी पाटील यांना साथ देणार असल्याचे जाहीर केले आहे. जानकर यांनी यापूर्वीही शिंदे यांची जाहीरपणे कौतुक केले आहे. त्यामुळे जानकर नेमके कुठे असा प्रश्न पडला आहे.

आमदार नारायण पाटील यांनीही करमाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा पॅनेल उभा केलेला नाही. विधानसभा निवडणुकीत माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी केलेल्या मदतीची परतफेड म्हणून करमाळ्यात जगतापांच्या मदतीची भूमिका घेतल्याचे दिसून येते. पण ताकद असूनही नारायण पाटील यांनी नगरपालिका निवडणुकीत पक्षाचे पॅनेल उभे केलेले नाही, हे वास्तव आहे.

माढ्यातून निवडून आलेले अभिजीत पाटील यांनी पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत सुरुवातीला विठ्ठल परिवाराच्या माध्यमातून भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या वर्चस्वाला धक्का देण्याची जोरदार तयारी केली होती. मात्र, सूत्रं फिरलं आणि त्यांना स्वतंत्र पॅनेल उभा करावा लागला. त्यांचा पॅनेल कुणाची मते खाणार हे वेगळं सांगायला नको. पण पंढरपुरातही तुतारीचे पॅनेल नाही.

आमदार राजू खरे यांनी गेल्या सहा महिन्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षापासून फारकत घेतल्याचे दिसून येते, त्यामुळे त्यांनीही मोहोळ आणि अनगरमध्ये तुतारीचे स्वतंत्र पॅनेल उभे केलेले नाही. त्यांच्या पक्षावरील निष्ठेबाबत पहिल्या सहा महिन्यांत शंका घ्यायला सुरुवात झाली होती, त्यामुळे पवारांच्या चारही आमदारांनी भूमिका बदलल्याचे दिसून येते.

प्र.1: सर्वप्रथम पक्षापासून दूर जाणारी भूमिका कोणी घेतली?
उ: मोहोळचे आमदार राजू खरे यांनी सर्वात आधी भूमिका बदलली.

प्र.2: नगरपालिका निवडणुकीत तुतारी चिन्हावर पॅनेल कोणी उभे केले?
उ: चारही आमदारांपैकी कोणत्याही आमदाराने तुतारी चिन्हावर पॅनेल उभे केले नाही.

प्र.3: उत्तम जानकर यांनी कोणाला साथ देण्याची घोषणा केली?
उ: शहाजी पाटील यांना साथ देणार असल्याची घोषणा त्यांनी शिंदेंच्या उपस्थितीत केली.

प्र.4: चार आमदारांच्या भूमिकेत काय समानता दिसली?
उ: सर्वांनी विविध कारणांनी पक्षापासून दुरावा घेत नगरपालिका निवडणुकीत स्वतंत्र किंवा वेगळी भूमिका घेतली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT