Sharad Pawar's Helicopter
Sharad Pawar's Helicopter Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sharad Pawar News: पवारांचे हेलिकॉप्टर दुसऱ्याच हेलिपॅडवर उतरले अन प्रशासनाची एकच धावपळ उडाली...

विनायक दरंदले

सोनई ( जि. नगर) : मुळा सहकारी साखर कारखान्याच्या हेलिपॅडवर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली खरी मात्र त्यांचे हेलिकॉप्टर (helicopter) चुकीने दुसऱ्याच हेलिपॅडवर उतरले आणि दोन्ही हेलिपॅडवरील प्रशासन व नियोजनातील यंत्रणेची एकच धावपळ उडाली. माजी मंत्री शंकरराव गडाख यांचे चिरंजीव उदयन व माजी आमदार चंदशेखर घुले-पाटील यांची कन्या डाॅ. निवेदिता यांच्या विवाहाच्या निमित्ताने रविवारी (ता. २२ जानेवारी) हा गंमतशीर प्रकार सोनई येथे घडला. (Sharad Pawar's helicopter landed at another helipad)

सोनई-शिंगणापूर रस्त्यावरील मुलानी माथा येथे तयार केलेल्या हेलिपॅडवर माजी मंत्री विश्वजित कदम यांचे हेलिकॉप्टर उतरणार होते, तर मुळा कारखान्याच्या हेलिपॅडवर पवारांचे हेलिकॉप्टर उतरणार होते. पवारांची वाट पाहत मोठा लवाजमा थांबला होता. येथे सर्व प्रोटोकॉल तैनात असताना पवारांचे हेलिकॉप्टर चुकीने मुलानी माथ्यावर उतरले. तेथे फक्त एक मोटार व दोन सुरक्षा कर्मचारी पाहून झालेली चूक पायलटच्या लक्षात आली.

स्वागत, प्रोटोकॉल व स्थानिक सुरक्षेचा विचार न करता तेथे असलेल्या राजेंद्र गुगळे यांच्या इनोव्हा मोटारीत बसून पवारांनी चालक संपत मरकड यांना विवाहस्थळी घेण्यास सांगितले. प्रोटोकॉलशिवाय अचानक पवार मंडपात आल्याने उपस्थित अचंबित झाले. पवार साहेबांना घेऊन जाताना छातीची धडधड थांबता थांबली नाही, असे चालक मरकड आपल्या मित्रांना सांगत होते.

सुरक्षा कर्मचारी अशोक राख यांना घेवून पवारांच्या पायलटने हेलिकॉप्टर मुळा कारखान्यावर नेले. पवार साहेब आले म्हणून सर्व यंत्रणा अलर्ट झाली. उतरलेल्या हेलिकॉप्टरमध्ये पवार दिसत नसल्याने सर्वांची चिंता वाढली होती. सुरक्षा कर्मचारी अशोक राख यांनी घडलेला प्रकार सांगितला आणि सर्वांचा जीव भांड्यात पडला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT