Sharad Pawar
Sharad Pawar  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sharad Pawar: ...अन् शरद पवार कार्यकर्त्याच्या मुलीच्या लग्नासाठी थेट पोहचले मंगळवेढ्यातील मरवडे गावात

सरकारनामा ब्यूरो

Sharad Pawar Visit To Marriage : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व खासदार शरद पवारांची कामाप्रती असलेली निष्ठा वाखाणण्याजोगी आहे. पवार हे नेहमीच आपल्या कार्यकर्त्यांशी असलेली नाळ जपण्यात अग्रेसर असतात. तसेच त्याच्या सुख दु:खात खंबीरपणे सहभागी होतात. याचमुळे ते कार्यकर्त्यांच्या मनावर इतकी वर्ष अधिराज्य करत आहेत. या वयातही पवार यांची कार्यकर्त्याशी असलेली नाळ किती घट्ट आहे याचाच प्रत्यय पुन्हा एकदा पाहायला मिळाला आहे.

पवार हे सपत्नीक आपल्या कार्यकर्त्याच्या मुलीच्या लग्नासाठी थेट मंगळवेढा तालुक्यातील मरवडे गावात पोहचले. पवारांची सामान्य कार्यकर्त्याच्या मुलीच्या लग्नाला लावलेल्या उपस्थितीमुळे सर्वांनाचा आश्चर्याचा धक्का बसला.

मंगळवेढा तालुक्यातील लतिफ तांबोळी यांना पहिल्यापासून शरद पवार यांचे कट्टर समर्थक ओळखलं जातं. त्यांची मुलगी हिनाचा विवाह हा मंगळवेढा तालुक्यातील मरावडे या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. तांबोळी यांनी आपली कन्या हिनाच्या विवाहाची पत्रिका काही दिवसापूर्वी पवार यांना देत लग्नाला येण्याविषयी आग्रही विनंती केली होती. याच विनंतीला मान देत शरद पवार (Sharad Pawar) यांनी थेट मंगळवेढा गाठत कार्यकर्त्यांच्या मुलीच्या लग्नाला उपस्थिती लावली.

मुस्लिम समाजामध्ये शुक्रवार अर्थात जुम्मा आणि अकराची वेळ शुभ मानतात. मात्र,आपल्या पवार साहेबांना शनिवारी दुपारी तीन वाजता वेळ आहे हे पाहून रूढी परंपरांना फाटा देत आपल्या मुलीचा विवाह हा शनिवारी(दि.२८) दुपारी तीन वाजता विवाह आयोजित केला होता. लतिफ यांना पवारांवर श्रद्धा असल्यानं ते मुलीच्या लग्नाला नक्की येतील असा विश्वासही होता. आणि विवाह वेळेपूर्वी शरद पवार यांचं हेलिकॉप्टर मरावडे गावात उतरलं आणि तांबोळी यांचा साहेंबाविषयीचा विश्वास खरा ठरला.

शरद पवार यांची कामाची पध्दत, विषयाचा सखोल अभ्यास, वक्तशीरपणा, पक्ष, राजकारण यासोबतच साध्या गावातील कार्यकर्त्याची नावासह जपलेली ओळख हे नेहमीच कौतुकास्पद राहिली आहे. ब्याऐंशीव्या वर्षीही पवार हे आपल्या आजारपणाला आव्हान देत,अविरतपणे राज्याच्या विविध भागातील दौरा करत असतात. तसेच एकीकडे राजकीय भूमिका मांडतानाच दुसरीकडे सामाजिक बांधिलकी जपण्यासाठीही आग्रही दिसतात. याच पार्श्वभूमीवर त्यांनी आपल्या कार्यकर्त्याच्या लग्नाला लावलेली उपस्थिती राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.

कारण पवार अगदी मोजक्याच सार्वजनिक कार्यक्रमांना पत्नी प्रतिभा पवार यांच्यासह हजेरी लावतात. पण मंगळवेढा तालुक्यातील एका साध्या कार्यकर्त्याच्या मुलीच्या विवाहासाठी हेलिकॉप्टर घेऊन सपत्नीक पवार आल्यानं लतिफ तांबोळी यांच्या मुलीच्या लग्नाला पवारांच्या उपस्थितीमुळं चार चांद लागले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना पुन्हा बळ मिळाल्याचं पाहायला मिळालं आहे. या प्रसंगावरुन पवारांची इतक्या आव्हानानंतरही गावपातळीवरील कार्यकर्त्यांशी आपली नाळ या वयातही किती घट्ट आहे याचे प्रत्यंतर महाराष्ट्राला आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT