Kolhapur MahaPalika : "आमची निवडणूक महाविकास आघाडीच्या उमेदवारांसोबत नाहीच. आमची निवडणूक थेट बावड्याच्या विरोधात आहे. जसा त्यांचा बावडा आहे तशी माझी साने गुरुजी वसाहत आहे. इथे खूप ईर्षा होणार आहे. तुम्ही सगळे तयार राहा, असे म्हणत शिवसेना नेते शारंगधर देशमुख यांनी थेट काँग्रेस नेते, आमदार सतेज पाटील यांना ललकारलं आहे. देशमुख हे कधीकाळी सतेज पाटील यांचेच धडाडीचे शिलेदार होते. पण विधानसभा निवडणुकीनंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
कोल्हापूर महापालिकेसाठी महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी थेट लढत होत आहे. पण प्रभाग क्रमांक नऊमधील लढत चर्चेची बनली आहे. शारंगधर देशमुख हे इथून शिवसेनेतून रिंगणात उतरले आहेत. तर त्यांचा पराभव करण्यासाठी आमदार सतेज पाटील यांनी तयारी केली आहे. पाटील यांनी देशमुख यांच्याविरोधात विश्वासू पदाधिकारी, माजी नगरसेवक राहुल माने यांना उतरवले आहे. माने यांनी मागील काही दिवसांपासून प्रभागात चांगली ताकद लावल्याचे दिसून येत आहे.
कोल्हापूर महापालिकेच्या राजकारणात देशमुख कधीकाळी काँग्रेसचा महत्त्वाचा चेहरा मानले जात होते. आमदार सतेज पाटील यांचे कट्टर समर्थक होते. महापालिकेत काँग्रेसची त्यांच्यावर मदार होती. पाटील यांनी जवळपास 10 वर्षे त्यांच्याकडे काँग्रेसचे गटनेते पद दिले होते. आघाडी सांभाळण्याचे काम त्यांनी त्यांच्याकडे सोपविले होते.
मात्र सतेज पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर उत्तरमधून उमेदवारी डावलल्याने देशमुख नाराज झाले. त्यांनी काँग्रेसची साथ सोडून शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्यासह काही इच्छुक आजी-माजी नगरसेवकांनी देशमुख यांच्यासह शिवसेनेत प्रवेश केला होता. आता देशमुख यांनी थेट सतेज पाटील यांच्याच विरोधात लढाईचे रणशिंग फुंकल्याने 15 दिवसांत राजकीय वातावरण तापण्याचे संकेत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.