कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघात मागच्या 24 तासात घडलेल्या प्रचंड नाट्यमय घडामोडींनंतर अध्यक्षपदाची धुरा अखेर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नविद मुश्रीफ यांच्याकडे आली आहे. आज (शुक्रवारी) दुपारी संचालक मंडळाच्या बैठकीत त्यांच्या शिक्कामोर्तब झाले. त्यानंतर त्यांची अधिकृत निवड जाहीर झाली.
पण नविद मुश्रीफ यांच्या निवडीने मागील 10 दिवसांपासून चर्चेत असलेले शशिकांत पाटील चुयेकर यांचे नाव मागे पडले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आग्रहाने महायुतीचा अध्यक्ष तर खुर्चीत बसला. पण याच नेत्यांच्या सत्तेच्या मोहामुळे गोकुळचे संस्थापक दिवंगत आनंदराव पाटील चुयेकर यांचा मात्र मुलगा अध्यक्ष होता होता राहिला.
अरुण डोंगळे यांच्या राजीनाम्यानंतर शशिकांत पाटील-चुयेकर यांचे नाव आघाडीवर होते. त्यामुळे जल्लोषाची आणि गाव जेवणाची सगळी तयारी झाली होती. गोकुळ दूध संघाच्या संस्थापकांच्या घरीच अध्यक्षपद येत असल्याने जंगी मिरवणुकही निघणार होती. मात्र गोकुळमधील राजकीय आणि आर्थिक फायदे नेत्यांना दुर्लक्ष करता आले नाहीत. त्यामुळे पाटील यांना अध्यक्षपदापासून वंचित रहावे लागले.
62 वर्षांपूर्वी आनंदराव पाटील चुयेकर यांनी गोकुळ दूध संघाची स्थापना केली. सुरुवातीला सायकलवरून दूध संकलन करून त्यांनी ही संस्था नावारुपाला आणली. त्यांनी लावलेल्या छोट्याशा रोपट्याचा आज वटवृक्ष झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागाची आर्थिक वाहिनी म्हणून गोकुळ दूध संघाकडे आज पाहिले जाते.
दूध संघाच्या स्थापनेपासून आजपर्यंत काही काळ वगळता चुयेकर कुटुंबियांचा गोकुळ मधील सहभाग केवळ संचालक पदापुरातच मर्यादित राहिला आहे. पूर्वी आनंदराव पाटील-चुयेकर यांच्या पत्नी जयश्री यांनी संचालक पदावर काम पाहिले. पण यावेळी सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ शशिकांत पाटील चुयेकर यांना संधी देण्यात आली.
सुरुवातीला गोकुळचे अध्यक्षपद 2 वर्ष सतेज पाटील गटाकडे आणि 2 वर्ष हसन मुश्रीफ यांच्याकडे राहिले. आता एक वर्षासाठी अध्यक्षांची निवड 25 मे रोजी होणार होती. पण राज्यातील सत्तांतर झाल्याचा परिणाम गोकुळमध्ये झाला. अरुण डोंगळे यांनी राजीनामा न देण्याची भूमिका घेतली. संघावर अध्यक्ष महायुतीचाच असावा असा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा विचार असल्याचे सांगितले.
पण हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांच्या आक्रमक रणनीतीपुढे डोंगळे यांनी नमते घेतले आणि राजीनामा देऊन मोकळे झाले. त्यानंतर सर्व संमतीने शशिकांत पाटील चुयेकर त्यांचे नाव आघाडीवर आले. संस्थापकांच्या चिरंजीवालाच संधी मिळत असल्याने विरोध होण्याची शक्यता कमीच होती. तब्बल 35 वर्षानंतर चुयेकर कुटुंबाकडे अध्यक्षपदाचा मान जाणार होता.
त्यामुळे सहाजिकच गावातही तयारी पूर्ण झाली होती. जंगी मिरवणूक काढून जल्लोष केला जाणार होता. दारात मांडव सजवला होता. गावजेवण ठेवण्यात आले आणि त्याचे आमंत्रणही सगळ्यांना देण्यात आले. पण बुधवारपासून पुन्हा एकदा महायुतीचाच अध्यक्ष हवा असा हट्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
या हट्टामुळे शशिकांत पाटील चुयेकर यांचे नाव मागे पडले आणि नविद मुश्रीफ यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडली. शशिकांत पाटील चुयेकर अध्यक्ष होता होता थोडक्यात राहिले. याबाबत बोलताना ते म्हणाले, मी शाहू आघाडीचा एक घटक आहे. वरिष्ठ नेत्यांचा जो आदेश आहे तो मला पाळावाच लागणार आहे. मी कोणावरही नाराज नाही. सर्वजण एकत्र मिळून काम करू.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.