Rajendra Patil Yadravkar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Shirol Assembly Election: यड्रावकर दुसऱ्यांदा आमदार होणार का 'स्वाभिमानी' बालेकिल्ला राखणार ? शिरोळमध्ये तिरंगी लढत

Mahavikas Aghadi and Mahayuti Face New Competition: महाविकास आघाडीचे उमेदवार गणपतराव पाटील आणि महायुतीचे पुरस्कृत उमेदवार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यातच फाईट होईल अशी चिन्हे होती. मात्र ऐनवेळी स्वाभिमानीने माजी आमदार उल्हास पाटील यांना उमेदवारी दिली.

Rahul Gadkar

Kolhapur News: शिरोळ विधानसभा मतदारसंघांमध्ये सुरुवातीला महाविकास आघाडीचे गणपतराव पाटील विरुद्ध महायुतीचे पुरस्कृत शाहू आघाडीचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर असे दुरंगी लढत स्पष्ट होत असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेने महाविकास आघाडीचे गणित बिघडवले आहे. माजी आमदार उल्हास पाटील यांना उमेदवारी देऊन तिरंगी लढत या मतदारसंघात केली आहे.

ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार उल्हास पाटील यांनी महाविकास आघाडीतच बंडखोरी केल्याने मतदार संघातील लढत लक्षवेधी बनली आहे. शेतकरी संघटनांच्या मुशीतील तालुक्यात कारखानदार विरुद्ध शेतकरी संघटना अशी लढत होणार आहे.

दोन साखर कारखानदारांबरोबरच शेतकरी संघटनेची ताकद एकवटली आहे. मात्र जात फॅक्टर हीच निकालाचा चेहरा स्पष्ट करणार आहे. जैन लिंगायत आणि मराठा समाजावरच विजयाची गणित अवलंबून असणार आहे.

राजर्षी शाहू विकास आघाडीकडून शरद साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, महाविकास आघाडीकडून दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून माजी आमदार उल्हास पाटील हे तिघेजण शिरोळच्या मैदानातून रिंगणात आहेत.

लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना 76 हजार, महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरूडकर यांना 73 हजार तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेला 60 हजाराच्या आसपास मताधिक्य मिळाले होते.

विधानसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटना कोणता उमेदवार देणार याकडे लक्ष राहिले होते. महाविकास आघाडीचे उमेदवार गणपतराव पाटील आणि महायुतीचे पुरस्कृत उमेदवार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यातच फाईट होईल अशी चिन्हे होती. मात्र ऐनवेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ठाकरेंच्या शिवसेनेला हादरा देत माजी आमदार उल्हास पाटील यांना उमेदवारी दिली.

दुसऱ्यांदा आमदार होण्यासाठी यड्रावकर मतदारसंघात चांगली बांधणी केली आहे. तर दहा वर्षानंतर पुन्हा काँग्रेसला उमेदवारी घेऊन पराभवाचे शल्य दूर करण्यासाठी गणपतराव पाटील निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. दुरंगी लढत होत असताना स्वाभिमानीने दिलेला झटका हा गणपतराव पाटील यांना बसण्याचा अंदाज आहे. शिरोळच्या मैदानात स्वाभिमानीचा विजय संघटनेसाठी प्रतिष्ठेचा बनला आहे. त्यादृष्टीने प्रचाराची रणनीती आखली जात आहे.

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला पूरक असे चित्र निर्माण झाले असताना विधानसभा निवडणुकीत दिलेला स्वाभिमानीने झटका हा महायुतीला पुन्हा एकदा फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. उल्हास पाटील लोकसभेला महाविकास आघाडीत होते. मात्र स्वाभिमानीकडे गेल्याने संघटनेला बळ मिळाले आहे.

लोकसभेचा आकडा गृहीत धरल्यास महायुतीचे राजेंद्र पाटील यड्रावकर आणि स्वाभिमानीचे उल्हास पाटील यांच्यातच खरी लढत म्हणावी लागेल. मात्र काँग्रेसचे उमेदवार गणपतराव पाटील यांनी दहा वर्षाची मरगळ झटकण्याचे ध्येय पुढे ठेवले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसातच काँग्रेस हात बळकट करणार की? यड्रावकर दुसऱ्यांदा आमदार होणार? का स्वाभिमानी शेतकरी संघटना आपला बालेकिल्ला राखणार? याचे चित्र स्पष्ट होणार आहे.

Edited by: Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT