(राजेंद्र त्रिमुखे)
Ahmadnagar Politics : गेली तीन वर्ष शिवसेने (ठाकरे गटा) सोबत असलेले माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी आज (22 जुलै) मुंबईमध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. अभिषेक कळमकर यांच्या शरद पवार राष्ट्रवादी गटातील प्रवेशामुळे नगर शहरात पक्षाला नवचैतन्य मिळणार असल्याचे दिसत आहे. कळमकर यांना पक्षाकडून महत्वाची जबाबदारी देण्यात येणार आहे.
शरद पवार यांचे एकनिष्ठ जुने विश्वासू माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांचे अभिषेक कळमकर हे पुतणे आहेत. अभिषेक कळमकर यांनी राष्ट्रवादीच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर ते शहराचे महापौरही झाले. मात्र, दरम्यानच्या काळात आमदार संग्राम जगताप यांच्या गटाशी त्यांचे राजकीय गणित न जुळल्याने त्यांनी राष्ट्रवादी पक्षाला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला.
गेले तीन वर्ष ते शिवसेना पक्षात कार्यरत होते. यादरम्यान त्यांनी विविध आंदोलनात सहभाग घेत शिवसेनेच्या (Shiv Sena) नेतृत्वाची धुरा सांभाळली. मात्र, नुकत्याच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) पडलेल्या उभ्या फुटीनंतर नगर शहरातील एकूणच सर्व राष्ट्रवादी पक्ष आमदार संग्राम जगताप यांच्यासोबत अजित पवार यांच्याकडे गेला आहे. त्याचबरोबर शहरातील शहर जिल्हाध्यक्ष माणिकराव विधाते, शहर कार्याध्यक्ष अभिजित खोसे यांनीही अजित पवार गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला.
या पार्श्वभूमीवर पक्षात घडलेल्या उभ्या फुटीनंतर शरद पवार (Sharad Pawar) यांच्या गटाकडे नगर शहरांमध्ये कोणतीही ताकद राहिली नसल्याचे दिसून येत असतानाच आता अभिषेक कळमकर यांनी समर्थक कार्यकर्त्यांसोबत शरद पवार यांची भेट घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. यावेळी खासदार सुप्रिया सुळे या उपस्थित होत्या.
अभिषेक कळमकर यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये केलेला पक्षप्रवेश याकडे एक मोठी घटना म्हणून पाहिले जाणार आहे. युवा वर्गाचे संघटन त्यांच्या मागे शहरात आहे. त्याचबरोबर अजित पवार यांनी भाजप (BJP) सोबत जाण्याचा घेतलेला निर्णय न आवडलेले राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा मोठा गट त्यांच्यासोबत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात नगर शहरात शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाची ताकद नव्याने उभी राहील अशी शक्यता आता दिसून येत आहे.
दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे सचिव अनिल देसाई यांना पाठवलेल्या शिवसेना सदस्यत्व राजीनामा पात्रात कळमकर यांनी शिवसेना पक्षाचे आभार मानले आहेत. गेले 3 वर्ष शिवसैनिक म्हणून अहमदनगर शहरातील प्रस्थापितांविरुद्ध कळमकर यांनी संघर्ष केला. तथापि आता व्यापक स्तरावर आणि परिणामकारक संघर्षाची गरज असल्याने शिवसेनेच्या सैनिकपदाच्या जबाबदारीतून आजपासून मुक्त होत असल्याचे कळमकर यांनी स्पष्ट केले आहे.
Edited by : Amol Jaybhaye
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.