Sanjay Pawar
Sanjay Pawar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

‘आम्हाला काँग्रेस-राष्ट्रवादीनं फसवलं नाही; तर आमच्याच लोकांनी गद्दारी करत विश्वासघात केला’

सरकारनामा ब्यूरो

कोल्हापूर : शिवसेनेने (Shivsena) आजपर्यंत अनेकांना मोठे केले आहे. त्यातीलच काहींनी आज बंडखोरी करत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा विश्वासघात केला आहे. आम्हाला काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीने (NCP) फसवलेले नाही, तर आमच्याच लोकांनी गद्दारी आणि विश्वासघात केला. भाजपचे ऐकून स्वतःच्या स्वार्थासाठी उद्धव ठाकरे यांच्या आजारपणात बंडखोरांनी षडयंत्र केले, उद्धव ठाकरेंना फसविले, अशा शब्दांत कोल्हापूरचे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार (Sanjay Pawar) यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. (Shiv Sena was not deceived by Congress-NCP: Sanjay Pawar)

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीनंतर संजय पवार बोलत होते. त्यावेळी त्यांनी आपल्या मनातील भावना व्यक्त करत बंडखोरांवर सडेतोड शब्दांत ताशेरे ओढले. ते म्हणाले की, अनेक वर्षांच्या परंपरेप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी आपल्या वाढदिवसाच्या अगोदर परखड मत व्यक्त करत मुलाखत दिली आहे. मुलाखतीत त्यांनी जे सांगितले, ते ऐकून आम्हाला फार वाईट वाटले. अत्यंत गलिच्छपणे राज्याचे राजकारण सुरू आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीवार्दामुळे या बंडखोरांना सर्व सन्मान मिळाला. शिवसेनेमुळे आमदार, खासदार, मंत्री झालो. चारही बाजूंनी गलेलठ्ठ झाले आणि उद्धव ठाकरे आजारी असताना ते बरे व्हावेत; म्हणून एकीकडे राज्यातील नागरिक प्रार्थना करत होते, असंख्य शिवसैनिक देवदेव करत होते. देवांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे त्यातून बरे झालेसुद्धा. त्याचवेळी हे बंडखोर ठाकरे यांचे वाईट चिंतून भाजपचे ऐकून षडयंत्र रचत होते. अत्यंत गलिच्छ राजकारण करत या बंडखोरांनी पाप केले आहे.

सर्वसामान्य कार्यकर्त्याला उच्च पद देण्याचे काम फक्त शिवसेनेमध्येच होते. शिवसेनेने आजपर्यंत जे रंजले गांजले आणि प्रामाणिक राहिले त्यांनाच मोठे करण्याचे काम केले आहे. त्यातीलच काहींनी आज बंडखोरी करत उद्धव ठाकरेंचा विश्वासघात केला आहे. लोकप्रतिनिधी सोडून गेले असले तरी सर्वसामान्य शिवसैनिक आजही ठाकरेंच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत आणि यापुढेसुद्धा उभे राहतील. भाजपचे ऐकून स्वतःच्या स्वार्थासाठी उद्धव ठाकरे यांच्या आजारपणात या बंडखोरांनी षडयंत्र केले, त्यांना फसविले. शिवसेनाप्रमुखांना काय वाटत असेल. ‘कुठली ही माणसं मोठी करून पाप केले,’ असे त्यांना वाटत असेल. त्या रागापोटीच उद्धव ठाकरे आता चिडले आहेत. ते एकतर कधी चिडत नाहीत; पण चिडल्यानंतर कोणाला सोडतसुद्धा नाहीत, असेही संजय पवार यांनी स्पष्ट केले.

जिल्हाप्रमुख पवार म्हणाले की, आदित्य ठाकरेंनी दौरे सुरू केले आहेत, आता उद्धव ठाकरेही दौऱ्याला सुरुवात करणार आहेत. पश्चिम महाराष्ट्रात ज्यांनी ज्यांनी शिवसेनेशी गद्दारी केली आहे, आम्हाला फसविले आहे, त्यांना येणाऱ्या निवडणुकीत जनता धडा शिकविणार आहे. या बंडखोरांनी येऊन उद्धव ठाकरेंजवळ आपल्या भावना व्यक्त केल्या असत्या तर पक्षप्रमुख आणि कुटुंबप्रमुख या नात्याने ते बोलले असते. त्यांनी जर नकार दिला असता तर गोष्ट वेगळी होती. पण, बंडखोरांनी अशी पाठ दाखवून गुवाहाटीपर्यंत पळायची गरज नव्हती. तुम्ही शिवसैनिक होता, तर सामोरे जाऊन याबाबत उद्धव ठाकरेंना विचारणा करायला हवी होती.

बाळासाहेबांचा फोटो न लावण्याचे उद्धव ठाकरे यांचे आवाहन योग्यच आहे. प्रत्येक बंडखोरांनी आपल्या वडिलांचे फोटो लावून मत मिळवावीत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आणि धनुष्यबाण नसेल तर आपले डिपॉझिट जप्त होईल, हे बंडखोरांना माहिती आहे, त्यामुळेच ते बाळासाहेबांच्या फोटोबाबत आजही आग्रही आहेत, असा दावा संजय पवारांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT