Shivpremis protest as Shivaji Maharaj’s Wagh Nakh exhibition opens in Kolhapur amid government negligence. Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur News : वाघनखे प्रदर्शन उद्घाटनाचा खेळखंडोबा; ऐतिहासिक कोल्हापूरातच कार्यक्रमाला गर्दी गोळा करण्याची नामुष्की

Kolhapur News : छत्रपती शिवाजी महाराजांचे लंडनहून आणलेले वाघनखे आता कोल्हापूरमध्ये प्रदर्शनासाठी ठेवण्यात आले आहेत. मात्र पुरातत्व विभागाच्या निष्काळजीपणामुळे शिवप्रेमी आणि कोल्हापूरकरांनी उद्घाटन कार्यक्रमावर बहिष्कार टाकला.

Rahul Gadkar

Kolhapur News : लंडनच्या व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालयातून भारतात आणलेली छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखे ही त्यांच्या पराक्रमाची आणि कर्तृत्वाची साक्ष देतात. ही वाघनखे सर्व नागरिकांनाही बघता यावी यासाठी आधी साताऱ्यामध्ये ठेवण्याती आली होती. आता ती कोल्हापूमध्ये प्रदर्शनात ठेवण्यात येणार आहेत. मात्र कोल्हापूरला गेल्यापासून या ऐतिहासिक ठेव्याची हेळसांड सुरु असल्याचं समोर आलं आहे.

महिन्याभरापूर्वीच ही वाघनखे कोल्हापुरात आली होती. तेव्हापासून या प्रदर्शनाच्या उद्घाटनाची कोल्हापूरकरांना वाट पहावी लागली. अखेर मंगळवारी (28 ऑक्टोबर) शिवशस्त्रशौर्यगाथा या प्रदर्शनाचे उद्घाटन पार पडले. मात्र राज्य सरकारच्या पुरातत्व विभागाकडून झालेल्या निष्काळजीपणामुळे तमाम शिवप्रेमी आणि कोल्हापूरकरांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली.

जिल्ह्यातील लोकप्रतिधींना या कार्यक्रमाचे निमंत्रण नव्हते. इतकेच नव्हे तर खुर्च्या रिकाम्या दिसल्याने चक्क एका महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल सोडून या ठिकाणी बसवण्यात आले. संपूर्ण प्रकरणानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास केवळ महायुतीच्या दिखाव्यासाठी पुढे आणला जात आहे का? असाच सवाल तमाम शिवप्रेमींकडून होत आहे.

शिवशस्त्रशौर्यगाथा या प्रदर्शनाचे उद्घाटन कोल्हापुरातील कसबा बावडा येथील लक्ष्मी विलास पॅलेस येथे आयोजित केले होते. पुढील 8 महिने छत्रपती शिवाजी महाराज यांचे वाघनखे कोल्हापुरातील संग्रहालयात राहणार आहेत. त्याच्या उद्घाटन प्रसंगी सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार हे कोल्हापुरात येणार होते. तर श्रीमंत शाहू महाराज छत्रपती हेदेखील उपस्थित राहणार होते.

मात्र राज्य सरकारच्या पुरातन विभागाकडून निष्काळजी आणि ढिसाळ नियोजनाचा फटका या प्रदर्शनाला बसला. हा कार्यक्रम सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला होता. मात्र तो सकाळी 10 वाजताच सुरू झाला. सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार आणि खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी ऑनलाईन या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली.

केवळ पालकमंत्री प्रकाश आबिटकर, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता, जिल्हा परिषदेचे सीईओ कार्तिकीएन एस या कार्यक्रमाला उपस्थित होते. जिल्ह्यातील कोणत्याही लोकप्रतिनिधीला याचं निमंत्रण दिलं गेलं नव्हतं. त्यामुळे एकही लोकप्रतिनिधी या सोहळ्यासाठी उपस्थित राहिला नाही.

कोल्हापुरातील शिवभक्त, इतिहास संशोधक, अभ्यासक आणि शिवप्रेमींनीही देखील या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. त्यामुळे सोहळ्यातील सर्व खुर्च्या रिकाम्या होत्या. पालकमंत्र्यांना वस्तुस्थिती लक्षात आल्यानंतर अधिकाऱ्यांनी समोरील एका खाजगी कॉलेजमधील विद्यार्थी आणून खुर्च्या भरून कार्यक्रमाची शोभा वाढवण्याचा प्रयत्न केला. पुरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गे यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते.

दरम्यान, या संपूर्ण प्रकारानंतर पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. हा केवळ औपचारिक कार्यक्रम आहे. येत्या आठ महिन्यात विविध कार्यक्रमांचा आयोजन केलं जाणार आहे. पण कार्यक्रमात ढिसाळ आणि निष्काळजीपणा झाला असेल तर अधिकाऱ्यांवर योग्य कारवाई केली जाईल, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

कारवाईची मागणी :

दरम्यान, निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक त्यांनी केली आहे. यावर पुरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गे यांना याबाबत विचारले असता त्यांनी या संदर्भात माहिती देण्याचा टाळाटाळ करून कार्यक्रमास्थळावरून पळ काढला.

विद्यार्थ्यांवर अधिकाऱ्यांची दादागिरी :

कार्यक्रमातील खुर्च्या भरण्यासाठी एका खाजगी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना या सोहळ्यासाठी आणण्यात आले. या विद्यार्थ्यांचे प्रॅक्टिकल सुरू असताना त्यांना आणण्यात आले. मात्र काही विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाची रूपरेषा पाहून संताप व्यक्त केला. हे प्रदर्शन पाहायला गेलेल्या विद्यार्थ्यांनाच हे अधिकारी दमदाटी करत होते. कार्यक्रम झाल्याशिवाय कोणीही उठू नका. त्याशिवाय प्रदर्शन बघता येणार नाही असा दमच विद्यार्थ्यांना हे अधिकारी देत होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT