Shivendraraje Bhosale, Sharad Pawar
Shivendraraje Bhosale, Sharad Pawar sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

शिवेंद्रसिंहराजेंचे अध्यक्षपद हुकले पण, म्हणाले एकमताने ठरलं...

सरकारनामा ब्युरो

सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे नूतन अध्यक्ष नितीन पाटील आणि उपाध्यक्ष अनिल देसाई जिल्हा बँक अतिशय चांगल्याप्रकारे चालवण्याबरोबरच जिल्हा बँकेचा नावलौकिक कायम राखतील, असा विश्वास माजी अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केला. सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडी जाहीर झाल्यानंतर त्यांनी पत्रकारांसमोर आपली प्रतिक्रिया दिली.

ते म्हणाले, 'सातारा जिल्हा बँक अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीच्या अनुषंगाने दोन दिवसांपूर्वी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर तसेच अन्य संचालक मंडळी आम्ही एकत्र बसलो होतो. त्यावेळी सर्वांशी चर्चा झाली. अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या दोन्ही निवडी आपल्याला एकमताने करायच्या आहेत, असे यावेळी ठरले होते आणि तसेच झाले. अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडी बिनविरोध करण्याची सातारा जिल्हा बँकेची परंपरा आहे. यावेळीही ती कायम राहिली.

त्यानुसार अध्यक्षपदासाठी नितीन पाटील आणि उपाध्यक्षपदासाठी अनिल देसाई यांचे नाव निश्चित केले. 'नूतन अध्यक्ष नितीन पाटील आणि उपाध्यक्ष अनिल देसाई हे दोघेही जिल्हा बँकेचा नावलौकिक कायमच ठेवतील, असा विश्वास व्यक्त करुन शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, 'नवीन पदाधिकारी सभापती रामराजे, बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली जिल्हा बँक अतिशय चांगली चालवतील, असा मला विश्वास आहे. जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी पुन्हा संधी मिळावी म्हणून मी स्वत: इच्छुक होतो. माझ्याबरोबरच सत्यजितसिंह पाटणकर, राजेंद्र राजपूरे इच्छुक होते.

उपाध्यक्षपदासाठी दत्तानाना ढमाळ आणि शिवरुपराजे खर्डेकर यांनीही इच्छा व्यक्त केली होती. प्रत्येकांनी इच्छा व्यक्त केली होती. इच्छुकांनी आपली मते मांडली होती. मात्र, दोन्ही निवडी एकमताने करण्याचे ठरले होते. त्यानुसार या निवडी झाल्या आहेत. दरम्यान, उदयनराजे अध्यक्षपदासाठी इच्छुक होते, असे त्यांना छेडले असता त्यांनी त्यावर अधिक प्रतिक्रिया दिली नाही. उदयनराजे आज सकाळी रामराजेंना भेटले होते. मात्र, त्यांचे बोलणे काय झाले, याची माहिती मला नाही, असे नमूद करतच त्यांनी पत्रकारांशी बोलणे आटोपते घेतले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT