सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या झरे शाखेत मध्यरात्री 22 लॉकर फोडून कोट्यवधींचा ऐवज चोरीला गेला.
पोलिस तपासात चोरांना बँकेच्या आतील रचनेची सखोल माहिती असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
या घटनेमुळे ठेवीदारांमध्ये भीती निर्माण झाली असून बँक प्रशासनाच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
Sangli Crime News : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या झरे (ता. आटपाडी) शाखेत बुधवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दरोडा टाकला होता. ज्यात त्यांनी बँकेत घुसून 22 लॉकर फोडले होते. या चोरीत त्यांनी, 7 किलो सोने, 20 किलो चांदीसह कोट्यवधींचा मुद्देमाल लंपास केला. या चोरीमुळे ठेवीदार आता चांगले चिंतेत आले आहेत. दरम्यान आता या चोरीमुळे बँक प्रशासनाच्या सुरक्षा व्यवस्थेचा फोलपणा उघड झाला असून बँकेच्या अधिकाऱ्यांनी आटपाडी पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. पोलिस तपास करत असून या चोरीवरून विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ज्यात चोरांना चोरांना बँकेच्या आतील खडान् खड्याची माहिती असल्याचा तर्क व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे आता बँक प्रशासनाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
झरे येथील बसस्थानक परिसरातील तुकाराम नाना पडळकर यांच्या मालकीची इमारत जिल्हा बँकने भाडे तत्त्वावर घेतली होती. तेथे बँक सुरू करण्यात आली होती. याच बँकेत एका वर्षाच्या आधी चोरीचा प्रयत्न झाला होता. मात्र बँक प्रशासनाने सुरक्षा व्यवस्थेचा विचार केला नसल्याचे आता बुधवारी झालेल्या चोरीवरून दिसून येत आहे. बुधवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी पूर्वेकडील बाजूची खिडकी कटरने कापून बँकेत प्रवेश केला. आणि 22 लॉकर फोडत 7 किलो सोने, 20 किलो चांदीसह कोट्यवधींचा मुद्देमाल लंपास केला.
यानंतर आता पोलिस तपास करत असून यात धक्कादायक माहिती समोर येताना दिसत आहे. पहिला मुद्दा की, बँकेच्या पूर्वेकडील बाजूस म्हणजे मागच्या बाजूस खिडकी असणे, ही बाबच मुळात बँकेच्या सुरक्षेला तडा देणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक असणारी खिडकी का ठेवली असा सवाल आता उपस्थित होताना दिसत आहे.
दुसरा मुद्दा असा की, बँकेची स्ट्राँग रूम आणि लॉकर रूम ही सिमेंट काँक्रीटने बंधिस्त असावी लागते, त्यांचे दरवाजे अतिशय मजबूत, लोखंडी आणि सुरक्षित असणे गरजेचे आहेत. त्याला सायरण असणे गरजेचे आहे. मात्र प्रत्यक्षात येथील दरवाजे हे साध्या प्लायवूडचे निघाले आहेत. तिसरी गोष्ट म्हणजे या बँकेत जे लॉकर बसविण्यात आले आले आहेत. ते नामवंत कंपनीचे आहेत. पण यातील एक लॉकर गॅस कटरने कापण्यात आले आहे. यामुळे बँकेत मौल्यवान वस्तू आता सुरक्षित नव्हत्या असाच तर्क लावला जात आहे.
चौथा मुद्दा असा की सोळा शाखांची सुरक्षा व्यवस्था राम भरोसे असल्याचे आता उघड झाले असून फक्त दोन ठिकाणीच सुरक्षारक्षक नेमण्यात आले आहेत. ज्या आटपाडी शहर व आटपाडी मार्केट यार्ड या दोन शाखांचा समावेश आहे. तर या शाखा स्वतःच्या जागेत, स्वतःच्या इमारतीत असल्यानेच येथे सुरक्षारक्षक नेमण्यात आले आहेत. उर्वरित ठिकाणी सुरक्षारक्षकच नाहीत.
शाखाधिकारी हेच कॅशिअर
धक्कादायक म्हणजे १६ शाखा असणाऱ्या सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत आता मणुष्यबळही कमी असल्याचे दिसून येत आहे. झरे शाखेच्या बाबतीतही सांगायचे झाले तर येथे फक्त तीन कर्मचारी कार्यरत असून शाखाधिकारी हेच कॅशिअर आहेत. तर एक लिपिक आणि एक शिपाई बँखेची जबाबदारी वाहताना दिसत आहेत. तर फक्त तीन लोकांच्या जीवावर 22 लॉकर्स, 7 किलो सोने, 20 किलो चांदीसह कोट्यवधींचा मुद्देमाल बँक व्यवस्थापनेनं सोडल्याचे स्पष्ट होत आहे. जे धोक्याला आमंत्रण देणारे होते.
थेट विमा नाही
दरम्यान आता सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या झरे (ता. आटपाडी) शाखेतील लॉकर्सबाबत आणखी एक धक्कादायक बाबत समोर आली आहे. या लॉकरमधील मुद्देमालास कोणताही थेट विमा नसल्याचे आरबीआयच्या नियमांमध्ये स्पष्ट आहे. बँकेत चोरी होऊन लॉकर फोडले गेले आणि मुद्देमाल सापडला नाही, तर संबंधित लॉकरधारकास लॉकरच्या वार्षिक भाड्याच्या शंभरपट रक्कम नुकसानभरपाई म्हणून मिळू शकते. तर लॉकरचे वार्षिक भाडे साधारणतः ८०० ते २,००० रुपये असून डिपॉझिट १० ते २५ हजार रुपये इतके आहे. पण आता मुद्देमाल न सापडल्यास ग्राहकांना मिळणारी नुकसान भरपाई अत्यंत तोकडी असणार आहे.
1. ही चोरी कुठे आणि कधी झाली?
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या झरे (ता. आटपाडी) शाखेत बुधवारी मध्यरात्री.
2. किती लॉकर फोडण्यात आले?
एकूण 22 लॉकर फोडण्यात आले.
3. चोरीत किती ऐवज लंपास झाला?
सुमारे 7 किलो सोने, 20 किलो चांदी आणि कोट्यवधींची रोकड.
4. पोलिस तपासात काय नवे समोर आले?
चोरांना बँकेच्या आतल्या रचनेची आणि व्यवस्थेची माहिती होती, असा संशय आहे.
5. या चोरीमुळे ठेवीदारांवर काय परिणाम झाला आहे?
ठेवीदारांमध्ये भीती व चिंता निर्माण झाली असून बँकेच्या सुरक्षेवर विश्वास डळमळीत झाला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.