Ajit Pawar, Rahul Jagtap
Ajit Pawar, Rahul Jagtap  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

NCP News: अजितदादांच्या भेटीनंतर श्रीगोंद्याचे माजी आमदार कामाला लागले..

- संजय आ. काटे

Shrigonda News: जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा पराभव झाला. या पराभवाचे आत्मपरिक्षण सध्या राष्ट्रवादीचे नेते करीत आहे. याच पार्श्वभूमीवर श्रीगोंद्याचे माजी आमदार राहुल जगताप यांनी राष्ट्रवादीचे नेते, विरोधीपक्षनेते यांची भेट घेतली.

अजित पवार आणि राहुल जगताप यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली. या बंद दाराआड झालेल्या बैठकीत श्रीगोंद्यातील राजकीय आढावा घेण्यात आल्याचे समजते. श्रीगोंद्यातील राजकीय आढावा घेताना जिल्हा बँकेत नेमके काय झाले ? याचीही चर्चा झाल्याची माहिती आहे. या भेटीनंतर "आपण खूश असून पहिल्यापेक्षा जोरात तयारीला लागतोय," असे जगताप यांनी सांगितले.

जिल्हा बँकेतील अनपेक्षीत पराभवाने शंका-कुशंका घेतल्या जात असतानाच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी श्रीगोंद्याचे माजी आमदार राहूल जगताप यांना मुबंईला बोलाविले होते. जिल्ह्यात सध्या विशेषत: राष्ट्रवादीतील राजकारण चांगलेच तापले आहे. जगताप यांनी या भेटीला दुजोरा दिला आहे.

"महाविकास आघाडी सरकार असताना श्रीगोंदे मतदारसंघातील अनेक कामांना मंजूरी मिळाली होती. ती मंजूरी सध्याच्या सरकारने स्थगित केली आहे. त्यामुळे मतदारसंघाच्या विकासाला खीळ बसत असल्याचे वास्तव आपण दादांच्या कानावर घातले. इतरही महत्वाच्या विषयांची चर्चा झाली, दादांनी 'श्रीगोंद्यात राष्ट्रवादी वाढविताना जोरात तयारीला लागा' असे सूचित केल्याने आपण पहिल्यापेक्षा दुपटीने आता कामाला लागतोय असे जगतापांनी सांगितले.

बँकेत नेमके काय घडले याबाबत चर्चा झाली का, असे पत्रकारांनी विचारल्यावर जगताप म्हणाले, "राज्यात कुठे काय घडले याची पुराव्यानिशी माहिती दादांकडे असते. जिल्हा बँकेच्या निवडणुकीतही काय झाले हे त्यांना सगळे माहिती आहे. त्यांना मी सांगण्याची गरज नाही. तरीही आपल्याकडील माहिती आपण त्यांना दिली आहे. याबाबत जास्त बोलता येणार नाही," असे सांगत जगतापांनी हा विषय टाळला.

श्रीगोंद्यात झालेल्या व होवू घातलेल्या निवडणूकांबाबतही अजित पवार यांनी जगताप यांच्याकडून माहिती घेतली. अजितदादांच्या भेटीनंतर जोरात कामाला लागतोय हे जगताप यांचे बोल विधानसभेच्या दृष्टीने असल्याचे दिसते. 

जिल्हा बँकेच्या निवडणूकीत चंद्रशेखर घुले यांचा पराभव व शिवाजीराव कर्डीले यांचा विजय राष्ट्रवादीला धक्का होता. त्यामुळे आघाडीतील अनेक संचालकांकडे संशयाने पाहिले जात आहे. त्यातच अजितदादांचा निरोप आल्यावर जगताप मुंबईत त्यांना भेटायला गेले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT