Nilesh Lanke
Nilesh Lanke Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

आजारी आमदार लंके अचानक विधानसभेत दिसले

अमित आवारी

अहमदनगर - राज्यात सत्तांतर झाल्याने विधानसभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन सुरू आहे. काल ( रविवारी ) विधानसभेचे अध्यक्ष निवडीसाठी मतदान प्रक्रिया झाली. या मतदान प्रक्रियेला पारनेरचे आमदार नीलेश लंके अनुपस्थित होते. त्यानंतर त्यांच्या भूमिकेवर प्रश्न चिन्ह उपस्थित होऊ लागले होते. त्यांनी अनुपस्थितीला आजारपणाचे कारण दिले. मात्र अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी आमदार नीलेश लंके ( Nilesh Lanke ) मुंबईतील विभानसभेत दिसले. त्यामुळे आमदार लंकेच्या या कृतीवर जिल्ह्यात उलटसुलट चर्चा रंगली आहे. ( Sick MLA Lanka suddenly appeared in the Assembly )

विधानसभेत काल ( रविवारी ) राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार अनुपस्थित होते. यात आमदार नीलेश लंके यांचा समावेश होता. त्यामुळे नीलेश लंके हे जाणून बुजून गेले नाहीत अशी चर्चा रंगू लागली. आमदार लंके हे सध्या जरी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असले तरी ते पूर्वाश्रमीचे शिवसैनिक आहेत. ते काही वर्षे शिवसेनेचे तालुका प्रमुख होते. त्यामुळे त्यांचे शिवसेनेच्या काही वरिष्ठ नेत्यांशी चांगले संबंध आहेत. राज्यात शिवसेनेचे आता दोन भाग झाले आहेत.

आमदार लंके यांनी विधानसभेत काल न जाण्याचे कारण जाहीर केले. यात त्यांनी मी दोन दिवसांपासून आजारी असल्याचे सांगितले. ते शिरूर येथील श्रीगणेशा हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात येत होते. आजारी असलेले लंके आज थेट शिरूर ते मुंबई असा प्रवास करत अचानक विधानसभेत दिसले. तेही वेळेवर हजर राहून उभे राहत खणखणीत स्वरात स्वतःचे नाव सांगितले मात्र काही आमदार वेळेत विधानसभेत न आल्याने त्यांना मतदानापासून मुकावे लागले. यात अहमदनगर शहराचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचा समावेश आहे. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांत नक्की चाललेय काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

आमदार नीलेश लंके हे अचानक बरे कसे झाले यावर सध्या चर्चा रंगू लागली आहे. काही जणांच्या मते त्यांनी वरिष्ठांच्या आदेशामुळे जावे लागले. तर काहींच्या मते ही त्यांची काही तरी खेळी असावी असे सांगितले जात आहे. मात्र खरे काय हे आमदार लंके विधानसभेच्या बाहेर आल्यावरच स्पष्ट होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT