AAP Pimpri Chinchwad News : आम आदमी पार्टी (आप) महाराष्ट्रात लोकसभेची निवडणूक इंडिया आघाडीसोबत, तर विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे पक्षाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष चेतन बेंद्रे यांनी आज 'सरकारनामा'ला सांगितले. दरम्यान, त्यांच्या तयारीसाठी त्यांनी पक्षाची ८५ जणांची जंबो शहर कार्यकारिणी काल जाहीर केली. विशेष म्हणजे या कार्यकारिणीत सहा डॉक्टरांचा समावेश आहे. (Latest Marathi News)
आपच्या पुणे शहर कार्यकारिणीपेक्षा उद्योगनगरीची म्हणजेच पिंपरी-चिंचवडची कार्यकारिणी मोठी आहे. दोन दिवसांपूर्वी पुणे शहराची ७१ जणांची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून, जिल्ह्याची परवा जाहीर केली जाणार आहे. एकूणच 'आप'ने निवडणुकीची तयारी जोमात सुरू केली आहे. बेंद्रेंची २९ जुलै रोजी नियुक्ती होताच सव्वादोन महिन्यांत त्यांनी आपली टीम जाहीर केली, तर पुण्याच्या त्यांच्या कॅप्टनने ती पावणेदोन महिन्यातच निवडली. पिंपरी महापालिकेत खातेच उघडणार नाही, तर सत्तेत येऊ, असा मोठा दावा बेंद्रे यांनी कार्यकारिणी जाहीर केल्यावर केला. तसेच, सत्तेत आल्यावर शहरात दिल्लीचे आरोग्य आणि शिक्षणाचे मॉडेल राबवू, असे ते म्हणाले.
`आप`ला ला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाल्यानंतर राष्ट्रीय संघटन सचिव संदीप पाठक यांनी देशभर पक्षबांधणी सुरू केली आहे. महाराष्ट्रामध्ये राज्याचे सह प्रभारी गोपाल इटालिया आणि राज्य संघटनमंत्री अजित फाटके - पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उद्योगनगरीची कार्यकारिणी काल जाहीर केली गेली. त्यात चार उपाध्यक्ष, पाच संघटन मंत्री, एक महासचिव, तीन सचिव यांच्यासह सहसचिव, सहसंघटन मंत्री आणि विविध आघाडींच्या शहर अध्यक्षांचा समावेश आहे. यात नऊ महिलांचाही समावेश आहे.
उच्चशिक्षित आणि तरुणांना त्यात अधिक संख्येने स्थान देण्यात आले आहे. सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींचा त्यात जास्त समावेश आहे. पक्ष विस्तारासाठी शहरात मोठ्या प्रमाणावर मोहीम हाती घेणार असून, सदस्य नोंदणीकरिता मोबाईल ॲप लाँच करण्यात आले आहे, असे बेंद्रे यांनी सांगितले.
(Edited by - Chetan Zadpe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.