Vijaykumar Deshmukh-Rohini Tadawalkar  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur BJP : रोहिणी तडवळकरांनी केली आमदार देशमुखांची भाजपश्रेष्ठींकडे तक्रार; ‘शहर उत्तर’मध्ये पर्यायी यंत्रणा उभारण्याची परवानगी द्या’

Vijaykumar Deshmukh Vs Rohini Tadawalkar : आमदार देशमुख यांनी शिफारस केलेली नावे डावलून पक्षाच्या वरिष्ठांनी रोहिणी तडवळकर यांची नियुक्ती शहराध्यक्षपदी केली होती. त्यावेळी तीव्र पडसाद पक्षात उमटले होते.

Vijaykumar Dudhale, Sudesh Mitkar

Solapur, 11 October : सोलापूर शहर भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात वाद पेटला आहे. सोलापूर शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांची तक्रार भाजपचे संघटन मंत्री राजेश पांडे यांच्याकडे केली आहे. आमदार देशमुख हे कोणत्याही प्रकारचे सहकार्य करत नाहीत. पक्षाने दिलेले कोणतेही कार्यक्रम शहर उत्तरमध्ये राबविण्यात आलेले नाहीत. आम्हाला त्या ठिकाणी पर्यायी यंत्रणा उभारण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी तडवळकरांनी केली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत आज (ता. 11 ऑक्टोबर) सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि पुण्याची आढावा बैठक पार पडली. त्या बैठकीत तडवळकर यांनी भाजपचे संघटन मंत्री पांडे यांच्याकडे आमदार विजयकुमार देशमुख (Vijaykumar Deshmukh) यांची तक्रार पत्राद्वारे केली असल्याचे म्हटले आहे.

सोलापूर शहराध्यक्ष नियुक्तीपासून भाजपमध्ये वादाला सुरुवात झाली आहे. आमदार देशमुख यांनी शिफारस केलेली नावे डावलून पक्षाच्या वरिष्ठांनी रोहिणी तडवळकर (Rohini Tadawalkar ) यांची नियुक्ती शहराध्यक्षपदी केली होती. त्यावेळी तीव्र पडसाद पक्षात उमटले होते. त्यानंतर देशमुख समर्थकांनी पक्षाचे राजीनामे दिले आहेत. ते अजूनही मागे घेण्यात आलेले नाहीत.

काही दिवसांपूर्वी कार्यक्रमाला जाण्यावरूनही देशमुख, तडवळकर आणि देवेंद्र कोठे यांच्यात राजकीय कलगीतुरा रंगला होता. अगदी कमरेत लाथ घाला, अशी भाषा वापरली गेली होती. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपमधील अंतर्गत वाद उफाळून आलेला आहे. आता भाजपचे पक्षश्रेष्ठी त्यातून कसा मार्ग काढतात, हे पाहावे लागणार आहे.

पत्रात काय म्हटले आहे?

सोलापूर शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या कामकाजाबाबत संघटन मंत्री राजेश पांडे यांना पत्र लिहिले आहे. त्यात पत्रात तडवळकर यांनी म्हटले आहे की, आपण दिलेली भाजप शहराध्यक्षपदाची जबाबदारी मी समर्थपणे पार पाडण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे, संघटनमंत्री पांडे आणि मकरंद देशपांडे यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य मिळत आहे. मात्र, सोलापूर शहर उत्तर मतदारसंघाचे आमदार देशमुख यांच्याकडून कोणतेही सहकार्य मिळत नाही.

सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात एप्रिल महिन्यापासून जे जे पक्षाने कार्यक्रम दिले आहेत, ते तेथील मंडलाध्यक्ष यांनी राबवले नाहीत. या उलट पक्षाच्या इतर कार्यकर्त्यांच्या सहकार्याने आपण ते राबविले आहेत.

आगामी निवडणुकीत सोलापूर महापालिकेत भाजपची पुन्हा सत्ता आणण्यासाठी आम्हाला सक्षम पर्यायी यंत्रणा उभारण्याची परवानगी द्यावी. त्यासाठी सोलापूर शहर उत्तरमधील पदाधिकाऱ्यांनी दिलेले राजीनामे मंजूर करून दुसरे पदाधिकारी नेमणे. अनेक माजी नगरसेवक/पदाधिकारी हे व्यक्तीविरोधापायी भाजप सोडून गेले आहेत, त्यामुळे ते पक्षात परत येऊ इच्छितात, त्यांच्याबाबत निर्णय घेणे. तीन मंडल अधिकारी काहीही काम करत नाहीत, त्यांच्याबाबत लवकरात लवकर निर्णय घेणे, याबाबत मार्गदर्शन व्हावे, अशी मागणी शहराध्यक्ष तडवळकर यांनी संघटनमंत्र्यांकडे केली आहे.

योग्यवेळी माध्यमांशी बोलू : रोहिणी तडवळकर

यासंदर्भात सोलापूर शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर म्हणाल्या, आगामी निवडणुकीत महापालिकेत सत्ता मिळवण्यासाठी पक्षाच्या तीनही आमदारांसह पदाधिकाऱ्यांचे सहकार्य अपेक्षित आहे. मात्र, सोलापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात पक्षाचे कार्यक्रम राबवले जात नाहीत, हे उघड आहे. याबाबत माध्यमांशी योग्यवेळी बोलू.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT