Solapur, 26 October : मी चेअरमन असताना एक रुपयाही स्वतःच्या संस्थेला घेतले नाहीत, हे सांगण्यापेक्षा शेतकऱ्यांची ही बॅंक तुम्ही वैयक्तीक मालमत्तेसारखी वापरली. बॅंक अडचणीत आणण्यात सर्वांत मोठा वाटा हा मोहिते पाटलांचा आहे. विधान परिषद निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी मी स्वतः रणजितसिंह मोहिते पाटील यांना फोन केला होता. तुम्ही सोयीने बिनविरोधची भाषा करता. तुम्हाला खरंच शेतकऱ्यांचा कळवळा असेल, तर तुम्ही शांत बसा. बॅंकेची निवडणूक आपोआप बिनविरोध होईल, त्यासाठी तुम्ही पुढाकार घ्यायची काय गरज आहे, असा सवाल भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना केला.
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अकलूजमध्ये माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, माजी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील आणि प्रमुख नेतेमंडळींच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यात रणजितसिंहांनी मांडलेल्या भूमिकेला कल्याणशेट्टी यांनी उत्तर दिले.
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची निवडणूक भारतीय जनता पक्ष आणि महायुतीमधील मित्रपक्षांना सोबत घेऊन लढवणार आहोत. अडचणीत आलेली जिल्हा बॅंक प्रशासकाच्या काळात आर्थिकदृष्ट्या रुळावर आली आहे, त्यानंतर निवडणूक लागली आहे, असे कल्याणशेट्टी यांनी नमूद केले.
ते म्हणाले, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी काल सांगितलं की, शेतकऱ्यांची बॅंक आहे, निवडणूक लागली पाहिजे. पण आम्ही सगळ्यांना बोलावलं. जे आले ते ठीक आहे, जे आले नाहीत, त्या सर्वांच्या घरी आम्ही जाणार आहोत. शेतकऱ्यांच्या बॅंकेची निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे. डीसीसी बॅंकेबाबत मला खूप कळवळा आहे, काळजी आहे. तळमळ आहे, हे भासवण्यासाठी रणजितसिंह मोहिते पाटील हे सहानुभूतीचे कार्ड खेळले आहेत. लोकांमधून सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत.
मी चेअरमन असताना एक रुपयाचेही कर्ज माझ्या संस्थेला घेतलं नाही. बॅंकेला मी अग्रस्थानी आणून ठेवलं, असं मोहिते पाटील यांनी कार्यकर्त्यांसमोर बोलताना सांगितले. मला त्यांना एवढंच सांगायचं आहे की, तुम्ही फक्त तुमच्या पाच वर्षांच्या अध्यक्षपदाचा आलेख मांडू नका. आम्हाला जेव्हापासून कळतंय, तेव्हापासून जिल्हा बॅंकेची सूत्रं तुमच्या कुटुंबीयांच्या ताब्यात आहेत. तुमच्या घरातील तीन ते चार संचालक डीसीसी बॅंकेवर राहिलेले आहेत. तुम्ही डीसीसी बॅंकेतून किती पैसे उचलले आणि किती भरले. आजघडीला तुम्ही डीसीसी बॅंकेचे देणं किती आहे. ही लढाई राजकीय पक्षाची नाही. पक्षीय राजकारण बाजूला ठेवून कधी कधी राजकीय समीकरणं जुळवावी लागतात. पण, बॅंक अडचणीत आणण्यात सर्वांत मोठा वाटा हा मोहिते पाटील यांचा आहे, असा आरोप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केला.
ते म्हणाले, संचालक मंडळात असताना तुम्ही किती पैसे उचललले. आजघडीला तुमचा भरणा किती आहे. तुमच्या जवळच्या कार्यकर्त्यांना चार एकरांवर तुम्ही ९० कोटी रुपये कर्ज दिले आहे. राज्य सहकारी बॅंकेकडून पैसे घेऊन जो कारखाना घेतला आहे, त्याला पुन्हा सोलापूर डीसीसी बॅंकेकडून कर्ज देण्यात आलेले आहे. पण, रणजितसिंह मोहिते पाटील हे आता सहानुभूती मिळविण्यासाठी आणि बॅंक बिनविरोध व्हावी, यासाठी तुम्ही सगळ्यांच्या घरी जाणार आहेत. पण, विधान परिषद निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी मी स्वतः रणजितसिंह मोहिते पाटील यांना फोन केला होता. म्हणजे तुम्ही सोयीने बिनविरोधची भाषा करता.
तुम्हाला शेतकऱ्यांविषयी, सभासदांसाठी कळवळ नाही तर तुमची थकीत रक्कम वुसली थांबवता येते का, यासाठी तुम्ही प्रयत्नशील आहात. मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत बॅंकेसाठी पॅनेल तयार केले जाईल. तुम्हाला शेतकऱ्यांचा कळवळा असेल, बॅंक वाचवायची असेल तर तुम्ही शांत बसा. आपोआप बॅंकेची निवडणूक बिनविरोध होईल, त्यासाठी तुम्ही पुढाकार घ्यायची काय गरज आहे, असा सवालही त्यांनी केला.
ते म्हणाले, जिल्हा बॅंकेची निवडणूक बिनविरोध करायची म्हणायचं, सगळ्यांना भेटायचं आणि त्यात काहीतरी मांडून ठेवायचं, असा घाणेरडा प्रकार बॅंकेत अजिबात करू नका. ज्यांनी ज्यांनी बॅंक वाचविण्यासाठी प्रयत्न केले, ते सर्व आमच्या पॅनेलमध्ये असतील. पण, बॅंक अडचणीत आणण्याचे पाप ज्यांनी केलं आहे, त्यामध्ये तुम्ही अग्रेसर आहात.
तुमचा खरा रंग तेव्हाच कळेल
आज तुम्ही बॅंक आणि शेतकरी कळवळ्याची भाषा बोलत आहात. स्वतःच्या राजकारणासाठी तुम्ही जनतेमध्ये संभ्रम निर्माण करू नका. याउपरही तुम्हाला बोलायचे असेल तर मी पुन्हा प्रेस घेईन. कोणी किती आणि कसे पैसे घेतले हे पुढे आणेन. तुमचा खरा रंग ८८ अन्वये झालेल्या कारवाईच्या अहवालात दिसून येईल. त्यामुळे माझं तुम्हाला आवाहन आहे की, तुम्ही शांत बसा; सोलापूर डीसीसी बॅंकेची निवडणूक आपोआप बिनविरोध होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
तुमची पत आता संपलेली आहे
कल्याणशेट्टी म्हणाले, सर्वांना अकलूजला बोलावायचं, अशी परिस्थिती आता राहिलेली नाही. कधी काळी विजयदादा असताना सर्वजण ऐकायचे. पण, तुमच्या अशा वागणुकीमुळे तुमच्या शब्दाची किमत आणि पत आता संपलेली आहे. आम्ही जिल्ह्यातील नेतेमंडळी बसून जिल्हा बॅंकेची निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न करू.
अशी माणसं भाजपमध्ये नसतात...
रणजितसिंह मोहिते पाटील यांनी लोकसभा, विधान परिषद निवडणुकीत कोणाचे काम केले, हे त्यांनाच विचारा. भाजपचा माणूस रोज भाजपसाठी काम करतो. पण, स्वार्थासाठी भाजपमध्ये राहून रात्री दुसऱ्याचं काम करायचं, अशी माणसं भाजपमध्ये नसतात, असा टोलाही त्यांनी लगावला.
सचिन कल्याणशेट्टी म्हणाले, मी स्वतः खासदार धैर्यशील आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांना फोन केला होता. जे राजकीयदृष्ट्या शक्तीशाली आहेत, त्यांनी बिनविरोधची भाषा बोलायची असते. अल्पमतात असणाऱ्यांनी बिनविरोधची भाषा बोलू नये. बॅंक अडचणीत आणण्यात तुमचा मोठा रोल आहे, त्यामुळे शेतकरी, बॅंकेविषयी कळवळा असल्याचे दाखवू नका. अजून तुम्ही बोलाल तर मी कागदपत्रांसह आकडेवारी मांडण्यात येईल.
पालकमंत्री म्हणून गोरंचं मोठं योगदान
व्यक्तीगत द्वेषापोटी जयकुमार गोरे यांना बाहेरचा म्हणण्यापेक्षा नेतृत्वाच्या कामगिरीचा आलेख तपासून बघा. त्रयस्थ व्यक्तीला विचारून बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की जयकुमार गोरेंचे जिल्ह्याच्या विकासात पालकमंत्री म्हणून मोठं योगदान आहे, असेही कल्याणशेट्टी यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.