सोलापूर जिल्ह्यातील दोन आमदारांना खासदार व्हायचंय, त्यासाठी ते लोकसभेच्या (Solapur Lok Sabha Election 2024) आखाड्यात उतरले आहेत. उमेदवारी जाहीर होताच दोन्ही उमेदवारांचे सोशल मीडियावर लेटरवाॅर रंगले आहे. एकमेकांवर टीका करीत आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) आणि महायुतीचे उमेदवार राम सातपुते (Ram Satpute) यांच्यात चांगलीच जुंपली आहे. दोघांचे लेटरवाॅर सुरू असतानाच सोलापुरातील एका बेरोजगार युवकाचे पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
"दोघांनीही पाच वर्षे विधानसभेचे नेतृत्व केलं, पण आमच्यासारख्या तरुणांना फक्त रोजगार आणि उद्योगांच्या नावे आश्वासनांवर झुलवत ठेवलं असो, तरी तुम्हा दोघांचेही स्वागत आणि अभिनंदन.." असे नमूद करीत त्या तरुणाने बेरोजगारीचे वास्तव शिंदे आणि सातपुते यांच्यासमोर मांडले आहे. या पत्राची सध्या सोलापुरात चर्चा होत आहे. "तुम्ही दोघेही आपापल्या पक्षाचे प्रतिनिधित्व करीत आहात, परंतु लोकांचे नाही..! अशी कानउघाडणी या पत्रातून करण्यात आली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
"कु. प्रणिती ताई यांचे पत्र पाहिले, अत्यत कमी शब्दांमध्ये संस्कार आणि संस्कृतीचे दर्शन तुम्ही सोलापूरकरांना करवून दिलात, त्याला प्रत्युत्तर देत रामभाऊनेही अत्यंत गंभीर आणि खोचक व शिस्तबद्ध उत्तर दिलेले दिसत आहे. दोघांनीही स्वतःचे संस्कार जपत शिस्तीचे प्रदर्शन करीत उत्तरांची सौम्य आगपाखड केली आहे, तो तुमच्या राजकारणाचा भाग झाला..! परंतु माझ्यासारख्या युवकास आजही या प्रश्नांची उकल नाही झाली की, मला सोलापूर सोडून का जावं लागतं.? मला शिक्षण तर भेटते, पण नोकरी का नाही.? मला टॅक्स नोटीस तर वेळेवर भेटते, पण पाणी का नाही.! तुम्ही दोघेही तरुण आमदार आहात, उच्चशिक्षित आहात, तरी माझ्यासारख्या तरुणास कधी जातीच्या नावे लढावे लागते, तर कधी एकत्र यावे लागते, परंतु आम्हाला कधीच तुम्ही शिक्षणाच्या नावे एकत्र करण्याचा प्रयत्न केलाच नाही. कारण तुम्ही सत्तेचा सारीपाट वाटून घेतलाय. दोघांनीही पाच वर्षे विधानसभेचे नेतृत्व केलं, पण आमच्यासारख्या तरुणांना फक्त रोजगार आणि उद्योगांच्या नावे आश्वासनांवर झुलवत ठेवलं असो, तरी तुम्हा दोघांचेही स्वागत आणि अभिनंदन..! कारण तुम्हा दोघांतील एक जण राजकीय वारशाने तर एकजण राजकीय वरदहस्ताने या लोकसभेसाठी उभे आहात..! परंतु कोणीही जनसामान्यातून नाही, तुम्ही दोघेही आपापल्या पक्षाचे प्रतिनिधित्व करत आहात., परंतु लोकांचे नाही..! असो, कुणी ऊसतोड कामगाराचा दलिताचा मुलगा म्हणून पंचतारांकित हॉटेलात आरोळी न फोडता, मी एक नारी म्हणून मुंबईतील घरामध्ये पारंपरिक मतदारांची थट्टा नाही करणार एवढंच आश्वासन गरजेचे आहे..!"
सातपुतेंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रणिती यांनी टि्वट करीत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. 'बाहेरचा असो की येथील सोलापुरात सर्वांना आपले मत मांडण्याची मुभा मिळते, असे ट्विट करीत प्रणिती यांनी सातपुतेंना चिमटा काढला आहे.
"मा. राम सातपुते जी, आपलं सोलापूर लोकसभेच्या निवडणूक रिंगणात स्वागत आहे! सोलापूर हे कायमच बहुभाषिक, बहुधार्मिक, सर्वधर्मसमभाव मानणारं शहर आणि जिल्हा आहे, इथे सर्वांना आपली मतं मांडण्याची मुभा मिळते, मग तो इथला असो किंवा बाहेरचा. मी सोलापूरची लेक म्हणून तुमचं सोलापुरात स्वागत करते. तसेच, या उमेदवारीच्या निमित्तानं तुम्हाला जी संधी मिळाली, त्याबद्दल शुभेच्छा देते," असं प्रणिती शिंदेंनी म्हटलं.
"आ. प्रणिती शिंदेजी, जय श्रीराम...! मी 2019 पासून सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतोय. मी आमदार झाल्यापासून ते आजतोवर मी माझ्या मतदारसंघातील जनतेच्या आणि त्यायोगे सोलापूर जिल्ह्यातील जनतेच्या सेवेत माझ्या परीने प्रामाणिकपणे होईल तेवढी विकासकामे करण्याचा प्रयत्न केलाय," असं सातपुतेंनी सांगितलं.
"मी ज्या भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे, तिथे आम्ही समाजाला एकसंघ ठेवण्यासाठी मा. नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात 'सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास' या मंत्राला सार्थ ठरवत समाजातील शेवटच्या घटकाच्या कल्याणासाठी झटत आहोत. समाजात धर्म, जातीपातीत फूट पाडून कुणी एवढं वर्षं राजकारण केलंय, हे सोलापूरच्याच नव्हे तर पूर्ण देशाच्या जनतेनं आता चांगलंच ओळखलंय. राजकारणाची कुठलीही पार्श्वभूमी नसलेल्या एका ऊसतोड कामगाराच्या कुटुंबात जन्मलेल्या माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर भारतीय जनता पार्टीने जो विश्वास दाखवलाय, त्याला सोलापूरचा सर्वांगीण विकास करून सार्थ ठरवण्यासाठी मी नक्कीच प्रयत्नशील राहीन. वंदे मातरम्...!," असं म्हणत राम सातपुतेंनी प्रणिती शिंदेंना प्रत्युत्तर दिलं आहे.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.