Kiran Lohar
Kiran Lohar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

मंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारलेला शिक्षणाधिकारी दुसऱ्याच दिवशी लाच घेताना पकडला

तात्या लांडगे

सोलापूर : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या हस्ते आणि शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar), राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांच्या उपस्थितीत रविवारी (ता. ३० ऑक्टोबर) सोलापूरचे (solapur) शिक्षणाधिकारी किरण लोहार (Kiran Lohar) यांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. त्याच्या दुसऱ्याच दिवशी लोहार हे २५ हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले. लोहार यांना मंगळवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. (Solapur primary education officer Kiran Lohar caught red-handed while taking bribe)

महाबळेश्वर (जि. सातारा) येथील एका खासगी संस्थेने प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना राज्यस्तरीय पुरस्कार दिला होता. त्याचे वितरण राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्याच्या दुसऱ्याच दिवशी लोहार लाच घेताना रंगेहाथ पकडले, हे विशेष. तत्पूर्वी, झेडपीच्या प्राथमिक शाळांची स्थिती सुधारण्याच्या बाता मारत शिक्षकांना उपदेशाचे धडे देण्यामुळे लोहार चर्चेत होते. ग्लोबल टिचर डिसले गुरुजींच्या प्रकरणात बेधडक वक्तव्यांमुळे पण ते चर्चेत राहिले. त्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी त्यांना नोटीस काढून गप्प बसण्याचा सल्ला दिला होता.

उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी येथील एका स्वयंअर्थसहाय खासगी शाळेचे आठवी ते दहावीचे वर्ग ‘यु-डायस प्लस’मध्ये समाविष्ट करण्यासाठी प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी ५० हजारांची लाच मागितली. त्यातील २५ हजार रुपये सोमवारी (ता. ३१ ऑक्टोबर) कार्यालयातच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना रंगेहाथ पकडले.

खासगी शाळेचे वर्ग वाढल्यानंतर शिक्षकांची मान्यता, विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी अडचणी येवू नयेत, यासाठी त्या वर्गांची नोंद यु-डायस प्लसमध्ये व्हावी, असा नियम आहे. त्यामुळे संबंधित शाळेने त्यांच्या शाळेतील आठवी ते दहावीच्या वर्गांचा प्रस्ताव प्राथमिक शिक्षण विभागाला दिला होता. प्रस्ताव पाठवूनही त्यावर निर्णय होत नसल्याने त्यांनी त्यासंदर्भात विचारणा केली होती. त्यावेळी शिक्षणाधिकारी लोहार यांनी संबंधिताकडे लाच मागितली. त्यातील २५ हजार रुपये त्यांनी सोमवारी स्वीकारले. तत्पूर्वी, शनिवार, रविवारी कार्यालयास सुट्टी होती. त्यांना महाबळेश्वर येथील एका खासगी संस्थेने पुरस्कार दिला होता. त्यामुळे ही रक्कम सोमवारी त्यांनी तक्रारदाराला कार्यालयात बोलावूनच स्वीकारली. त्यावेळी त्यांच्याविरूध्द सदर बझार पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून त्यांना अटक करण्याची कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरु होती.

सहा महिन्यानंतरही चर्चा करण्याचाच शेरा

खासगी स्वयंअर्थसहाय शाळेने ‘यु-डायस प्लस’मध्ये वर्गवाढीचा प्रस्ताव सहा जून महिन्यात प्राथमिक शिक्षण विभागाला दिला होता. सुरवातीला त्यावर त्रुटी काढण्यात आल्या. त्यानुसार शाळेने त्याची वेळोवेळी पूर्तता केली. तरीपण, निर्णय झाला नाही. उलट त्या फाईलवर ‘चर्चा करा’ असा शेरा मारण्यात आला होता. सहा महिने होऊनही मान्यता न मिळाल्याने संबंधित तक्रारदाराने शिक्षणाधिकारी लोहार यांची भेट घेतली. त्यावेळी ५० हजारांची मागणी झाली, ही बाब समोर आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT