Solapur ZP Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

`पीए`वर कारवाईसाठी पाटलांचा आग्रह तर अध्यक्ष म्हणतात, मी एक रुपया घेतला नाही...

या प्रकरणात मोहिते यांच्यावर कारवाईची माझी इच्छा असल्याचा दावा सोलापूर जिल्हा परिषेदेचे (Solapur ZP) सीईओंनी केला.

प्रमोद बोडके - सरकारनामा ब्युरो

सोलापूर : एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर राज्य सरकार सुमोटो गुन्हा दाखल करु शकते तर जिल्हा परिषद अध्यक्षांचे स्वीय सहाय्यक सूर्यकांत मोहिते हे त्यांच्या पेक्षा मोठे आहेत का? झेडपीने त्यांच्या विरोधात गुन्हा का दाखल केला नाही? लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार का दिली नाही? असे प्रश्‍न जिल्हा परिषद सदस्य उमेश पाटील यांनी आज बैठकीत उपस्थित केले.

जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा आज यशवंतराव चव्हाण सभागृहात झाली. यावेळी अध्यक्ष अनिरूद्ध कांबळे, उपाध्यक्ष दिलीप चव्हाण, सभापती विजयराज डोंगरे, सभापती अनिल मोटे, सभापती संगिता धांडोरे उपस्थित होते. सभा सुरु होण्यापूर्वीच सदस्य उमेश पाटील यांनी झेडपी अध्यक्षांचे स्वीय सहाय्यक सुर्यकांत मोहिते यांच्या टक्केवारीचा विषय उपस्थित केला.सभापतींना टक्केवारी मागणाऱ्या स्वीय सहाय्यकाला आतापर्यंत का निलंबित केले नाही? असा प्रश्‍नही उमेश पाटील यांनी विचारला.

यावर उत्तर देताना ‘सीईओ’ दिलीप स्वामी म्हणाले, ‘‘ या प्रकरणात मोहिते यांच्यावर कारवाई करण्याची तुमच्यापेक्षा माझी जास्त ईच्छा आहे. मोहिते यांची तत्काळ बदली करतो. त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या नोटीसवर त्यांचे उत्तर आल्यानंतर त्यांना तत्काळ निलंबित केले जाईल.’’ अध्यक्ष कांबळे म्हणाले, ‘‘या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही. मी एकही रुपया घेतलेला नाही.’’

उमेश पाटील यांनी आरोप करताना जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष व विषय समिती सभापती निवडीत सदस्य खरेदी करण्यासाठी हा पैसा वापरला गेला असल्याचा आरोप केला. या आरोपावर भाजपचे सदस्य आनंद तानवडे, मदन दराडे, अण्णाराव बाराचारे, सुभाष माने, अतुल पवार यांनी जोरदार आक्षेप घेतला. त्यानंतर सदस्य खरेदीचा मुद्दा उमेश पाटील यांनी मागे घेतला.

जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत या विषयावर आज चर्चा झाली. या चर्चेतून जो निर्णय मला अपेक्षित होता, तो न झाल्याने मी या प्रकरणाची तक्रार आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करणार आहे. या प्रकरणावर आजच्या सभेतून ठोस निर्णय अपेक्षित होता. तो निर्णय झालेला नाही, असे कृषी समितीचे सभापती अनिल मोटे यांनी सांगितले.

मोहितेंना 28 ऑक्‍टोंबरपर्यंतची मुदत

जिल्हा परिषद अध्यक्षांचे स्वियं सहाय्यक सुर्यकांत मोहिते यांना मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी ११ ऑक्‍टोंबरला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. २१ ऑक्‍टोंबर रोजी मोहिते यांनी ही नोटीस समक्ष स्विकारली आहे. नोटीस मिळाल्यापासून सात दिवसांच्या आत त्यांनी खुलासा देणे अपेक्षित आहे. मोहिते यांच्याकडून २८ ऑक्‍टोंबरपर्यंत खुलासा येणे अपेक्षित असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील यांनी दिली.

Edited By : Umesh Ghongade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT